
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून दरवर्षी दिवाळीत दादर शिवाजी पार्क मैदान परिसरात दीपोत्सव आयोजित केला जातो. यंदा उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या दीपोत्सवाच उद्घाटन होणार आहे. त्यावरुन मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी त्यांना कोंडीत पकडणारा प्रश्न विचारला आहे. ‘मागच्या वर्षी या कार्यक्रमाला विरोध, यावर्षी त्याचे उद्घाटन या दुटप्पी भूमिकेचं उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिलं पाहिजे’ असं अमित साटम यांनी म्हटलं आहे. “गेल्या वेळेला घेतलेली भूमिका चुकीची की आत्ताची भूमिका चुकीची याचं स्पष्टीकरण द्यावं. विधानसभेच्या पराभवानंतर उबाटा कन्फ्युज स्टेट मध्ये गेलेली आहे. आपण काय करावं, काय करू नये यांच्या बद्दलची स्पष्टता त्यांच्यात नाही. त्यामुळे शरद पवार काहीतरी बोलतात, हे काहीतरी बोलतात” अशी बोचरी टीका अमित साटम यांनी केली.
“पराभव समोर दिसल्यामुळे निवडणुका पुढे ढकलाव्या अशा प्रकारची विनंती काही लोक करत आहेत. पुढे हे अंडर ग्राउंड मेट्रो देखील बंद करावी अशा प्रकारची तक्रार निवडणूक आयोगाकडे करतील. यासाठी मुंबईकरांनी तयार रहावं” अशी टीका अमित साटम यांनी केली. काल महाविकास आघाडीचे नेते आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या भेटीला गेले होते. त्यावरुन अमित साटम यांनी ही टीका केली.
‘शरद पवार यांनी सत्तेत राहून इतकी वर्ष काय केलं? याच्याबद्दल स्पष्टीकरण द्यावं’
“शरद पवार स्वतः कृषिमंत्री राहिलेले आहेत. त्यांनी मोर्चा काढण्यापेक्षा सत्तेत राहून इतकी वर्ष काय केलं? याच्याबद्दल स्पष्टीकरण दिलं, तर महाराष्ट्राच्या जनतेच्या ज्ञानामध्ये भर पडेल” असं अमित साटम म्हणाले. “मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अमित सैनी यांच्या बद्दलची तक्रार आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे केलेली आहे. माझी अपेक्षा आहे की, त्यांच्यावरती लवकरच कारवाई करतील. अमित सैनी हे वादग्रस्त अधिकारी आहेत. यांच्याबद्दल वारंवार तक्रारी आहेत. सिटी इंजिनीयरने त्यांच्या जाचाला कंटाळून वॉल्टरी रिटायरमेंट घेतलीय. या संदर्भात देखील चौकशी झाली पाहिजे” अशी मागणी अमित साटम यांनी केली.