वरळी ते दहिसर, मुंबईत मुलगा, मुलगी अन् सुनेच्या उमेदवारीसाठी दिग्गजांची फिल्डिंग, कोणाला मिळणार तिकीट?

मुंबई महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचा जोर पाहायला मिळत आहे. सुनील प्रभू, सचिन अहिर आणि अजय चौधरी यांच्यासह अनेक बड्या नेत्यांनी आपल्या नातलगांसाठी गोरेगाव, वरळी आणि परळ सारख्या विभागांतून उमेदवारीची जोरदार तयारी केली आहे.

वरळी ते दहिसर, मुंबईत मुलगा, मुलगी अन् सुनेच्या उमेदवारीसाठी दिग्गजांची फिल्डिंग, कोणाला मिळणार तिकीट?
| Updated on: Dec 25, 2025 | 11:21 AM

आगामी महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. यामुळे राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. मुंबई आणि कोल्हापूर या दोन्ही महत्त्वाच्या शहरांमध्ये राजकीय नेत्यांकडून आता फिल्डिंग लावली जात आहे. आपल्या मुला-मुलींना आणि जवळच्या नातेवाईकांना निवडणुकीसाठी तिकीट मिळावे यासाठी अनेक नेते कंबर कसून प्रयत्न करत आहेत. मात्र यामुळे प्रेमामुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये मात्र अस्वस्थता पसरली आहे. सध्या अनेक प्रभागांमध्ये हाय व्होल्टेज लढती पाहायला मिळत आहेत.

मुंबई महापालिकेत सत्ता मिळवण्यासाठी सर्वच पक्षांनी जोर लावला आहे. सध्या अंतर्गत स्तरावर उमेदवारीसाठी नेत्यांची मोठी लगबग सुरू आहे. अनेक आजी-माजी आमदार आणि खासदार आपल्या वारसांना महापालिकेत पाठवण्यासाठी इच्छुक आहेत. अनेक दिग्गज नेते आपल्या मुला-मुलींना, सून आणि इतर नातेवाईकांना राजकीय वारसदार म्हणून मैदानात उतरवण्यासाठी जोरदार लॉबिंग करत आहेत.

माजी महापौर आणि आमदार सुनील प्रभू आपल्या मुलाला गोरेगावमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. तर शिवसनेचे नेते अजय चौधरी आपल्या सुनेला परळमधून उमेदवारी मिळावी यासाठी आग्रही आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी आपली मुलगी वरळीतून निवडणूक लढवण्यासाठी चाचपणी सुरू केली आहे. तसेच विनोद घोसाळकर हे दहिसरमधून आपली धाकटी सून पूजा घोसाळकर यांना तिकीट मिळवण्यासाठी इच्छुक आहेत. भांडूपमधून खासदार संजय पाटील आपल्या मुलीला तिकीट मिळावे यासाठी इच्छूक आहेत. माजी महापौर श्रद्धा जाधव आपल्या मुलासाठी वडाळ्यातून उमेदवारी मिळवण्यासाठी फिल्डिंग लावून आहेत.

नेता नातेवाईक निवडणूक क्षेत्र / प्रभाग
सुनील प्रभू (आमदार) चिरंजीव गोरेगाव
अजय चौधरी (आमदार) सून परळ (शिवडी परिसर)
सचिन अहिर (नेते, ठाकरे गट) मुलगी वरळी
विनोद घोसाळकर (माजी आमदार) पूजा घोसाळकर (धाकटी सून) दहिसर
संजय पाटील (खासदार) मुलगी भांडूप
श्रद्धा जाधव (माजी महापौर) चिरंजीव वडाळा
दगडू सपकाळ (माजी आमदार) मुलगी लालबाग

दरम्यान मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका १५ जानेवारी २०२६ रोजी होत आहेत. त्यापूर्वी सर्वच पक्ष आपापल्या उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करत आहेत. युती आणि आघाडीच्या राजकारणामुळे काही ठिकाणी जागावाटपाचा पेच असला, तरी नेत्यांनी आपापल्या नातलगांच्या जागा सुरक्षित करण्यासाठी जोरदार लॉबिंग सुरू केले आहे.