दादरच्या बालमोहन विद्यामंदिर येथील एका मतदान यंत्रात बिघाड. विशाखा राऊत यांच्यासमोरील बटण दाबलं जात नाही अशी तक्रार काही मतदारांनी केली. 20 मिनिटं मतदान प्रक्रिया थांबली होती. मतदारांच्या तक्रारीनंतर मशिन बदलण्यात आली.
“मी मुंबईकारांना विनंती करते की, तुम्ही मत दिलं पाहिजे. मुंबईत चांगली हवा पाहिजे, खड्डेमुक्त रस्ते पाहिजेत, प्रगती पाहिजे, सुरक्षा पाहिजे, तर आपण सगळ्यांनी मिळून जबाबदारी घेतली पाहिजे. माझा मत देण्याचा अधिकार मी वापरला. मुंबई उत्तम शहर आहे. सर्वांनी साथ दिली पाहिजे. मी मुंबईकरांना विनंती करते की त्यांनी मतदानाचा हक्क बजावा” असं हेमा मालिनी मतदानानंतर म्हणाल्या.
“महापालिका जिंकल्यावर पुढल्या लढाईला सुरुवात होईल. मला आश्चर्य वाटतं घाटकोपरला एक होर्डिंग कोसळलं 40 लोकं ठार झाले. दुर्देवी घटना होती. मी काल पाहिलं, त्या भूखंडावर सुद्धा अदानीचा बोर्ड लागलेला आहे. हा भूखंड अदानीने घेतला. ही राक्षसी भूक भाजप आणि त्यांना पोसणाऱ्या उद्योगपतींची आहे” अशी टीका संजय राऊत यांनी केली.
“मुंबईत काय होणार? याकडे फक्त देशाचचं नाही, तर जगातल्या अनेकांच लक्ष आहे. मुंबईत काय होणार? मुंबईवरती कोणाचा ताबा असेल? कोण जिंकेल? मुंबईच्या आजच्या मतदानावर प्रेसिडंट ट्रम्पही लक्ष ठेऊन असतील. मुंबईच्या संदर्भात ही जी लढाई सुरु झालीय ती फक्त या निवडणुकीपुरती नाही” अस संजय राऊत म्हणाले.
“माझं मतदान मुंबईत करतो. मतदान करणं ही अस्तित्वाची खूण आहे. तुम्हाला जो कोणी उमेदवार योग्य वाटत असेल कृपया बाहेर पडा आणि त्याला मतदान करा” असं नाना पाटकेर मतदानाचा हक्क बजावल्यानंतर म्हणाले.
“मतदान करायला आलोय. प्रत्येक मत मॅटर करतं. म्हणून मी विनंती करतो येऊन मतदान करा. आपला विचार इथे येऊन मांडा, हीच वेळ आहे. मतदानाचा नीट वापर करा” असं प्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर मतदानाचा हक्क बजावल्यानंतर म्हणाला.
“अतिशय चांगलं वातावरण आहे. मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा झेंडा फडकणार. महायुती मुंबईत 150 जागा जिंकणार” असा विश्वास मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केला.
सचिन तेंडुलकर मतदानासाठी सहकुटुंब मतदान केंद्रावर दाखल झालाय. त्याच्यासोबत पत्नी अंजली आणि मुलगी सारा तेंडुलकर आहे. वांद्रयातील मतदान केंद्रावर सचिन आला आहे. सध्या तो मतदानासाठी आत गेलाय.
मुंबईच्या लालबाग परिसरात असलेल्या चिवडा गल्लीतील मशीनमध्ये बिघाड झाला होता. मतदान मशीन सुरू करण्यात आलेलं आहे. तांत्रिक कारणामुळे मशीन बंद झालं होतं. मात्र तात्काळ दुरुस्ती करण्यात आलेली आहे. मशीन बंद पडल्यामुळे मतदारांना अर्धा तास वाट बघावी लागली. त्यामुळे चिवडा गल्लीतील 235 नंबरच्या मतदान केंद्रावर वेळ वाढवून देण्यात आली आहे. मुंबई महापालिकेच्या मतदानासाठी मतदारांच्या मोठा उत्साह दिसून येत आहे.
“दुबार मतदारांचा घोळ आधीच घालुन ठेवलाय. पाडू नावाचं मशिन आणलय. मुंबईकर प्रतिकुल पारिस्थितीत मतदान करतायेत. भगवा गार्ड लोकशाही मजबूत करण्यासाठी येतय. तुमचे पैसे सापडले, गुंड पुंड सापडले तुमच्यावर कारवाई का नाही?. दुबार मतदार सापडले तर कार्यक्रम होईलच” असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
मुंबईत सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झालीय. वांद्रयाच्या माऊंट मेरी स्कूलमध्ये EVM मशीन बंद पडलेलं. 15 मिनिटानंतर EVM मशीन सुरु झालीय.
“मुंबई महापालिकेच्या मतदानासाठी पंधरा वर्षे जुनी मशीन लावण्यात आलेली आहे. सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली होती. मात्र लालबागच्या 235 मतदान केंद्रावर आठ वाजेपर्यंत मतदानात सुरू झालेलं नाही. निवडणूक आयोगाच्या चुकीच्या नियोजनामुळे मतदारांना त्रास सोसावा लागत आहे. मशीन बंद पडल्यानंतर पाडू मशीनची व्यवस्था आहे. मात्र ती सुद्धा सुरु नाहीय” अशी टीका शिवसेना सचिव सुधीर साळवी यांनी केली.
राम नाईक यांनी बजावला मतदानाचा हक्क. मुंबई पब्लिक स्कुल गोरेगाव पूर्व पहाडी शाळेत बजावला मतदानाचा हक्क. राम नाईक आता 92 वर्षांचे आहेत. ते उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल आहेत. गोरेगाव प्रभाग क्रमांक 51 चे ते मतदार आहेत.
प्रभाग क्रमांक 210 सेंट मेरी हायस्कूल मतदान केंद्रावर मतदान प्रक्रियेला सुरुवात. या प्रभागात उद्धव ठाकरे गटाच्या सोनम जामसुतकर, भाजपचे संतोष राणे आणि काँग्रेसमधून अनिल वाजे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सकाळी कामावर जाण्यापूर्वी मुंबईकर आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत . सकाळी 10 वाजता मनसे नेते बाळा नांदगावकर देखील याच केंद्रावर आपला मतदनाचा हक्क बजावणार आहेत.
दुबार मतदान करणाऱ्यांना फोडून काढण्याच आव्हान ठाकरेंनी केलय. त्यावर अमित साटम म्हणाले की, “काही लोकांचा लोकशाहीवर विश्वास नाहीय. स्वत:चा पराजय दृष्टीपथात दिसल्यामुळे त्यांची चलबिचल झाली आहे. त्यामुळे ते अशी बालिश आव्हान देताना दिसतायत”
“मी मुंबईकरांना आवाहन करतो की, विकसित निर्मितीच्या मुंबईसाठी, मुंबईची सुरक्षितता अबाधित ठेवण्यासाठी, मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार विरहीत प्रशासन देण्यासाठी महायुतीला साथ द्यावी” असं अमित साटम म्हणाले.
“मुंबईकरांचे आशिर्वाद, फडणवीस साहेबांचं पाठबळ आणि केंद्रीय नेतृत्वाने दिलेले आशिर्वाद यामुळे येणाऱ्या काळात मुंबईकर भाजप, शिवसेना, रिपाई महायुतीला आशिर्वाद देताना दिसतायत. आजचा दिवस मुंबईकरांच्या भविष्याच्या, उद्याच्या मुंबईच्या निर्मितीच्या दृष्टीने ऐतिहासिक ठरणार आहे” असं अमित साटम म्हणाले.
“मुंबईकरांना हे चांगलं माहित आहे मराठी माणसाचा, मुंबई शहराचा विकास कोणी केला? मुंबई शहराची सुरक्षितता कोण अबाधित ठेऊ शकतं.मुंबादेवीचं दर्शन घेण्याचा अधिकार सर्व भक्तांना आहे. परंतु कोविडच्या काळात मंदिर बंद करणारे आज स्वत:च्या अस्तित्वासाठी देवाकडे, देवीकडे साकडं घालताना दिसतायत. आज त्यांना देवदेवता आठवले, हिंदुत्व आठवलं हे चांगलं आहे” असं टीका करताना अमित साटम म्हणाले.
“मराठी माणसाचं अस्तित्व नाही, तर मुंबई महानगरपालिकेला स्वत:च्या परिवाराची जागीर समजणाऱ्यांच्या अस्तित्वाची ही लढाई आहे. त्यामुळे त्यांची धडपड दिसत आहे. गेल्या 11 वर्षात मुंबईकरांसाठी, मराठी माणसांसाठी खऱ्या अर्थाने जे काम झालं आहे, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. वरळी बीडीडी चाळीत 160 फुटाच्या घरात राहणाऱ्या मराठी माणसाला त्याच ठिकाणी 560 फुटाचं घर देण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी केलं” असं मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम म्हणाले.
सुरक्षित मुंबई निर्माण करण्यासाठी आम्हाला शक्ती द्यावी, आशीर्वाद द्यावा, आजचा हा दिवस मुंबईच्या भविष्याच्या दृष्टीकोनातून मुंबईतल्या भविष्यातल्या पिढ्याचं रक्षण करण्याच्या दृष्टीने हा दिवस ऐतिहासिक ठरो अशी सिद्धीविनायकाच्या चरणी प्रार्थना केली, असं मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम म्हणाले.
दहिसर वॉर्ड क्रमांक 2 मधून भाजपकडून घोसाळकर कुटुंबातील तेजस्वी घोसाळकर आणि वॉर्ड क्रमांक 7 मधून ठाकरे शिवसेनेकडून सौरभ घोसाळकर निवडणूक लढवत आहेत. घोसाळकर कुटुंब आज एकत्र मतदान करणार आहे. पण त्यापूर्वी ते घरी पूजा करतील.
चेंबूरच्या प्रभाग 153 मध्ये स्थानिक शिवसेना आमदार तुकाराम काते आणि ठाकरेंचे माजी नगरसेवक अनिल पाटणकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तणावाचं वातावरण. मध्यरात्री काही जण पोलिंग बूथवर बोगस आयडी घेऊन शिरल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप. रविंद्र महाडीक नामक इसमाला मध्यरात्री गोवंडी पोलिसांनी घेतलं ताब्यात. आरोपी हा 33/44 घाटाला बीएमसी शाळेत पोलिंग बूथमध्ये घुसल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक शिवसेना युबीटीच्या कार्यकर्त्यांनी त्याला रात्री 1.30 वाजता रंगेहाथ पकडलं. मध्यरात्री परिसरात तणावाचे वातावरण. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस दाखल झाले होते. इलेक्शन आरओ सुद्धा आले होते.
सकाळी 8.30 ते 9.30 या वेळेत प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार हा जुहू येथील गांधी शिक्षण मंडळ येथे आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे. लोकशाहीच्या या महत्त्वपूर्ण प्रक्रियेत नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यावा, असं आवाहन यावेळी करण्यात येणार आहे.
मुंबई महानगरपालिका क्षेत्रात एकूण 227 वॉर्ड आहेत. तब्बल 1,700 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. थोड्याच वेळात मुंबईमध्ये मतदानाला सुरुवात होणार आहे. राजकीय पक्षांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. ठाकरे बंधुंसाठी ही निवडणूक म्हणजे अस्तित्वाची लढाई आहे.
मागच्या चार वर्षांपासून मुंबई महानगर पालिकेची निवडणूक रखडली होती. मुंबई महापालिकेची शेवटची निवडणूक 2017 साली झाली होती. आज 15 जानेवारी 2026 रोजी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मतदान होत आहे. मुंबई महानगरपालिका क्षेत्रात एकूण 227 वॉर्ड आहेत. तब्बल 1,700 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. मागची चार वर्ष प्रशासकामार्फत मुंबई महानगरपालिकेचा कारभार हाकण्यात आला. यंदाची मुंबई महानगरपालिकेची निवडणूक अनेक अर्थांनी खास आहे. ठाकरे बंधुंसाठी ही अस्तित्वाची लढाई आहे, तर भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी ही प्रतिष्ठेची लढाई आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासून परस्परांचे स्पर्धक असलेली मनसे आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना पहिल्यांदाच एकत्र निवडणूक लढवत आहेत. आज मतदान होत आहे. उद्या 16 जानेवारी 2026 रोजी निवडणुकीचा निकाल आहे. मतमोजणी आहे. सर्वच पक्षांनी मुंबई महापालिका जिंकण्यासाठी आपली ताकद पणाला लावली आहे.