
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार प्रमोद सावंत हे आपला गड राखण्यात यशस्वी ठरले आहेत. प्रमोद सावंत यांनी मुंबई महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 75 मधून 3 हजारांपेक्षा अधिक मताधिक्यांनी विजय मिळवला आहे. प्रमोद सावंत यांनी भाजपच्या उमेश राणे यांचा पराभव केला आहे. प्रमोद सावंत यांनी भाजपच्या राणेंवर 3 हजार 522 मतांच्या फरकाने मात केली आहे. सावंतांच्या विजयानंतर कार्यकर्त्यांमध्ये एकच जल्लोष पाहायला मिळत आहे. तसेच विजयानंतर गुंदवली कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी नाचत आनंद साजरा केलाय.
सावंत दाम्पत्यानी या विजयासह विजयी हॅट्रिक पूर्ण केलीय. मरोळकरांनी सावंत दाम्पत्याला निवडून देण्याची ही सलग आणि एकूण तिसरी वेळ ठरली आहे. याआधी प्रमोद सावंत यांच्या पत्नी प्रियांका सावंत यांचा 2017 मध्ये विजयी (एकसंध शिवसेना) झाला होत्या. तर त्याआधी प्रमोद सावंत यांनी 2012 मध्ये(एकसंध शिवसेना) काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडलं होतं.
अंधेरी पूर्वमधील या प्रभागातून भाजप+शिवसेना महायुती, काँग्रेस+वंचित आघाडी आणि शिवसेना+मनसे युती अशी थेट आणि प्रमुख लढत होती. तसेच वरील तिन्ही पक्षांचे तिन्ही उमेदवार हे स्थानिक होते. उमेश राणे यांच्या प्रचारासाठी स्थानिक आमदार मुरजी पटेल मैदानात उतरले होते. तसेच उमेश राणेंच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या प्रचार सभेला भाजपेचे दिग्गज नेते विनोद तावडे आणि महायुतीतील मित्र पक्षांच्या नेत्यांनी हजेरी लावली होती. तसेच काँग्रेसचे इम्रान खान हे देखील स्थानिक उमेदवार असल्याने त्यांना राहतं ठिकाण (भंडारवाडा) इथून एकगठ्ठा मतं मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.
तसेच ठाकरे सेनेच्या सावंतांनी कार्यकर्त्यांसह प्रभाग पिंजून काढला होता. तसेच मनसेचे रोहन सावंत आणि अनेक कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे या प्रभागात मोठा ट्विस्ट तयार झाला होता. त्यामुळे इथून कोण जिंकणार? याकडे प्रभागातील मतदारांचं लक्ष लागून होतं. मात्र प्रमोद सावंत यांनी गड कायम राखत विजय मिळवला. तर उमेश राणे यांचा पराभव झाला.
प्रमोद पांडुरंग सावंत, (ठाकरे शिवसेना) : 12 हजार 131 मतं
उमेश सूर्यकांत राणे, (भाजप) : 8 हजार 609 मतं