अपघात झाल्यास बस मालकही जबाबदार, नवीन कायदा येणार
Bus Accident New Rule | केंद्र सरकारच्या हिट अँड रनचा नवीन कायद्याला देशभरातील ट्रक चालकांनी विरोध केला आहे. त्याचवेळी आणखी एक नवीन कायदा येत आहे. नवीन कायद्यात मालकावर जबाबदारी टाकल्यानंतर बस सुस्थितीत राहणार आहे. अपघाताचे प्रमाण कमी होऊ शकतो.

मुंबई, दि. 8 जानेवारी 2024 | खासगी लक्झरी बसला अपघात झाल्यास मालकही दोषी ठरणार आहे. भीषण अपघाताची जबाबदारी चालकाबरोबरच मालकावरही टाकणारा प्रस्ताव परिवहन विभागाने केंद्राला प्रस्ताव पाठवला. या प्रस्तावावरुन वाद निर्माण होणार आहे. केंद्र सरकारच्या हिट अँड रनचा नवीन कायद्याला देशभरातील ट्रक चालकांनी विरोध केला आहे. त्याचवेळी अपघाताची जबाबदारी मालकावर टाकण्याचा प्रस्ताव परिवहन विभागाने तयार केला आहे. बस मालक चालकाला आठ-दहा तास गाडी चालवण्यास भाग पाडतात. तसेच नादुरुस्त बस रस्त्यावर उतरवल्या जातात. यामुळे या पद्धतीचा कायदा आणण्याचा हालचाली सुरु आहे.
का घेतला जात निर्णय
महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात खासगी लक्झरी बसची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. या गाड्या रात्रीच्या वेळी लांब पल्ल्याच्या मार्गावर धावत असल्याने अपघात झाल्यास अनेक प्रवाशांचे बळी जातात. आतापर्यंत या अपघाताला केवळ चालकालाच दोषी ठरवले जात होते. मात्र अनेकदा नादुरुस्त गाडी, ओव्हरलोड गाडी चालकाला चालवण्यास मालकवर्ग भाग पाडतात. यामुळे अपघात झाल्यास केवळ चालकालाच दोषी न ठरवता मालकालाही दोषी ठरवले जाणार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव राज्याच्या परिवहन विभागाने तयार करून मंजुरीसाठी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाकडे पाठवला आहे.
मालकास फायदा पण चालकास पगार नाही
राज्यात 80 हजारहून अधिक खासगी लक्झरी बस धावत आहे. या गाड्यांनी दररोज पाच-सहा लाख प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे मालकांना दररोज लाखो रूपयांचा नफा मिळतो, परंतु चालकांची मासिक 15 ते 20 हजार रुपये वेतनावर बोळवण केली जाते. अनेकदा एकाच चालकाला आठ-दहा तास गाडी चालवण्यास भाग पाडले जाते, नादुरुस्त बस रस्त्यावर उतरवल्या जातात. त्यामुळे चालकाबरोबर मालकालाही जबाबदार धरणारा स्वतंत्र प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला आहे. खासगी लक्झरी बसचा अपघात झाल्यास त्यामध्ये अनेक प्रवाशांचे बळी जातात. या अपघाताला केवळ चालकालाच जबाबदार न धरता गाडी मालकाला जबाबदार धरणे आवश्यक आहे. त्याबाबतचा प्रस्ताव नुकताच केंद्राला पाठवला आहे.
हा फरक पडणार
नवीन कायद्यात मालकावर जबाबदारी टाकल्यानंतर बस सुस्थितीत राहणार आहे. अपघाताचे प्रमाण कमी होऊ शकतो, अशी माहिती परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी दिली. लक्झरी बस गाड्या सर्रासपणे रात्रीच्या वेळी चालवल्या जात असून त्यांचा प्रवास दहा ते बारा तासांचा असतो. अनेकदा एक चालक गाडी चालवत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे परिवहन विभाग एक स्वतंत्र अॅप तयार करत असून प्रत्येक नोंदणीकृती बसच्या चालकाने तो किती वाजल्यापासून गाडी चालवणार आहे याची माहिती आधी परिवहन विभागाच्या अॅपवर त्याच्या लायसन्स क्रमांकासह भरणे बंधनकारक करण्यात येणार आहे, असे भीमनवार यांनी म्हटले आहे.
