‘शीतल, तू लढ; आम्ही सोबत आहोत, या हरामखोरांना सोडू नका, मुसक्या आवळा’, शीतल म्हात्रेंना आता कुणाची साथ?

| Updated on: Mar 13, 2023 | 1:45 PM

Sheetal Mhatre Video | शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांच्या व्हिडिओवरून आज राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

शीतल, तू लढ; आम्ही सोबत आहोत, या हरामखोरांना सोडू नका, मुसक्या आवळा, शीतल म्हात्रेंना आता कुणाची साथ?
Follow us on

मुंबई : शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणावरून आज सलग दुसऱ्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रातून संतापजनक प्रतिक्रिया येत आहेत. विशेष म्हणजे शिवसेना आणि भाजप आमदार, महिला नेत्यांनी शीतल म्हात्रे यांच्या पाठिशी उभं राहिल्याचं दाखवून दिलंय. विधानसभेत आज या प्रकरणाचे जोरदार पडसाद उमटले. तर भाजपच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्र वाघ यांनी आज शीतल म्हात्रे यांच्यासाठी विशेष संदेश दिला आहे. एखादी महिला प्रगती करत असेल. तिला थांबवता येत नसेल तेव्हा अशा प्रकारच्या विकृतींद्वारे तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जातात. पण शीतल म्हात्रे यांनी हिंमतीने लढावं, आम्ही सगळ्या तुझ्या पाठिशी आहोत, अशी भूमिका चित्रा वाघ यांनी घेतली आहे.

चित्रा वाघ काय म्हणाल्या?

चित्रा वाघ यांनी शीतल म्हात्रे व्हिडिओ प्रकरणात एक ट्विट केलंय. त्यात त्यांनी स्वतःची भूमिका मांडणारा व्हिडिओ अपलोड केलाय. चित्रा वाघ म्हणाल्या, ‘राजकारणात काम करणाऱ्या महिलांना कशा प्रकारे त्रास देतात, हे आपण आतापर्यंत पाहिलंय. आज सकाळी मी शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाशदादा सुर्वे यांचा मॉर्फ केलेला व्हिडिओ पाहिला. एखाद्या बाईला थांबवता येत नाही, तेव्हा तिच्या चारित्र्यावर प्रश्न उठवता. तिच्यावर बोललं जाईल, असे विकृत व्हिडिओ बनवले जातात, अशी संतप्त प्रतिक्रिया चित्रा वाघ यांनी दिली.

 

बोलविता धनी कोण?

एकट्या शीतलचा हा प्रश्न नाहीये. तिच्यासारख्या हजारो महिला आम्ही राजकारणात काम करतो. आज तिचा नंबर आहे, उद्या आमच्यापैकी कुणाचा लागेल, हे सांगता येत नाही. त्यामुळे हा लढा सगळ्यांनी मिळून लढला पाहिजे. उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांना या प्रकरणी अटक झाली आहे. पण यांचा करविता आणि बोलविता धनी कोण आहे, असा सवाल चित्रा वाघ यांनी केलाय.

शीतल तू लढत रहा…

एखाद्याच्या विचारधारेला, व्यक्तीला विरोध असू शकतो. म्हणून तुम्ही एवढ्या नीच पातळीवर जाणार? त्या महिलेची लक्तरं तुम्ही वेशीवर टांगणार? लाजा वाटल्या पाहिजेत. मुंबई पोलिसांनी या हरामखोराच्या मुसक्या आवळ्या. या दोघांना तुम्ही ताब्यात घेतलंय, पण याचा करविता कोण आहे, त्याला शोधून काढा. शीतल, तू लढत रहा आम्ही सगळ्या तुझ्या पाठिशी आहोत, अशा शब्दात चित्रा वाघ यांनी शीताल म्हात्रे यांना बळ दिलंय.

विधानसभेत एसआयटीची मागणी

शीतल म्हात्रे यांचा व्हिडिओ मॉर्फिंग प्रकरणी नेमकं कोण आहे, हे शोधून काढण्यासाठी एसआयटी चौकशी नेमा, अशी मागणी आज विधानसभेतही करण्यात आली. शिवसेना आमदार यामिनी जाधव, भारती लव्हेकर आणि मनिषा चौधरी यांनी या प्रकाराविरोधात आवाज उठवला.