
“तुम्ही २५ वर्षे मुंबईवर राज्य केलं, मग मराठी माणूस मुंबईबाहेर वसई-विरारला का गेला? त्यांना तुम्ही का वाचवू शकला नाही? गिरणी कामगारांसाठी तुम्ही फक्त मोर्चे काढले, पण त्यांना हक्काची घरं देऊ शकला नाही. पत्राचाळ, बीडीडी चाळ, अभ्युदय नगर आणि विशाल सह्याद्रीतील रहिवाशांना तुम्ही रस्त्यावर का आणलं? तुमची सत्ता होती, तुमचीच माणसं होती, मग त्यांना घरं का मिळाली नाहीत?” असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विचारला. देवेंद्र फडणवीस यांनी टीव्ही 9 मराठीला खास मुलाखत दिली. मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही विशेष मुलाखत घेतली. या मुलाखतीत फडणवीस यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेत मुंबईतील भ्रष्टाचार आणि ठाकरे बंधूंच्या राजकारणावर प्रहार केला. तसेच मुंबई कुणी लुटली? या प्रश्नाचं उत्तर देताना त्यांनी पुराव्यांचा पाढाच वाचला.
ही लढाई कोणत्याही समाजाच्या अस्तित्वाची नाही. औरंगजेब ज्यांना संपवू शकला नाही, त्यांना कोणीच संपवू शकणार नाही आणि तसा कोणाचा प्रयत्नही नाही. खरी अडचण ठाकरे बंधूंना वाटत आहे, कारण त्यांना त्यांचं स्वतःचं राजकीय अस्तित्व पणाला लागलंय असं वाटतंय. त्यांच्या पायाखालची जमीन सरकतेय, हे त्यांना कळून चुकलं आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
यावेळी देवेंद्र फडणवीसांनी भ्रष्टाचाराची धक्कादायक उदाहरणे दिली. मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचारावर बोलताना देवेंद्र फडणवीसांनी गंभीर आरोप केले. २०० रस्त्यांच्या ऑडिटमध्ये रस्ते बनवताना खाली आवश्यक असलेले PQC (Pavement Quality Concrete) आढळलेच नाही. कागदावर रस्ते झाले, पण प्रत्यक्षात दर्जा शून्य होता. कचरा उचलण्यासाठी आणि मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी चक्क रिक्षा आणि स्कूटरचे नंबर वापरून ट्रान्सपोर्टेशनचे पैसे लाटले गेले. ट्रकच्या जागी दुचाकींचे नंबर देऊन कोट्यवधींचा भ्रष्टाचार करण्यात आला, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.
कोव्हिड काळात डॉक्टर आणि नर्स नसताना केवळ कंत्राटदारांचे खिसे भरण्यासाठी सेंटर्स उभारली गेली. यामध्ये अनेक निष्पाप लोकांचा बळी गेला. अगदी प्रेत वाहून नेणाऱ्या बॉडी बॅग (कफन) मध्येही या लोकांनी घोटाळा केला. माझ्याकडे पुरेसा वेळ असता तर मी राज ठाकरेंचाच जुना व्हिडिओ लावून दाखवला असता. मुंबई कशी लुटली गेली, हे राज ठाकरेंनी पुराव्यांसह आधीच जनतेला दाखवून दिले आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.