Kolhapur Violence : कोल्हापुरात इंटरनेट बंद, लाठीमार, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया काय?

कोल्हापुरात आज सकाळी प्रचंड राडा झाला. पोलिसांनी हिंदुत्ववादी आंदोलकांवर लाठीमार करत अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जमावाला शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे.

Kolhapur Violence : कोल्हापुरात इंटरनेट बंद, लाठीमार, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया काय?
CM Eknath Shinde
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 07, 2023 | 1:40 PM

मुंबई : सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या आक्षेपार्ह पोस्टवरून कोल्हापुरातील वातावरण तापलं आहे. कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटनांनी प्रचंड मोर्चा काढून या घटनेचा निषेध केला. यावेळी हजारो हिंदुत्ववादी कार्यकर्ते जमले होते. या आक्रमक कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. त्यामुळे पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली. त्यामुळे वातावरण अधिकच तापलं आहे. जमाव ऐकत नव्हता म्हणून पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या आहेत. कोल्हापुरात तणाव निर्माण झालेला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापुरातील जनतेला शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे.

कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम गृहविभागाचं आहे. मी अधिकाऱ्यांशी स्वत: बोलत आहेत. ते माझ्या संपर्कात आहेत. गृहमंत्रीही अधिकाऱ्यांशी बोलत आहेत. कुणीही कायदा हातात घेऊ नका. कायदा हातात घेणाऱ्याला पाठी घालणार नाही. कारवाई केली जाईल. कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबादीर जशी सरकारची आहे, तशीच सहकार्य करण्याची जबाबदारी लोकांची आहे. सर्वांनी शांतता प्रस्थापित करण्यासाठी सहकार्य करावं. कुणीही कायदा हातात घेऊ नये, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.

फडणवीस काय म्हणाले?

राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कोल्हापुरातील जनतेला शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. कोल्हापूरात विरोधी पक्षातील लोक म्हणतात दंगल घडवण्यात येणार आहे. काही तरूणांनी औरंगजेब आणि टीपू सुलतानचे आक्षेपार्ह फोटो ठेवले. औरंगजेबाचं उदात्तीकरण केलं जात आहे. हे कोण सांगत आहे? सगळी चौकशी झाल्यावर मी या गोष्टी सांगेन. अचानकपणे अशा टीपू सुलतान आणि औरंजेबाचं उदात्तीकरण करणं चुकीचं आहे. दंगली घडवण्याचा प्रयत्न होतोय असं म्हणणं हा योगायोग असू शकतं नाही. एका समाजाचे लोक, विरोधी पक्षातील लोक उदात्तीकरण करत आहेत. औरंगाजेबाचं उदात्तीकरण आम्ही खपवून घेणार नाही. हे लोक औरंगजेबाला देशभक्त ठरवायला निघालेले आहेत. एकाचं वेळी एकाचं सुरात बोलतात. याला प्रतिसाद मिळत आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

इंटरनेट बंद

दरम्यान, आज हिंदुत्ववादी संघटनांनी कोल्हापूर बंदची हाक दिली होती. त्यानंतर आज सकाळी कोल्हापुरातील शिवाजी महाराज चौकात हिंदुत्ववादी संघटना एकवटल्या होत्या. विशेष म्हणजे जमावबंदीचे आदेश असतानाही हे आदेश झुगारून हिंदुत्वाद्यांनी आंदोलन केले. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले होते. एकाचवेळी हजारो हिंदु्त्ववादी कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याने पोलिसांनी त्यांना पांगवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आंदोलक आक्रमक झाले. यावेळी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला. त्यामुळे आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली. त्यामुळे पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडून जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला. त्यमुळे आंदोलक अधिकच आक्रमक झाले. दरम्यान, सध्या कोल्हापुरातील परिस्थिती नियंत्रणात आहे. जिल्ह्यात अफवांचं पेव फुटू नये म्हणून इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.