
मुंबई | 13 सप्टेंबर 2023 : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज 13 वा दिवस आहे. आजही त्यांचं उपोषण सुरू आहे. जोपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री जालन्यात येत नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. तसेच संभाजीराजे आणि उदयनराजे भोसले यांनीही जालन्यात यावं असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. त्यातच मराठा आंदोलकांनी आजही आंदोलन सुरूच ठेवलं आहे. बुलढाण्यात तर मराठा आंदोलक अधिकच आक्रमक झाले आहेत. त्यामुळे जरांगे पाटील यांच्या उपोषणाचं काय होणार? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जालन्यात यावं. मी उपोषण सोडेन. पण माझं आंदोलन सुरूच राहील, अशी अट मनोज जरांगे पाटील यांनी ठेवली होती. त्यानुसार आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मराठा आरक्षणासाठी उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील हे जालन्यातील अंतरवाली सराटी गावात जाणार आहेत. संध्याकाळी 5 वाजता हे नेते जालन्यात पोहोचणार असून जरांगे पाटील यांचं उपोषण सोडणार आहेत. त्यामुळे आज 15 दिवसानंतर जरांगे पाटील यांचं उपोषण सुटणार आहे.
दरम्यान, पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द करुन चंद्रकांत पाटील मुंबईकडे रवाना झाले आहेत. सरकारकडून मराठा आरक्षणासाठी उपसमिती स्थापन करण्यात आली आहे. चंद्रकांत पाटील यांच्याकडे या समितीचं अध्यक्षपद देण्यात आलं आहे. चंद्रकांत पाटील हे मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करणार असून त्यांची भूमिका समजून घेणार आहेत.
दरम्यान, आज बुलढाण्यात मराठा क्रांती मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात आमदार संजय गायकवाड सहभागी झाले होते. मोर्चाचे नियोजन नव्हते. तरीही कार्यकर्ते मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते. मराठा आरक्षणाल आमचा पाठिंबा आहे. सरकार आरक्षणासाठी पॉझिटिव्ह आहे, असं संजय गायकवाड म्हणाले. दरम्यान, हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. त्यानंतर दहा जणांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा दिल्या.