Kisan Andolan News: सर्वसामान्य जनतेची ताकद देशाला कळली; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला

| Updated on: Nov 19, 2021 | 2:16 PM

कृषी कायदे मागे घेण्याची केलेली घोषणा म्हणजे सर्वसामान्य माणूस या देशात काय करू शकतो आणि त्याची ताकद काय असते याचे उदाहरण आहे, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.

Kisan Andolan News: सर्वसामान्य जनतेची ताकद देशाला कळली; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला
cm uddhav thackeray
Follow us on

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही मोदी सरकारच्या कृषी कायदे मागे घेण्याच्या निर्णयावर टीका केली आहे. कृषी कायदे मागे घेण्याची केलेली घोषणा म्हणजे सर्वसामान्य माणूस या देशात काय करू शकतो आणि त्याची ताकद काय असते याचे उदाहरण आहे, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.

शेतकरी कायद्यांविरुद्ध देशभर विरोधाचं वातावरण होतं. आंदोलने सुरू होती आणि आजही सुरूच आहेत. आपल्या सर्वांचे पोट भरणाऱ्या अन्नदात्यांचे यात नाहक बळी गेले आहेत. पण या अन्नदात्याने आपली शक्ती दाखवून दिली, त्यांना माझं त्रिवार वंदन. जे वीर या आंदोलनात प्राणास मुकले त्यांना मी यानिमित्तानं नम्र अभिवादन करतो, असं मुख्यमंत्री म्हणाले.

आता पुढचे निर्णय विश्वासात घेऊनच घ्या

असो, आता सरकारला उपरती झाली, आणि हे कायदे मागं घेण्याची घोषणा पंतप्रधानांनी आज गुरू नानक जयंतीच्या निमित्तानं केली. त्याचं मी प्रथम तर स्वागत करतो. महाविकास आघाडीनं या कृषी कायद्यांविरुद्ध आपली भूमिका असल्याचं वारंवार सांगितलं आहे. शिवाय मंत्रिमंडळात, विधिमंडळात देखील या कायद्याच्या दुष्परिणामावर चर्चा केली आहे. केंद्राने यापुढं असे कायदे आणण्यापूर्वी सर्व विरोधी पक्ष तसेच संबंधित संघटना यांना विश्वासात घेऊन संपूर्ण देशाच्या दृष्टीने हिताचा निर्णय घ्यायला हवेत. म्हणजे आज जी नामुष्की ओढवली आहे असं पुढे होणार नाही. हे कायदे मागे घेण्याची तांत्रिक प्रक्रियाही लवकरात लवकर होईल अशी माझी अपेक्षा आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

अहिंसा, सत्याग्रहाचा विजय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही केंद्रीय कृषी कायदे मागे घेण्याचा घेतलेला निर्णय शेतकरी एकजुटीचा, महात्मा गांधीजींनी दाखवलेल्या अहिंसा, सत्याग्रहाच्या मार्गाचा विजय आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान योग्य निर्णयाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधानांचे आभार मानले आहेत. शांततामय मार्गाने दिलेल्या प्रदीर्घ लढ्याबद्दल आंदोलक शेतकऱ्यांचेही त्यांनी आभार मानले. शेतमालाला किमान आधारभूत दर देण्याचा कायदा केंद्रसरकारने करावा ही मागणीही लवकर मान्य व्हावी, शिवाय लोकशाहीत लोकेच्छेचाच विजय होतो, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे, असंही त्यांनी सांगितलं.

हुकूमशाही अखेर झुकली

झालेली चूक सुधारत केंद्रसरकारने शेतकरीविरोधी असलेले कृषी कायदे मागे घेत असल्याची घोषणा आज सकाळी केली. लोकशाहीसमोर आज हुकूमशाही अखेर झुकली, अशी प्रतिक्रिया देत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी शेतकऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

देशातील शेतकऱ्यांचा विरोध असताना तीन काळे कृषी कायदे करून या देशातील शेतकऱ्यांना पुन्हा एकदा गुलामगिरीत ढकलण्याचा भाजप सरकारचा डाव होता. देशातील शेतकऱ्यांनी या विरोधात प्राणपणाने लढा दिला आणि त्यामुळेच आज देशातील या हुकूमशाही सरकारला अखेर शेतकऱ्यांसमोर झुकावे लागले. शेतकऱ्यांच्या या लढ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पहिल्यापासून बाजूने लढत होता असेही जयंत पाटील म्हणाले. जवळपास 630 शेतकऱ्यांनी बलिदान दिल्यानंतर सरकारने हे कायदे परत घेतले आहेत. येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जरी हा निर्णय घेतला असला तरी या काळ्या कायद्यांमधील तरतुदी वेगवेगळ्या मार्गांनी अंमलात आणण्याचा प्रयत्न पुन्हा केंद्रसरकारने करू नये, असा सल्लाही पाटील यांनी दिला.

संबंधित बातम्या:

निवडणुकीत किमत चुकवावी लागेल म्हणून कायदे मागे, उशिरा का होईना शहाणपण आलं; पवारांचा मोदी सरकारला टोला

कृषी कायदे लवकर मागे घेतले असते, तर हजारो शेतकऱ्यांचे प्राण वाचले असते; भुजबळांचे मोदींवर शरसंधाण

Farm Laws Protest: शेतकऱ्यांचा विरोध कसा सुरू झाला?, जाणून घ्या थोडक्यात शेतकरी आंदोलनाचा प्रवास