अजय देवगणसोबत मुख्यमंत्री ‘तान्हाजी’ चित्रपट पाहणार

| Updated on: Jan 21, 2020 | 10:25 AM

मुंबईतील 'प्लाझा' चित्रपटगृहात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अजय देवगणसोबत 'तान्हाजी' चित्रपटाचा खेळ पाहणार आहेत.

अजय देवगणसोबत मुख्यमंत्री तान्हाजी चित्रपट पाहणार
Follow us on

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज बहुचर्चित ‘तान्हाजी – द अनसंग वॉरिअर’ चित्रपट पाहणार आहेत. चित्रपटात नरवीर तानाजी मालुसरेंची मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता अजय देवगणसोबत मुख्यमंत्री चित्रपटाचा आनंद (CM to watch Tanhaji with Ajay Devgn) लुटणार आहेत.

मुंबईतील ‘प्लाझा’ चित्रपटगृहात आज (मंगळवारी) संध्याकाळी सहा वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मुंबई महापालिकेचे अधिकारी आणि नगरसेवकांसाठी ‘तान्हाजी’ चित्रपटाच्या विशेष खेळाचं आयोजन करण्यात आलं आहे.

राष्ट्रवादीचे नेते आणि अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीही काल नाशिकमध्ये ‘तान्हाजी’ सिनेमा पाहिला. भुजबळांनी ‘तान्हाजी’च्या पोस्टरपुढे उभं राहून सेल्फीही काढला होता. आता मुख्यमंत्रीही हा सिनेमा पाहतील.

‘तान्हाजी’ सिनेमात अजय देवगण, सैफ अली खान, काजोल, शरद केळकर, अजिंक्य देव, देवदत्त नागे या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. कोंढाणा मोहीम फत्ते करताना वीरमरण आलेल्या तानाजी मालुसरेंचा गौरवशाली इतिहास ‘तान्हाजी’ सिनेमातून रुपेरी पडद्यावर साकारण्यात आला आहे.

प्रेक्षकांनी ‘तान्हाजी’ चित्रपट डोक्यावर घेतला असून दहा दिवसात दीडशे कोटींचा गल्ला जमवण्यात चित्रपटाला यश आलं आहे. महाराष्ट्रात ‘तान्हाजी’ चित्रपट ‘टॅक्स फ्री’ करावा अशी मागणी वारंवार केली जात आहे. आता बारा दिवसांनी चित्रपट करमुक्त होणार का, हे पाहणं उत्सुकतेचं आहे.

दरम्यान, ‘तान्हाजी द अनसंग वॉरिअर’ या चित्रपटात दाखवण्यात आलेल्या ऐतिहासिक कथेशी सहमत नसल्याचं मत चित्रपटात उदयभानची व्यक्तिरेखा साकारणारा अभिनेता सैफ अली खान याने व्यक्त केलं आहे. चित्रपट चालण्यासाठी राजकीय कथा बदलून दाखवण्यात आली आहे. हे अत्यंत धोकादायक आहे, असं सैफ एका मुलाखतीत म्हणाला होता.

CM to watch Tanhaji with Ajay Devgn