‘काँग्रेसमध्ये पार्ट2? कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम’, थोरात-पटोले वादावर नवं ट्विट, हायकमांड काय निर्णय घेणार?

| Updated on: Feb 06, 2023 | 9:27 PM

महाराष्ट्र काँग्रेसमध्ये (Maharashtra Congress) आता दोन गट पडल्याचं स्पष्टच झालंय. कारण काँग्रेसच्या प्रवक्त्या हेमलता पाटील (Hemlata Patil) यांनी याबाबतचं ट्विट केलंय.

काँग्रेसमध्ये पार्ट2? कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम, थोरात-पटोले वादावर नवं ट्विट, हायकमांड काय निर्णय घेणार?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : महाराष्ट्र काँग्रेसमध्ये आता दोन गट पडल्याचं स्पष्टच झालंय. कारण काँग्रेसच्या प्रवक्त्या हेमलता पाटील (Hemlata Patil) यांनी याबाबतचं ट्विट केलंय. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यात पक्षांतर्गत वाद सुरु असल्याचं स्पष्ट झालंय. त्यातून महाराष्ट्र काँग्रेसमध्ये (Maharashtra Congress) दोन गट पडल्याचं चित्र आहे. पण थोरात आणि पटोलेंच्या वादामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण असल्याची माहिती समोर आलीय. विशेष म्हणजे काँग्रेसच्या हेमलता पाटील यांनी स्वत: या वृत्ताला दुजोरा दिलाय. हेमलता पाटील यांनी ट्विट करत काँग्रेस कार्यकर्त्याच्या होत असलेल्या घालमेलीबद्दल माहिती दिलीय. याशिवाय त्यांनी ‘टीव्ही 9 मराठी’लादेखील याविषयी प्रतिक्रिया दिलीय.

“बाळासाहेब थोरात यांचं पत्र वाचण्यात आलं. त्यांची मुलाखत बघितली. भाजपने शिवसेनेला गिळंकृत केलं. अशा पक्षाशी सामना करताना काँग्रेसमध्ये ही पार्ट 2 सुरु झालेलं आहे का? ज्या पद्धतीने हे सगळं वातावरण तयार झालेलं आहे त्या संदर्भात माझं ट्विट होतं”, अशी प्रतिक्रिया हेमलता पाटील यांनी दिली.

हे सुद्धा वाचा

हेमलता पाटील ट्विटमध्ये नेमकं काय म्हणाल्या?

“आज सकाळी-सकाळी फोन आला. ताई आपण बाळासाहेबांच्या कॉंग्रेसचे काम करायचे की नानांच्या कॉंग्रेसचे?”आता काय उत्तर देऊ? कप्पाळ”, अशी उद्विग्नता हेमलता पाटील यांनी ट्विटवर व्यक्त केलीय.

हेमलता यांनी याविषयी आणखी एक ट्विट केलंय. “गेले चार महिने अतिशय खालच्या थराला जाऊन शिवसेनेतून पळ काढून (so called original निष्ठावंतानी)आपल्याच घराची पार इज्जत काढली. मग कॉंग्रेस तर का मागे राहील? सगळंच अगम्य आहे”, असं देखील ट्विट हेमलता पाटील यांनी केलंय.

बाळासाहेब थोरात यांचं नाना पटोलेंविरोधात हायकमांडला पत्र

नाशिक पदवीधर निवडणुकीदरम्यान काँग्रेस पक्षात दोन गट निर्माण झाले आहेत. आमदार सत्यजीत तांबे यांना उमेदवारी देण्यावरुन हे दोन गट पडल्याचं चित्र आहे.

विशेष म्हणजे सत्यजीत तांबे यांनी नाना पटोले यांच्यावर चुकीचे एबी फॉर्म पाठवल्याचा आरोप केलाय. तर नाना पटोलेंनी ते आरोप फेटाळले आहेत. तसेच संबंधित प्रकरण जास्त ताणू नका. नाहीतर आपल्याकडे सगळा मसाला असल्याचा इशारा नाना पटोलेंनी तांबे यांना दिलाय.

दुसरीकडे बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस हायकमांडला पत्र पाठवलं आहे. यामध्ये त्यांनी नाना पटोले यांच्याबद्दल तक्रार केल्याची माहिती समोर आलीय. याशिवाय माजी आमदार आशिष देशमुख यांनीही नाना पटोलेंव टीका केलीय. तसेच काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही तांबे यांची बाजू घेतलीय. त्यामुळे काँग्रेस पक्षात दोन गट तयार झाल्याचे चित्र आहे हे स्पष्ट आहे.

काँग्रेस हायकमांड काय निर्णय घेणार?

महाराष्ट्र काँग्रेसमध्ये सुरु असलेल्या गृहकलहावर आता काँग्रेस हायकमांड काय निर्णय घेते? हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. नाना पटोले यांनी आपल्याकडे सगळा मसाला असल्याचा इशारा दिलाय. त्यामुळे हायकमांड नाना पटोले यांच्यावर कारवाई करतं की पाठराखण करुन इतरांची समजूत घालण्यात येईल हे आता लवकरच लक्षात येईल.