ठाकरेंच्या शिलेदाराला काँग्रेसकडून मोठी ऑफर, महाविकास आघाडीत काय घडणार?

| Updated on: Apr 10, 2024 | 8:26 PM

उद्धव ठाकरे यांच्या शिलेदाराला काँग्रेसकडून मोठी ऑफर देण्यात आली आहे. महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला अधिकृतपणे जाहीर झालाय. पण त्यानंतरही पडद्यामागे हालचाली घडत आहेत. ठाकरे गटाचा मुंबईतल्या एका जागेवर दावा आहे. यासाठी ठाकरे गटाकडून काँग्रेसकडे मागणी करण्यात आलीय. या मागणीनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उद्धव ठाकरेंच्या शिलेदाराला काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवण्याचं आवाहन केलं आहे.

ठाकरेंच्या शिलेदाराला काँग्रेसकडून मोठी ऑफर, महाविकास आघाडीत काय घडणार?
उद्धव ठाकरे आणि नाना पटोले
Follow us on

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाची जागा शिवसेना ठाकरे गटाला मिळावी यासाठी शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांची भेट घेतली आहे. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेना नेते विनोद घोसाळकर यांनी काँग्रेसच्या चिन्हावर लढावं, असा प्रस्ताव काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी घोसाळकर यांना दिला आहे. मात्र आपण शिवसेनेकडूनच निवडणूक लढू, असं स्पष्ट मत घोसाळकर यांनी व्यक्त केलं आहे. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ हा शिवसेना ठाकरे गटाला सोडावा, असा आग्रह उत्तर मुंबईतील शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. आणि त्यासाठीच नेत्यांच्या भेटीगाठी पदाधिकाऱ्यांकडून घेतल्या जात आहेत. काँग्रेस पक्षाकडे या लोकसभा मतदारसंघात उमेदवारच नसल्याने ही जागा शिवसेना ठाकरे गटाला लढू द्यावी, अशी भूमिका पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे.

शिवसेनेला उत्तर मुंबईची जागा मिळावी म्हणून उत्तर मुंबईच्या पदाधिकाऱ्यांची ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी बैठक पार पडली. या बैठकीला स्वतः विनोद घोसाळकर उपस्थित होते. तर दुसरीकडे उत्तर मुंबईतल्या काही ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे.

विनोद घोसाळकर नेमकं काय म्हणाले?

“उत्तर मुंबईच्या पदाधिकाऱ्यांनी आज उद्धव ठाकरेंची भेट घेतली. आमचं म्हणणं उद्धव ठाकरेंसमोर मांडलं. काल पत्रकार परिषद झाल्यावर नाना पटोले यांनी मला विचारलं होत की तुम्ही उत्तर मुंबई काँग्रेसच्या पंजावर लढा. पण मी त्यांना नाही म्हटलं. कारण एवढे वर्ष आम्ही उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहोत. केवळ लोकसभेला जाणं योग्य वाटत नाही. आम्ही तयारी सुरु केली होती तेव्हा कसं काम करणार? हे देखील सांगितलं. दोन दिवसात निर्णय अपेक्षित आहे. दोन दिवसात निर्णय होईल”, अशी प्रतिक्रिया विनोद घोसाळकर यांनी दिली.

हे सुद्धा वाचा

“नाना पटोले यांनी काँग्रेसच्या चिन्हावर लढण्याची ऑफर दिली होती, असं ठाकरे गटाचे नेते विनोद घोसाळकर म्हणाले. “महाविकास आघाडीकडून काल ती जागा काँग्रेसला जाहीर झाली आहे. सगळ्यांचं असं मत आहे की, शिवसेना लढली तर भाजपचा पराभव होईल, अर्थात इंडिया आघाडीचं एक सीट वाढेल. त्यादृष्टीकोनाने प्रयत्न सुरु आहेत”, अशी प्रतिक्रिया विनोद घोसाळकर यांनी दिली आहे.