एका रुग्णामागे 20 ते 30 जणांची तपासणी करा; राजेश टोपे यांचे आदेश

| Updated on: Feb 19, 2021 | 8:10 AM

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने राज्य सरकार पुन्हा एकदा अॅक्शन मोडमध्ये आले आहे. (Contact tracing efforts must be improved says rajesh tope)

एका रुग्णामागे 20 ते 30 जणांची तपासणी करा; राजेश टोपे यांचे आदेश
राजेश टोपे, आरोग्य मंत्री
Follow us on

मुंबई: राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने राज्य सरकार पुन्हा एकदा अॅक्शन मोडमध्ये आले आहे. कोरोना रुग्ण आढळल्यास प्रत्येक कोरोना रुग्णामागे 20 ते 30 जणांची तपासणी करा, असे आदेशच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. (Contact tracing efforts must be improved says rajesh tope)

राज्यातील कोरोनाची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी राजेश टोपे यांची जिल्हाधिकारी आणि पालिका आयुक्तांसोबत चर्चा झाली. यावेळी त्यांनी सर्व जिल्हाधिकारी आणि पालिका आयुक्तांना हे आदेश दिले. तसेच ज्या जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.

कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचं प्रमाण वाढवा

सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या जिल्ह्यांमध्ये कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाण वाढवा. एका रुग्णामागे किमान 20 ते 30 निकट सहवासितांची तपासणी करुन चाचण्यांचे प्रमाण वाढवा आणि पॉझिटिव्हिटी दर 10% पेक्षा खाली आणावा, असे निर्देश टोपे यांनी संबंधित जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांना दिले आहेत.

अमरावतीचा पॉझिटिव्ही दर सर्वाधिक

अमरावती जिल्ह्याचा दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 48 टक्के असून आठवड्याचा 35 टक्के आहे. तर यवतमाळ जिल्ह्याचा दैनंदिन आणि आठवड्याचा पॉझिटिव्हिटी दर 15 टक्के आहे, असंही त्यांनी सांगितलं. तर संपूर्ण राज्याचा कोरोना रुग्ण संख्येचा दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर हा 8.8 टक्के असून आठवड्याचा पॉझिटिव्हिटी दर 7.76 टक्के एवढा आहे. अकोला जिल्ह्याचा कोरोना रुग्ण संख्येचा दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर हा 32 टक्के असून आठवड्याचा पॉझिटिव्हिटी दर 24 टक्के आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

 

‘एसएमएस’वर भर द्या

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून आज तीन ते चार महिन्यांच्या कालावधीनंतर कोरोनाच्या रुग्ण संख्येने 5 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. नागरिकांनी ही बाब गांभिर्याने घेऊन ‘एसएमएस’ चा (सोशल डिस्टंसिंग,मास्क आणि सॅनिटायजरचा वापर) अवलंब करावा, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

पाच हजार नवे रुग्ण आढळले

दरम्यान, राज्यात काल गुरुवारी 5427 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली. तसेच नवीन 2543 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 19,87,804 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 40,858 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 95.5% झाले आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे. (Contact tracing efforts must be improved says rajesh tope)

टोपेंना कोरोना

दरम्यान, राजेश टोपे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्विट करून तशी माहितीही दिली आहे. ‘माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने कोरोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईल. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणे दिसल्यास तत्काळ आपली कोरोना चाचणी करून घ्यावी’, असं आवाहन त्यांनी केलं आहे. (Contact tracing efforts must be improved says rajesh tope)

 

संबंधित बातम्या:

मोठी बातमी : राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना कोरोनाची लागण, दिवसभरात राष्ट्रवादीच्या तीन बड्या नेत्यांना कोरोना

अमरावती, यवतमाळ, अकोला जिल्ह्यांत तातडीने कंटेनमेंट झोन जाहीर करा, मुख्य सचिवांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

मोठी बातमी : 5 पेक्षा जास्त रुग्ण आढळल्यास इमारत सील करणार, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर BMC च्या नव्या गाईडलाईन्स जारी

नागपुरात कोणत्याही कार्यक्रमासाठी आठ दिवसआधी परवानगी बंधनकारक; संचारबंदीचीही मागणी वाढली

(Contact tracing efforts must be improved says rajesh tope)