डॉक्टर, नर्स ते वार्डबॉय, दादरच्या शुश्रुषा रुग्णालयात 8 कर्मचाऱ्यांना ‘कोरोना’

| Updated on: Apr 12, 2020 | 11:20 AM

शुश्रुषा रुग्णालय प्रतिबंधित केलं असलं, तरी कर्मचाऱ्यांची बाहेर ये-जा सुरुच आहे. त्यामुळे फैलाव होण्याची शक्यता अधिक आहे. (Dadar Shushrusha Hospital Eight New Corona Patients)

डॉक्टर, नर्स ते वार्डबॉय, दादरच्या शुश्रुषा रुग्णालयात 8 कर्मचाऱ्यांना कोरोना
Follow us on

मुंबई : मुंबईतील दादरमध्ये ‘कोरोना’चा विळखा घट्ट होताना दिसत आहे. शुश्रुषा रुग्णालयात 8 जणांना ‘कोरोना’ची लागण झाल्याचं समोर आलं आहे. हे सर्व जण डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय असे शुश्रुषा रुग्णालयाचेच कर्मचारी आहेत. (Dadar Shushrusha Hospital Eight New Corona Patients)

विशेष म्हणजे हे  कोरोनाग्रस्त 24 ते 37 वर्ष वयोगटातील आहेत. यामध्ये दोन डॉक्टर, तर सहा नर्स आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. हे आठ जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल काल रात्री 10 वाजताच आला, मात्र अद्याप उपचार सुरु झाले नाहीत, असा दावा कर्मचाऱ्यांनी केला आहे. मुंबई महापालिका प्रशासन, पोलिस यांना बोलावूनही, कोणी दखल न घेतल्याचा या कर्मचाऱ्यांचा आरोप आहे.

शुश्रुषा रुग्णालय प्रतिबंधित केलं असलं, तरी कर्मचाऱ्यांची बाहेर ये-जा सुरुच आहे. त्यामुळे फैलाव होण्याची शक्यता अधिक आहे. रुग्णालयात डायलिसिस उपचार उद्या सुरु होणार होते, मात्र त्याआधीच 8 कर्मचाऱ्यांना कोरोना झाल्याचं समोर आलं आहे. एकूण 81 जणांना क्वारंटाइन  केले आहे. तर 22 स्टाफच्या कोरोना चाचणीचे अहवाल येणं बाकी आहे.

‘शुश्रुषा’मध्ये अॅडमिट असलेल्या सर्व रुग्णांना डिस्चार्ज देऊन दुसऱ्या रुग्णालयात नेण्याचे आदेश पालिकेने दोन दिवसांपूर्वीच दिले होते. तसंच नव्याने कुणालाही अॅडमिट न करण्यास सांगितले होते. आधी दोन नर्स कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याने सर्वच नर्सेसना रुग्णालयातच क्वारंटाईन करुन त्यांचीही चाचणी करण्यात आली होती. (Dadar Shushrusha Hospital Eight New Corona Patients)

दादरमध्ये 19 कोरोनाग्रस्त

दादरमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या 19 वर पोहोचली आहे. चार दिवसांपूर्वी दादरमध्ये तीन कोरोनाग्रस्त सापडले होते. तर, शुश्रुषा रुग्णालयातील दोन परिचारिकांना आणि दादरमधील 80 वर्षीय वृद्धालाही ‘कोरोना’ची लागण झाल्याचं शुक्रवारी समोर आलं होतं. कालच्या दिवसात (शनिवार) कोरोनाचे पाच नवे रुग्ण आढळले होते. यामध्ये एकाच कुटुंबातील चौघांचा समावेश आहे. आता शुश्रुषा रुग्णालयातील 8 कर्मचाऱ्यांची भर पडल्याने दादरमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 19 वर गेला आहे.

महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. हा आकडा 1761 वर पोहोचला आहे. त्यापैकी सर्वाधिक कोरोना रुग्ण हे मुंबईत आहेत. एकट्या मुंबईतच कोरोनाचे 1146 रुग्ण आढळले आहेत, तर शहरातील 76 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.