BIG BREAKING | देवेंद्र फडणवीस अचानक राज ठाकरे यांच्या भेटीसाठी ‘शिवतीर्थ’वर दाखल

| Updated on: May 29, 2023 | 11:02 PM

आगामी महापालिका निवडणुकांमध्ये मनसेची भाजपसोबत युती होईल, अशी चर्चा रंगली होती. पण मध्यंतरी राज ठाकरे यांनी भाजपवरही टीका केलेली. त्यामुळे याबाबतच्या चर्चांना पूर्णविराम लागलेला. पण आज पुन्हा वेगळंच काहीतरी बघायला मिळत आहे.

BIG BREAKING | देवेंद्र फडणवीस अचानक राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थवर दाखल
Follow us on

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी त्यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे रात्री दहा ते साडे दहा वाजेच्या सुमारास ही भेट होत असल्याने या भेटीला जास्त महत्त्व प्राप्त झालं आहे. नेमकं असं काय कारण असेल की, यावेळेला या दोन बड्या नेत्यांची भेट होत आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

राज ठाकरे हे गेल्या काही दिवसांपासून पक्षबांधनीच्या कामाला लागले आहेत. त्यांच्याकडून पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. यासाठी ते वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जात आहेत, पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहेत. तसेच सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेविरोधातही रोखठोक भूमिका मांडत आहेत.

हे सुद्धा वाचा

राज ठाकरे यांचा भाजपवर निशाणा

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल काही दिवसांपूर्वी जाहीर झाला. या निवडणुकीत काँग्रेसला सर्वाधिक जागांवर यश मिळालं. कर्नाटकात काँग्रेसची एकहाती सत्ता स्थापन झाली. काँग्रेसला मिळालेल्या या यशावर राज ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली होती. त्यांनी काँग्रेसचं अभिनंदन केलं होतं. तसेच भाजपवर निशाणा साधला होता. “आमचं कोणीही काहीही बिघडवू शकत नाही, असे मानणाऱ्यांसाठी कर्नाटकाचा निकाल आणि पराभव महत्त्वाचा आहे”, असं म्हणत राज ठाकरे यांनी भाजपवर टीका केली होती. त्यावर भाजपकडूनही प्रत्युत्तर देण्यात आलं होतं. असं असलं तरी देवेंद्र फडणवीस राज ठाकरे यांच्या भेटीसाठी गेले आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे.

नेमकी भेट का?

मुंबई महापालिकेची आगामी काळात निवडणूक असणार आहे. ही निवडणूक भाजप, शिवसेना आणि ठाकरे गटासाठी सर्वात जास्त प्रतिष्ठेची असणार आहे. या निवडणुकीत ठाकरे गटाच्या हातून सत्ता हिसकवण्यासाठी भाजप सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. मुंबई महापालिकेत भाजपचाच महापौर बसवण्याचा निर्धार देवेंद्र फडणवीस आणि इतर भाजप नेत्यांनी केला आहे. त्यासाठी पडद्यामागे महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून राज ठाकरे आणि फडणवीस यांच्या भेटीकडे पाहिलं जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि भाजपची जवळीक वाढताना दिसत होती. भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांनी याआधी सुद्धा राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जावून त्यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकांमध्ये मनसेची भाजपसोबत युती होईल, अशी चर्चा रंगली होती. पण मध्यंतरी राज ठाकरे यांनी भाजपवरही टीका केलेली. त्यामुळे याबाबतच्या चर्चांना पूर्णविराम लागलेला. पण आज पुन्हा वेगळंच काहीतरी बघायला मिळत आहे. त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात खरंच नवीन समीकरण बघायला मिळतं का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.