राष्ट्रवादीसोबत युती, धुसफूसची चर्चा, देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांना काय सांगितलं?

| Updated on: Jul 07, 2023 | 11:15 PM

भाजप आमदारांमध्ये नाराजी असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. विशेष म्हणजे हीच नाराजी दूर करण्यासाठी भाजपची मुंबईत महत्त्वाची बैठक पार पडल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पक्षाच्या आमदारांना काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.

राष्ट्रवादीसोबत युती, धुसफूसची चर्चा, देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांना काय सांगितलं?
Follow us on

मुंबई : भाजप आमदारांची गरवारे क्लब येथे महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत सर्व आमदार उपस्थित होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी आमदारांना संबोधित केलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार सत्तेत आल्यामुळे भाजप आमदारांमध्येही नाराजीची चर्चा आहे. विशेष म्हणजे पुण्यातल्या पदाधिकाऱ्यांनी या विषयी जाहीर नाराजी देखील व्यक्त केली आहे. त्यानंतर आज भाजप आमदारांची मुंबईत महत्त्वाची बैठक पार पडली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होईल, असं आश्वासन दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या बैठकीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, अशी प्रतिक्रिया दिलीय.

“भाजप पक्ष फोडत नाही”, असं देवेंद्र फडणवीस या बैठकीत म्हणाले. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची साथ देण्यासाठी सोबत येणाऱ्यांचं स्वागत करा”, असंही फडणवीस यावेळी म्हणाले. तसेच “मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल”, असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांना दिलं. “पक्ष बळकट करण्यासाठी कामाला लागा. संपर्क से समर्थन अभियान जोमाने राबवा”, अशी सूचना देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांना दिली.

देवेंद्र फडणवीस बैठकीत नेमकं काय म्हणाले?

“राष्ट्रवादीला सोबत घेणे हा वरिष्ठांचा निर्णय आहे. तो आपल्याला मान्य करून स्वागत करायला हवं. मोदींना साथ देण्यासाठी सोबत येणाऱ्यांचे स्वागत करा”, असं फडणवीस या बैठकीत म्हणाले.

“पक्ष बळकट करण्यासाठी कामाला लागा. मोदी @9 अभियानाला आणखी 10 दिवस मुदतवाढ द्या. संपर्क से समर्थन अभियान जोमाने राबवा. पक्षाने दिलेले सर्व कार्यक्रम खालपर्यंत गेले पाहिजे. संघटना जोमाने काम करीत असताना लोकप्रतिनिधींना सुद्धा त्याला तितकीच भक्कम साथ द्यावी लागेल. तुमची ताकद एकत्र करावी लागेल. समाजातील विविध स्तरातील लोकांना भेटा”, असं देवेंद्र फडणवीस बैठकीत म्हणाले.

“विरोधी कितीही एक आले तरी त्याने फायदा होणार नाही. भाजपा पक्ष फोडत नाही, पण मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून कुणी येत असेल तर त्यांना सोबत घेण्याला विरोध नाही. मोदींना साथ देण्यासाठी सोबत येणाऱ्यांचे स्वागत करा. विस्तार सुद्धा आपण लवकरच करू”, असंही फडणवीस यांनी आमदारांना सांगितलं.

चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?

“कोणकोणत्या विधानसभेत काय-काय कामे झाली आहेत, याचा संपर्ण लेखाजोखा विधानसभेत द्यायचा आहे. म्हणून सर्वांना पुस्तक घेऊन बोलावलं. त्यांच्या मतदारसंघाच्या कार्यक्रमाचे आम्ही पुस्तकं घेतली आहेत. आता 9 तारखेला मी आणि आशिष शेलार हैदराबादला जाणार आहोत. आम्ही हैदराबादच्या बैठकीत विषय मांडणार आहोत. त्याचा संपूर्ण अहवाल आम्ही बैठकीत घेतला”, अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी बैठकीनंतर दिली.

“मला अभिमान आहे की, आमच्या सर्व विधानसभेच्या सदस्यांनी आणि विधान परिषदेच्या सदस्यांनी प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वात मोदी@9 कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाचं पूर्ण सादरीकरण आम्ही हैदराबादला करणार आहोत. आम्ही राष्ट्रीय कार्यकारिणीत सर्व मांडणार आहोत”, असं बावनकुळे यांनी सांगितलं.

“नाराजीचा विषय चर्चिला नाहीय. राष्ट्रीय कार्यकारिणीची परवा हैदराबादला बैठक आहे. या बैठकीत मोदी@9 कार्यक्रमाचा लेखाजोखा मांडण्याविषयी ही बैठक होती. कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. आमच्या पक्षात कोणीही नाराज राहत नाहीत. आमच्या पक्षात वरिष्ठांनी घेतलेला निर्णय किंवा देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला निर्णय सर्वांना मान्य असतो. केवळ मोदी@9 याच विषयी सर्व चर्चा झाली”, असं बावनकुळे यांनी सांगितलं.