गलिच्छ शिविगाळ, कुटुंबापर्यंत विधानभवनातील वॉर, रोहित पवारांच्या आरोपांनी एकच खळबळ, जितेंद्र आव्हाडांच्या पत्नीचा दावा ऐकला का?

Jitendra Awhad : गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील राजकारणाचा पडता क्रम हा चिंतेचा विषय ठरला आहे. कायदे मंडळात शिरजोरी करणारे नेते, कार्यकर्ते कमी होते म्हणून की काय आता थेट आमदारांच्या कुटुंबियांनाच अश्लाघ्य शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे हे राजकारण चाललंय कुठे असा सवाल करण्यात येत आहे.

गलिच्छ शिविगाळ, कुटुंबापर्यंत विधानभवनातील वॉर, रोहित पवारांच्या आरोपांनी एकच खळबळ, जितेंद्र आव्हाडांच्या पत्नीचा दावा ऐकला का?
कुटुंबियांना शिवीगाळ
| Updated on: Jul 18, 2025 | 12:39 PM

दोन दिवसांपासून राज्याच्या कायदेमंडळची इभ्रत वेशीला टांगल्याचे चित्र उभ्या देशाने पाहिले. दोन आमदारांतील वादाचे पर्यवसन त्यांच्या कार्यकर्त्यांमधील हाणामारीत झाले. विधान भवनाच्या लॉबीत टोळी युद्ध पाहिल्यानंतर यापेक्षा आपली गावकी बरी म्हणण्याची वेळ आली आहे. गल्लीतील भाई-दादासारखी जुंपलेली ही लढाई कॅमेऱ्यात कैद झाल्याने महाराष्ट्र कुठे चालंलाय? असा संताप विरोधक व्यक्त करत आहेत. तर आता हे टोळी युद्ध थेट आमदाराच्या कुटुंबियांना, मुलीला गलिच्छ शिवीगाळ करण्यापर्यंत, धमकी देण्यापर्यंत पोहचल्याचा आरोप करण्यात येत आहे.

रोहित पवारांचा आरोप काय?

कारचा धक्का लागला यावरून आमदार जितेंद्र आव्हाड आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्यात शाब्दिक वाद पेटला. त्यानंतर विधानभवनाच्या लॉबीतच त्यांचे समर्थक आणि कार्यकर्ते एकमेकांना भिडले. इतके कमी होते की काय? आता या वादात जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबियांना पण ओढण्यात आले आहे. पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी आव्हाड यांच्या मुलीला गलिच्छ शिवीगाळ केल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या आई-बहिणीवरून पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी शिवीगाळ केल्याचा गंभीर आरोप रोहित पवार यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

ऋता आव्हाड यांचा संताप

या संपूर्ण प्रकरणावर ऋता आव्हाड यांनी संतापाला वाट मोकळी करुन दिली. टीव्ही 9 मराठीशी बोलताना त्यांनी या प्रकारावर संताप व्यक्त केला. नताशाला त्यांनी ट्विटरवर गलिच्छ भाषेत शिवीगाळ केल्याचे त्यांनी सांगितले. आपण कोणत्या लोकप्रतिनिधींना निवडून देतोय असा सवाल त्यांनी केला. ही त्यांच्या नेत्याची संस्कृती असल्याचा आरोप त्यांनी केला. तर कालचा राडा ज्यांनी घडवून आणला, त्या सर्वांना गृहखात्याने पकडून आणल्यास त्यांचे नाव इतिहासात सुवर्णअक्षरात लिहिले जाईल असा टोला त्यांनी लगावला. पूर्वी विधानभवनात, परिसरात आमदारांच्या कुटुंबियांना सहज प्रवेश मिळत नव्हता, पण आता तर कसल्या प्रकारची लोकं तिथे येतात हे दिसून आल्याचं त्या म्हणाल्या. त्यांनी एकूणच या घडामोडींवर त्यांच्या संतापाला वाट मोकळी करून दिली.