ईडीची धाड, बीएमसीच्या माजी अधिकाऱ्याकडे घबाड, दुबईतही घर

| Updated on: Jan 18, 2020 | 12:28 PM

अंमलबजावणी संचलनालयाने (ED) शुक्रवारी (17 जानेवारी) मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) माजी मुख्य अभियंत्याच्या घरावर आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी छापा टाकला (ED raid on ex chief engineer of BMC).

ईडीची धाड, बीएमसीच्या माजी अधिकाऱ्याकडे घबाड, दुबईतही घर
Follow us on

मुंबई : अंमलबजावणी संचलनालयाने (ED) शुक्रवारी (17 जानेवारी) मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) माजी मुख्य अभियंत्याच्या घरावर आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी छापा टाकला (ED raid on ex chief engineer of BMC). या कारवाईत आरोपी अधिकाऱ्याने अशाच संशयास्पद व्यवहारातून दुबईत घेतलेल्या घराचेही कागदपत्रे सापडली आहेत. त्यामुळे या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरु आहे. ईडीने या अधिकाऱ्याची कसून चौकशी करण्यास सुरुवात केली आहे (ED raid on ex chief engineer of BMC).

संबंधीत आरोपी अभियंता मुंबई महानगरपालिकेच्या इमारत प्रस्ताव आणि विकास आराखडा याच्याशी संबंधित महत्त्वाच्या विभागात कार्यरत होता. ईडीने कारवाई केलेल्या अधिकाऱ्याचं नाव उघड केलेलं नाही. मात्र, संबंधित अधिकारी 7 वर्षांपूर्वी महानगरपालिकेतून निवृत्त झाल्याचं ईडीने मान्य केलं आहे.

आरोपी अधिकाऱ्यांच्या घरात छापा टाकला असता दुबईत बेकायदेशीरपणे खरेदी केलेल्या घराची कागदपत्रे मिळाल्याची माहिती ईडीने दिली आहे. आपण हे 89 चौरस मीटरचं घर 2012 मध्ये दुबईतील पार्क आईसलँड येथे 70 लाख रुपयांमध्ये खरेदी केल्याची माहिती आरोपी अधिकाऱ्याने दिली आहे. हे घर आरोपी अधिकारी, त्याची पत्नी आणि मुलाच्या नावावर आहे.

आरोपी अधिकाऱ्याने या घराची खरी किंमत समजेल आणि हा व्यवहार कसा झाला याविषयी कोणतेही कागदपत्र सादर केलेले नाही. दुबईतील घर खरेदी करण्यासाठी पैशांची देवाणघेवाण कशी झाली, यासाठी देण्यात आलेल्या पैशांच्या मिळकतीचा स्त्रोत काय होता याची ईडी कसून चौकशी करत आहे. ईडीने गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केल्याचंही सांगण्यात येत आहे.

ईडीच्या छाप्यात हेही उघड झालं आहे की संबंधित दुबईतील घर सध्या भाड्याने देण्यात आलं असून त्यातून वार्षिक 13 लाख रुपयांचं उत्पन्न मिळत आहे. या अधिकाऱ्याने अमेरिकन नागरिक असलेल्या मुलीला 40 लाख पाठवल्याचीही माहिती ईडीला मिळाली आहे. त्यामुळे ईडीने आरोपी अधिकाऱ्याच्या उत्पन्नाचे सर्व स्त्रोत तपासण्यास सुरुवात केली आहे.