
राज्याच्या राजकारणात सध्या चढउतार दिसून येत आहे. त्याचे विविध परिणाम आणि परिपाक आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे 18 वर्षांनी एकाच मंचावर आले. तर आता शिवसेनेची दोन शक्कलं शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट कधी एकत्र येतो याची पण चर्चा सुरू आहे. सध्या या दोन्ही गटातून विस्तव सुद्धा जात नाही. पावसाळी अधिवेशनात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या सत्कार समारंभात उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकमेकांकडे ढुंकून सुद्धा पाहिले नाही. पण तरीही दोन्ही गटांनी एकत्र येण्याची चर्चा होत आहे.
सेनेच्या फुटीमुळे दानवे नाराज
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांना सेनेतील ही फूट जिव्हारी लागलेली आहे. या फुटीवरून ते नाराज आहेत. एका मजबूत पक्षाची अशी शक्कलं होणे दुर्भाग्यपूर्ण असल्याचे त्यांना वाटते. दोन्ही गटांनी पुन्हा एकदा एकत्र यायला हवे असे त्यांना वाटते.
पीटीआयने म्हटल्यानुसार, दानवे यांनी पक्ष फुटीवर भाष्य केले आहे. आम्ही काही सत्तेसाठी पैदा झालेलो नाही. सत्ता तर येते आणि जाते. पण संघटनेची एकजुटता हीच सर्वात मोठी ताकद आहे. कोणाची तरी शिवसेनाला नजर लागली आणि संघटना फुटली. हा घाव, ही जखम भरायला हवी. तो घाव भरून निघायला हवा, असे मोठे वक्तव्य दानवे यांनी केले आहे. एकजूटता हीच शिवसेनेची ताकद आणि ओळख होती. सर्व शिवसैनिकांनी एकत्र यायला हवे असे ते म्हणाले.
शिवसेनेतील फुट मोठी घटना
शिवसेनेत वर्ष 2022 मध्ये मोठा राजकीय भूकंप आला. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात 39 आमदारांनी बंडाचा झेंडा हाती घेतला आणि वेगळा गट तयार केला. त्यानंतर शिंदे यांनी भाजपासह सरकार स्थापन केले. पुढे या सरकारमध्ये राष्ट्रवादीचा अजित पवार यांच्या नेतृत्वातील गट सहभागी झाला. पूलाखालून बरंच पाणी वाहून गेलं. महाविकास आघाडीनंतर राज्यात महायुतीचा प्रयोग जनतेने पाहिला. पण शिवसेनेतील उभी फुट आजही अनेक शिवसैनिकांच्या जिव्हारी लागलेली आहे, हे स्पष्ट होते.
शिवसेना पुन्हा मजबूत करा
अंबादास दानवे यांनी सर्व शिवसैनिकांनी एकत्र यावे असे आवाहन केले आहे. पक्ष सत्तेत असावा अशी भावना दानवे यांनी व्यक्त केली. एक शिवसैनिक म्हणून शिवसेना पुन्हा मजबूत आणि पक्ष म्हणून पुढे यायला हवी. एकतेची आशा करणे वाईट नसल्याचे ते म्हणाले.