Eknath Shinde : भास्कर जाधवही बंडखोरी करणार? एकनाथ शिंदे म्हणतात, अद्याप संपर्क नाही!

बंडखोर आमदारांना शिवसेनेतर्फे नोटीस देण्यात आली आहे, त्यावर संताप व्यक्त करत शिंदे म्हणाले, की जे मायनॉरिटीमध्ये आहेत, त्यांनी अशाप्रकारच्या नोटीस काढणे हास्यास्पद आहे. हा रडीचा डाव आहे आणि पायाखालची वाळू सरकल्याची प्रचिती आहे.

Eknath Shinde : भास्कर जाधवही बंडखोरी करणार? एकनाथ शिंदे म्हणतात, अद्याप संपर्क नाही!
एकनाथ शिंदे/भास्कर जाधव
Image Credit source: tv9
| Updated on: Jun 24, 2022 | 5:57 PM

मुंबई : 50पेक्षा जास्त आमदार आमच्याकडे आहेत. म्हणजे जेवढे हवेत त्यापेक्षाही जास्त आमदार सोबत आहेत. त्यामुळे कुणी घाबरवण्याचा प्रयत्न करू नये, असा इशारा शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिला आहे. टीव्ही 9सोबत फोनवरून त्यांनी ही प्रतिक्रिया आणि इशारा दिला आहे. शिवसेनेचे (Shivsena) 40हून जास्त तर 12 अपक्ष सोबत असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. तर भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्याशी अद्याप कोणताही संपर्क झालेला नाही. त्यामुळे त्याविषयी कोणतेही मत व्यक्त करण्यास त्यांनी नकार दिला आहे. तर एकनाथ शिंदे आपल्यासोबत असलेल्या 50हून अधिक आमदारांसोबत आज बैठक घेत आहेत. आमदारांची ही बैठक झाल्यानंतरच आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

‘नोटीस देणे हास्यास्पद’

बंडखोर आमदारांना शिवसेनेतर्फे नोटीस देण्यात आली आहे, त्यावर संताप व्यक्त करत शिंदे म्हणाले, की जे मायनॉरिटीमध्ये आहेत, त्यांनी अशाप्रकारच्या नोटीस काढणे हास्यास्पद आहे. हा रडीचा डाव आहे आणि पायाखालची वाळू सरकल्याची प्रचिती आहे. डिसक्वॉलिफिकेशन करण्याचा तुम्हाला अधिकारच नाही. लोकशाहीत आकड्याला महत्त्व आहे. कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही. आम्ही कायदा मानणारे लोक आहोत, असे एकनाथ शिंदे म्हणाले. मुंबईत या. उद्धव ठाकरेंशी चर्चा करा, आम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडायला तयार आहोत, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले होते, त्यावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. लोकशाहीनुसार जी पावले उचलायला हवीत, त्यानुसारच आमची कार्यपद्धती असणार आहे. शरद पवारांनी दिलेल्या इशाऱ्याला घाबरत नाही. मुंबईत येणारच. विधानसभेच्या ज्या काही कायदेशीर बाबी आहेत, त्या कराव्याच लागणार आहेत.

काय म्हणाले होते भास्कर जाधव?

आयुष्यात दोनदा पक्ष सोडला. 2004ला शिवसेना सोडली. तर 2019ला राष्ट्रवादी सोडली. माझ्या राजकीय जीवनामध्ये पद असताना कोणत्याही पक्षाला सोडचिठ्ठी दिलेली नाही. मी तत्वाने जगणारा माणूस आहे. निधीच्या बाबतीत आमदारांचा संभ्रम वेळीच दूर करायला हवा होता. केवळ एका मंत्र्यावर जबाबदारी ढकलून चालणार नाही, असे म्हणत अजित पवारांची पाठराखणही केली. संजय राऊतांच्या कार्यशैलीवर बोलण्याएवढा मी मोठा नाही. सध्याची वेळ जोडण्याची आहे, तोडण्याची नाही, अशी रोखठोक प्रतिक्रिया त्यांनी दिली. तर सर्वात जास्त निवडून आलेला मी शिवसेनेचा आमदार आहे. मला निधीची कधीच कमतरता नव्हती. तर निधीच्या बाबतीत कोणाला कमतरता जाणवली नसेल, हे मी आकडेवारीनिधी सिद्ध करून दाखवेन, असे आव्हानही त्यांनी दिले.