Eknath Shinde : बंडाचं प्लॅनिंग ते आपल्याच बंडखोरांना अंधारात ठेवून फडणवीसांची मध्यरात्री भेट; मुख्यमंत्री शिंदेचं भाषण जसंच्या तसं

| Updated on: Jul 04, 2022 | 4:34 PM

सतराव्या वर्षापासून शिवसैनिक झाल्यापासूनचा इतिहास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितला. यावेळी ते भावनिकही झाले.

Eknath Shinde : बंडाचं प्लॅनिंग ते आपल्याच बंडखोरांना अंधारात ठेवून फडणवीसांची मध्यरात्री भेट; मुख्यमंत्री शिंदेचं भाषण जसंच्या तसं
विधानसभेत बोलताना एकनाथ शिंदे
Image Credit source: Vidhan sabha
Follow us on

मुंबई : मी शिवसैनिक आहे. शिवसेनेसाठी मी जावाचे रान केले. रक्ताचं पाणी केले. कोणत्याही पदाची लालसा ठेवली नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केले. विश्वासदर्शक ठराव मंजूर झाल्यानंतर अभिनंदनाच्या ठरावाला उत्तर देताना ते विधानसभेत बोलत होते. सतराव्या वर्षापासून शिवसैनिक झाल्यापासूनचा इतिहास त्यांनी सांगितला. यावेळी ते भावनिकही झाले. शिवसेनेतून बंडखोरी आणि भाजपासोबत जाण्याची कारणे सांगितली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे तसेत आनंद दिघे यांच्याविषयीही ते भरभरून बोलले. ते म्हणाले, की बाळासाहेबांच्या विचारांनी प्रभावित होऊन शिवसैनिक (Shivsainik) झालो. वयाच्या अठराव्या वर्षी शाखाप्रमुख झालो. मी साहेबांना सांगितले सिनिअर लोकांना पद द्या, तेव्हा त्यांनी मला एक शिवी घातली आणि शाखाप्रमुख बनवले. मी नंतर नगरसेवक (Corporator) झालो. मात्र त्याच्या आधी होऊ शकलो असतो. युतीच्या माणसाला तिकीट द्यायचे ठरले. तेव्हा साहेब बोलले युतीचे बघू तुला तिकीट देतो. मी म्हटले जाऊ द्या साहेब आपण पुढच्या वर्षी बघू, मी कधी पदाची लालसा ठेवली नाही, असे ते म्हणाले.

’16 लेडिज बार तोडणारा हा एकनाथ शिंदे’

16 लेडिज बार तोडणारा हा एकनाथ शिंदे आहे, माझ्यावर 100हून अधिक केसेस आहेत. ठाण्यात लेडिज बारचा सुळसुळाट झाला होता. आम्ही पोलिसांना सांगितले, अर्ज देऊन थकलो. महिला म्हणायच्या, तुमच्या पोरांचा काय उपयोग आहे. शिव्या घालायच्या. यावेळी मी 16 लेडिज बार तोडणारा शिवसैनिक आहे, असे ते म्हणाले. माझ्या विरोधात पिटीशन टाकली. त्यावेळी गँगवार होत होता. मला ठार मारण्याचा प्लॅन होता. तेव्हा आनंद दिघेंना सांगितले. तेव्हा त्यांनी शेट्टी लोकांना बोलावले आणि सांगितले एकनाथ को कुछ हो गया तो समझ जाओ. मी शिवसेनेसाठी प्रचंड आंदोलन केले. केसेस घेतल्या.

शिवसेना नेत्यांवर टीका

शिवसेनेच्या नेत्यांवर टीका करताना ते म्हणाले, की आमचा बाप काढला गेला. रेडा म्हणाले. अनेक वाईट शब्द काढले. मी एकदम शांत असतो. मात्र अन्याय झाल्यावर मला शांत राहता येत नाही. माझे काम केसरकरांनी हलके केले. त्यांना मी मीडियाला बोलायला सांगितले. बाप काढले, माझे वडील जिवंत आहेत. माझी आई गेली, एकादा गावी गेल्यावर उद्धव साहेबांचा फोन आला. आईने उद्धव साहेबांना सांगितले माझ्या बाळाला सांभाळा. तिच्यासाठी मी बाळ होतो. मला खूप कष्टाने वाढवले आहे, असे त्यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

‘घरच्यांनाही वेळ देऊ शकलो नाही’

पुढे ते म्हणाले, माझा मुलगा श्रीकांत डॉक्टर झाला. मात्र मी त्याला वेळ देऊ शकलो नाही. मी लेट यायचो आणि तो आधीच निघून जायचा. मी संघटनेला वेळ दिला. मी शिवसैनिक हेच माझे कुटुंब मानले. माझ्या आयुष्यात वाईट प्रसंग आला, माझी दोन मुले डोळ्यासमोर गेली. तेव्हा मला दिघे साहेबांनी आधार दिला. माझे कुटुंब उद्ध्वस्त झाले होते. कशासाठी जगायचे, कुणासाठी जगायचे. माझ्या कुटुंबाला माझी आवश्यकता होती. दिघे साहेब पाच, सहावेळा माझ्या घरी आले. मी संघटनेला न्याय देऊ शकत नाही म्हणून सांगितले. तेव्हा दिघे साहेब म्हणाले, तुला हे दुसऱ्याच्या डोळ्यातले अश्रू पुसावेच लागतील. मी दिघे साहेबांना देव मानतो, बाळासाहेब, दिघेसाहेब आमचे देव मानतो. मला सभागृह नेता केला. जितेंद्र आव्हाड दुसऱ्या पक्षात होता तरी त्याला माहीत होतं एकनाथ शिंदे खूप वेड्यासारखे कामाला लागला आहे.

‘दिघेंच्या आशीर्वादाने ठाणे-पालघर जिल्हा राखला’

आनंद दिघेंचा मृत्यू झाला. तेव्हा मी कोलमडून गेलो. तेव्हा लोकांचा उद्रेक झाला. हॉस्पिटल तोडले. लोक बेभान झाले होते. मी तिथे नसतो तर सिलेंडर स्फोट होऊन शंभर एक लोक मेले असते. त्यावेळी शंभर लोकांना अटक झाली. तेव्हा पोलिसांना सांगितले हा उद्रेक आहे. जाणूनबुजून केलेली कृती नाही. ठाण्यातून शिवसेना संपली असे वाटत होते. बाळासाहेबांनाही तसे वाटत होते. दिघेंच्या आशीर्वादाने आम्ही ठाणे पालघर जिल्हा राखला.

‘ही शिवसेनेचीच चाल होती’

उपमुख्यमंत्रीपद केवळ मला मिळू नये म्हणून शिवसेनेने ते नाकारले होते. अजित पवार यांचा विरोध असल्याचे दाखवून शिवसेनेने उपमुख्यमंत्रीपद नाकारले होते, असा गौप्यस्फोट त्यांनी केला. शिवसेनेतील संघर्षातील कहानी ऐकवतानाच बंडामागची कारणमीमांसाही त्यांनी केली. यावेळी शिवसेनेचा बुरखाही फाडला. आपल्या नगरविकास खात्यात अजित पवार यांची आणि शिवसेनेच्या नेत्यांची कशी ढवळाढवळ सुरू होती, याची माहिती देत टोलेबाजी केली. माझ्या खात्यात कोणीही ढवळाढवळ करत असतानाही मी काहीच बोलत नव्हतो, असेही ते म्हणाले.

एकनाथ शिंदे यांचे भाषण ‘अनकट’