सगळे निर्दोष मग दोषी कोण? मालेगाव प्रकरणात शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांचा सवाल

कबूतर हा सुद्धा या समाजातील या पर्यावरणातील एक भाग आहे. जर कबूतरांचे खाणे बंद केले जात असतील तर त्याला एक पर्याय दिला पाहिजे. असे अचानक सगळं बंद करणं उचित नाही.आम्ही देखील यावर नक्कीच आमचं म्हणणं त्यांच्यापर्यंत पोहोचवू असेही शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यावेळी म्हणाले.

सगळे निर्दोष मग दोषी कोण? मालेगाव प्रकरणात शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांचा सवाल
Shankaracharya Avimukteshwaranand
| Updated on: Aug 03, 2025 | 7:13 PM

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींना कोर्टाने निर्दोषमुक्त केले आहे. या संदर्भात शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी सगळे निर्दोष सुटत आहेत तर मग दोषी कोण? असा सवाल केला आहे. त्यांनी पुढे इतक्या वर्षात दोषी कोण ? हे जर त्यांना कळत नसेल तर हे यंत्रणांचे अपयश नाही का ? असा सवाल केला आहे. मालेगाव बॉम्बस्फोट आणि २००६ च्या लोकल ट्रेन बॉम्बस्फोटातील आरोपींना निर्दोष सोडल्याने शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद आश्चर्य व्यक्त करीत हे बॉम्बस्फोट आपोआप झाले का असाही सवाल केला आहे.

शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद बोरीवली येथे एका कार्यक्रमासाठी आले असताना त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना अनेक प्रश्न राज्य सरकारला केले आहेत. ते म्हणाले की सगळे निर्दोष सुटत आहेत तर मग दोषी कोण आहे ? इतक्या वर्षांत दोषी कोण हे जर कळत नसेल तर हे यंत्रणांचे अपयश नाही का ? मुंबईत बॉम्बस्फोट झाले त्यात देखील सर्व निर्दोष सुटले आणि आता मालेगावमध्ये सुद्धा सर्व आरोपी निर्दोष सुटले मग दोषी कोण? हे बॉम्बस्फोट आपोआप झाले का? असा सवाल केला आहे.

सत्ताधारी पक्षाने काँग्रेसवर भगवा आतंकवादाचे कुभांड रचल्याचा आरोप केला आहे. या संदर्भात विचारले असता शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद म्हणाले की आतंकवाद हा आतंकवाद असतो त्याला कोणताही रंग नसतो. जर कोणी हिंदू आतंकवादी असेल तर त्याची कोणी पूजा करणार का? जर कोणी मुस्लिम आतंकवादी असेल तर त्याची देखील पूजा करणार का? त्यामुळे आतंकवाद हा आतंकवाद असतो. याकडे सरकारने झिरो टॉलरन्स माध्यमातून पाहिले पाहिजे असेही ते म्हणाले.

गाईला राष्ट्रमातेचा दर्जा द्या

गाईला राष्ट्रमातेचा दर्जा मिळाला पाहिजे यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांना पत्र लिहिणार आहे.महाराष्ट्र राज्याने गाईला राज्य मातेचा दर्जा दिला आहे. त्यामुळे राज्य मातेचा प्रोटोकॉल हा राज्य सरकारने निश्चित करावा अशी देखील आमची मागणी आहे. लोकांनी निवडून दिलेले सरकार आहे मग लोकांची भावना सरकारने ओळखली पाहिजे. गाय ही आमची माता आहे.तिला जर कोणी कापत असेल तर ते आम्ही सहन करणार नाही. सरकारने गांभीर्याने याकडे लक्ष दिले पाहिजे असेही शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी सांगितले.

मी स्वतः मराठी शिकत आहे ..

हिंदीला जेव्हा राज्य भाषेचा दर्जा मिळाला तेव्हा महाराष्ट्र राज्य अस्तित्वात नव्हते.त्यानंतर संयुक्त महाराष्ट्राची लढाई झाली आणि महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. आधी हिंदी भाषेला राज्य भाषेचा दर्जा मिळाला.नंतर मराठीला मिळाला आहे. मी स्वतः मराठी शिकत आहे असेही शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी म्हटले आहे.