माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा अजून तीन दिवस कोठडीत मुक्काम; 15 नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी वाढवली

राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांचा कोठडीतील मुक्काम आणखी तीन दिवसाने वाढला आहे. त्यांना 15 नोव्हेंबरपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा अजून तीन दिवस कोठडीत मुक्काम; 15 नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी वाढवली
Anil Deshmukh
| Edited By: | Updated on: Nov 12, 2021 | 2:11 PM

मुंबई: राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांचा कोठडीतील मुक्काम आणखी तीन दिवसाने वाढला आहे. त्यांना 15 नोव्हेंबरपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली आहे. पीएमएलए सत्र न्यायालयाने ही कोठडी सुनावली आहे.

अनिल देशमुख यांना ईडीने अटक केल्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात आले होते. त्यावेळी त्यांना 6 नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली होती. 6 तारखेला त्यांची कोठडी संपल्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात आले असता त्यांच्या कोठडीत 12 नोव्हेंबरपर्यंत वाढ करण्यात आली होती. त्यामुळे आज त्यांना पुन्हा कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी त्यांना जामीन मिळावा म्हणून त्यांचे वकील इंदरपाल सिंग यांनी कोर्टासमोर युक्तिवाद केला. देशमुख ईडीला सहकार्य करत असल्याने त्यांना जामीन मिळायला हवा, असा युक्तिवाद सिंग यांनी केल्याचं सूत्रांनी सांगितलं. तर ईडीच्या वकिलांनी देशमुख यांच्या जामिनाला विरोध करत त्यांना कोठडी देण्याची मागणी केली होती. कोर्टाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर देशमुख यांना 15 नोव्हेंबरपर्यंतची ईडी कोठडी सुनावली आहे. त्यामुळे देशमुख यांना तीन दिवस ईडीच्या कोठडीत राहावं लागणार आहे.

अटकेचं कारण काय?

अनिल देशमुख यांना एका पत्रातीला आरोपामुळे तुरुंगात जावं लागलं आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रं लिहून देशमुखांवर गंभीर आरोप केले होते. देशमुखांनी सचिन वाझेला प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांचं वसुलीचं टार्गेट दिलं होतं, असा खळबळजनक आरोप परमबीर सिंग यांनी पत्राच्या माध्यमातून केला होता. यानंतर निलंबित एपीआय सचिन वाझे यांच्यावरही या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून अटकेची कारवाई करण्यात आली होती.

 

सहकारीही अटकेत

देशमुखांपूर्वी त्यांच्या सहकाऱ्यांनाही अटक करण्यात आली आहे. देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि खासगी सहायक कुंदन शिंदे यांनाही याचप्रकरणात गेल्या दोन महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली होती. सचिन वाझे सध्या महाराष्ट्र पोलिसांच्या कोठडीत आहे.

परमबीर सिंग गायब

दरम्यान, देशमुख यांच्यावर वसुलीचे गंभीर आरोप करणारे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग अजूनही गायब आहेत. त्यांच्यावर गोरेगावामधील एका प्रकरणी गुन्हा दाखल आहे. पोलिसांकडून सिंग यांचा शोध घेतला जात असून त्यांचा शोध लागत नाही. सिंग हे परदेशात पळून गेल्याचीही चर्चा आहे.

 

संबंधित बातम्या:

ED च्या कारवाईने औरंगाबादेत खळबळ, उद्योजक-राजकारण्यांचे धाबे दणाणले, जालना-लातुरातही धाडसत्र

तुमचं केंद्र आणि राज्यात सरकार होतं, तुम्ही विलिनीकरण का केलं नाही? अनिल परब यांचा सुधीर मुनगंटीवार यांना सवाल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर शस्त्रक्रिया होणार?; डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर उद्धव ठाकरे कुटुंबीयांशी बोलून घेणार निर्णय