2 लाख 60 हजार शेतकऱ्यांसाठी सरकारचे 2 मोठे निर्णय, दिवाळीची मोठी भेट; काय घेतले निर्णय?
राज्य सरकारने 2.6 लाख शेतकऱ्यांसाठी दोन मोठे निर्णय घेतले आहेत. आदिवासी शेतकऱ्यांना 'फॉर्मर आयडी' देऊन त्यांना जमिनीचा हक्क मिळणार आहे, तर ऑनलाइन पीक पाहणीमुळे लाखो शेतकऱ्यांची कामे सोपी होतील. ही शेतकऱ्यांसाठी दिवाळीची मोठी भेट असून, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घोषणा केली. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी आज दोन अत्यंत मोठे निर्णय घेतले आहेत. एक म्हणजे आदिवासी शेतकऱ्यांना फॉर्मर आयडी देण्याचा आणि दुसरा म्हणजे ऑनलाइन पीक पाहणी करण्याचा. या दोन निर्णयामुळे राज्यातील 2 लाख 60 हजार शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. त्यात 1 लाख 60 हजार आदिवासी शेतकऱ्यांचा समावेश आहे. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तशी घोषणाच आज मीडियासमोर केली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
आदिवासी समाज जमिनी कसत आहे. मात्र त्यांचे पट्ट्यावर नाव नाही. इतर योजनेत समावेश नाही. राज्यातील वेगवगेळ्या भागात वेगवेगळ्या कारणामुळे फॉर्मर आयडी मिळालेले नाहीत. एसओपी नाही, अशा आदिवासींना राज्य सरकारने फॉर्मर आयडी देण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. आदिवीसंनी 1 जानेवारी 2015 पूर्वीचा एक जरी पुरावा दिला तरी त्यांना फॉर्मर आयडी दिले जाणार आहेत. दिवाळी निमित्ताने राज्याच्या महसूल विभागाने 1 लाख 60 हजार आदिवासी शेतकऱ्यांना हा मोठा दिलासा दिला आहे. 1 जानेवारी 2015 पूर्वी कोणत्याही प्रकारची जमीन आदिवासी शेतकरी कसत असेल तर त्याला हस्तलिखीत रेकॉर्ड दिलं जाणार आहे. सरकारची जमीन असली तरीही त्यांचा अधिकार असलेल्या सर्वांना फॉर्मर आयडी मिळणार आहे, असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं.
आता पीक पाहणी ऑनलाइन
महसूल विभागाने आज दुसरा एक निर्णय घेतला आहे. तो म्हणजे आता ऑनलाइन पीक पाहणी करण्यात येणार आहे. त्यामुळे एक लाखाहून अधिक शेतकऱ्यांच्या रखडलेल्या पीक पाहणी आता सोप्या होणार आहेत, अशी माहितीही बावनकुळे यांनी दिली आहे.
झाड तोडणी योग्य नाही, पण…
कर्जतमध्ये झाडं तोडली जात असल्याने अभिनेते सयाजी शिंदे यांनी आंदोलन सुरू केलं आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या राज्यात हायड्रो प्रकल्प वरदान असतो. यामुळे आज स्वस्त वीज मिळते. हायड्रो प्रकल्पामुळे कधीच पर्यावरणाचा ऱ्हास होत नाही. स्वस्त वीज मिळते. सयाजी शिंदे यांचे काय म्हणणे ते आम्ही ऐकून घेऊ. एकूण किती झाडे लावायचे त्यासाठी आम्ही जमीन देऊ. झाड तोडणी योग्य नाही, मात्र हायड्रो प्रकल्प परत जाणे देखील योग्य नाही. त्यामुळे दिवसा शेतकऱ्यांना वीज मिळेल आणि दिलासा मिळेल, असा दावा बावनकुळे यांनी केला आहे.
सोनिया गांधींनी इतिहास तपासावा…
काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांची एका वर्तमानपत्रात मुलाखत छापून आली आहे. त्यावरही त्यांनी टीका केली. सोनिया गांधी काय बोलल्या ते माहीत नाही. पण ज्या काँग्रेस पक्षाने देशावर आणीबाणी लादली, त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्य, मुलभूत अधिकार यावर बोलू नये. सोनिया गांधी यांनी आधी आपल्या पक्षाचा इतिहास तपासावा, असा टोला त्यांनी लगावला.