Tukaram Mundhe : धक्कादायक, तुकाराम मुंढे यांना शिवीगाळ, कुणी दिल्या इतक्या शिव्या? काय घडलं?

अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी भेसळयुक्त खाद्यपदार्थांविरोधात युद्ध पुकारले आहे. यापूर्वी त्यांनी बेकायदा बांधकामे तोडतानाही धडाकेबाज कारवाई केली होती. त्यावेळी त्यांना शिव्यांनी भरलेली पत्रे मिळाली होती, ज्यात घर सापडत नसल्याने राग व्यक्त केला होता. मुंढेंच्या निर्भीड कारवाईचा हा एक अनुभव असून, सध्या त्यांची मोहीम अनेकांना घाम फोडत आहे.

Tukaram Mundhe : धक्कादायक, तुकाराम मुंढे यांना शिवीगाळ, कुणी दिल्या इतक्या शिव्या? काय घडलं?
Tukaram Mundhe
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 11, 2026 | 11:20 PM

अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी खाद्यपदार्थातील भेसळीविरोधात युद्धच पुकारलं आहे. त्यांनी भेसळयुक्त खाद्य पदार्थ विकणाऱ्या, अस्वच्छता असलेल्या हॉटेल, स्टॉल, रेस्टॉरंट, दुकाने आणि ठेल्यांवर धडाधड कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. नुसतीच कारवाई केलेली नाही तर त्यांचे लायसन्सही रद्द केले आहेत. त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत. तुकाराम मुंढे यांची ही काही पहिलीच कारवाई नाहीये. ज्या खात्यात ते जातात तिथे अशाच पद्धतीने धडाकेबाज कारवाई करत असतात. त्याचे चांगले आणि वाईट अनुभवही त्यांना येतात. एकदा तर त्यांना अशाच एका कारवाईवेळी थेट शिवीगाळ करण्यात आली होती. थेट पत्र लिहूनच त्यांना शिवीगाळ करण्यात आली होती. खुद्द तुकाराम मुंढे यांनीच हा किस्सा सांगितलेला आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जुना किस्सा सांगितला. त्यावेळी आपल्यावर कसा शिव्यांचा भडिमार झाला होता, हे त्यांनी स्पष्ट केलं. तुमच्या बाबतची आश्चर्यकारक तक्रार कोणती होती? ज्यामुळे तुम्हीही हैराण झाला, असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर मुंढे यांनी एक पॉझ घेतला आणि सोलापूरच्या बार्शीतील किश्याला उजाळा दिला. खूप जुनी घटना आहे. शहरात माझं ट्रेनिंग सुरू होतं. 2007ची गोष्ट आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शीतील हा किस्सा आहे. मी तिथे चीफ ऑफिसर होतो. त्या ठिकाणी आम्ही बरीच बेकायदा बांधकामं तोडली होती. 1500 बांधकामं तोडली होती. दोन तीन दिवसात ही कारवाई करण्यात आली होती. माझ्याकडे चीफ ऑफिसरचा चार आठवड्याचा चार्ज होता. त्यावेळी मला खूप पत्रे आली. काही पत्र कौतुक करणारे होते. काही टीका करणारे होते. पण त्यातील एक लेटर फारच अजीब होतं, असं तुकाराम मुंढे यांनी सांगितलं.

Loading...

माझं घरच सापडेना…

तुमचं नाव तुकाराम आहे. अशी पत्राने सुरूवात होती. त्यानंतर अख्ख पत्र शिव्यांनी भरलेलं होतं. एकावर एक शिव्या होत्या. तुकाराम एवढं चांगलं नाव असताना तुम्ही असं काम करता का? वगैरे वगैरे… त्यानंतर पुन्हा शिव्याच शिव्या होत्या. मी पत्र वाचत होतो. कारण लिहिणाऱ्याला एवढा का राग आला? हे मला पाहायचं होतं. त्या पत्रात शेवटी एक ओळ होती. मी शिव्या यासाठी देतोय की, अनेक वर्षानंतर मी बार्शीला आलो आहे. मला माझं घर शोधायला प्रचंड त्रास झालाय. कारण तुम्ही एवढी बेकायदा बांधकामे हटवलीत की रस्ता कुठेय हेच मला कळेनासं झालं आहे, असं तुकाराम मुंढे यांनी सांगताच टाळ्यांचा एकच कडकडाट झाला.

तुकाराम मुंढे हे सध्या अन्न आणि औषध प्रशासन विभागात कार्यरत आहेत. त्यांच्या स्टाईलप्रमाणे या खात्यातही कामाचा धडाका लावला आहे. त्यांनी भेसळयुक्त पदार्थ विकणाऱ्यांवर कारवाई सुरू केली आहे. रस्त्यावरच्या ठेल्यापासून प्रसिद्ध हॉटेलांवर त्यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यामुळे सर्वांनाच घाम फुटला आहे. किचनमध्ये स्वच्छता आहे की नाही? पदार्थांमध्ये भेसळतर नाही ना? हॉटेलातील एकूण स्वच्छता या सर्व गोष्टी या कारवाईत तपासल्या जात आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us