गेट वे ऑफ इंडीया येथील फेरी बोटी सुरक्षित ? केरळ दुर्घटनेनंतर प्रवाशांच्या सुरक्षेवर सवाल

केरळ प्रवासी बोट दुर्घटनेनंतर मुंबईतील गेटवे येथून अलिबाग-मांडवा रेवस तसेच पर्यटनासाठी एलिफंटा येथे सुटणाऱ्या कॅटामारन तसेच प्रवासी फेरी बोटींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

गेट वे ऑफ इंडीया येथील फेरी बोटी सुरक्षित ? केरळ दुर्घटनेनंतर प्रवाशांच्या सुरक्षेवर सवाल
gateway ferry party boat
Image Credit source: socialmedia
| Updated on: May 09, 2023 | 2:00 PM

मुंबई : केरळ ( kerala boat tragedy ) येथील मलप्पुरच्या तनूर भागात प्रवासी बोट बुडून रविवारी 21 प्रवाशांचा मृत्यू झाल्याने आता मुंबईच्या गेट वे ऑफ इंडीया येथील फेरी बोटींच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गेटवे येथून अलीबाग- मांडवा  ( Alibaug Mandwa )  एलीफंटा येथे रविवारी आणि सुट्टीच्या दिवसात प्रचंड गर्दी होत असते. येथील प्रवाशांच्या फेरी बोटी तसेच कॅटामारन जुन्या झालेल्या आहेत. सुदैवाने गेट वे ऑफ इंडीया  ( Gateway of India ) येथे कोणतीही घटना घडलेली नसली तरी प्रवाशांच्या सुरक्षेसाठी तातडीने पावले उचलावीत अशी मागणी होत आहे.

केरळ येथे प्रवासी बोटीत क्षमतेपेक्षा जादा प्रवासी चढवल्याने रविवारी मोठी दुर्घटना होत 21 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे जलवाहतूकीसंदर्भात प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुंबईतील गेट वे ऑफ इंडीयाच्या जेट्टीवर अनेक फेरी बोटी आणि कॅटामारन चालविण्यात येत असतात. गेटवेहून अलिबागच्या मांडवा, एलिफंटा बेटावर जाण्यासाठी प्रचंड गर्दी होत असते. या बोटी लाकडाच्या असल्याने त्यांचे आर्युर्मान कमी झालेले आहे. त्यामुळे येथील प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. तसेच प्रवाशांच्या सुरक्षेकडे कानाडोळा केला जात असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.

केरळ दुर्घटनेतून धडा

केरळची दुर्घटना बोटीवर क्षमतेपेक्षा जादा प्रवासी चढवल्याने घडली आहे. तेथील बॅक वॉटर समुद्र मुंबईच्या समुद्राप्रमाणे खवळलेला नसतो. त्यामुळे ही घटना प्रवासी जादा घेतल्याने बोटीचा बॅलन्स गेल्याने घडली असल्याचे गेट वे जलवाहतूक सहकारी सोसायटीचे मामू उर्फ किफायत मुल्ला यांनी टीव्ही 9 मराठी वेबसाईटशी बोलताना सांगितले. सुदैवाने आपल्या येथे अद्याप अशी दुर्घटना घडली नाही आणि होऊ नये अशी प्रार्थना करीत आहे. आम्ही जादा प्रवासी घेणे कटाक्षाने टाळता असेही मुल्ला यांनी स्पष्ट केले.

फिटनेस सर्टीफिकेट्स मिळते

आमच्या सोसायटीचे 83 सदस्य आहेत. एकूण 92 बोटी 6 कॅटामारन, 2 स्पीड बोटी आहेत. दर 11 महिन्यांनी मेरीटाईम बोर्डाकडून बोटींना फिटनेस सर्टीफिकेट्स दिले जाते. तसेच बोटीवर क्षमतेपेक्षा जादा प्रवासी घेतले जात नाहीत, तसेच प्रत्येकाला लाईफ जॅकेट पुरविले जाते असेही मुल्ला यांनी सांगितले. फेरी बोटींवर कधी मॉक ड्रील घेतली जात नसल्याचे ते म्हणाले. बोटी वेळेवर मेन्टेनन्स केल्या जातात असाही दावा त्यांनी केला. यासंदर्भात महाराष्ट्र मेरी टाईम बोर्डाचे सीईओ अमित सैनी यांच्या संपर्क होऊ शकला नाही.