घाटकोपरमध्ये कोसळली दरड, पाच ते सहा जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती

Ghatkoper Ashok Nagar Landslide: साकीनाका गौसिया चाळ परिसरात रात्रभर पडलेल्या पावसामुळे डोंगराचा काही भाग कोसळला आहे. हा भाग तेथील काही घरांवर कोसळला असल्यामुळे पाच ते सहाजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती समोर आली आहे.

घाटकोपरमध्ये कोसळली दरड, पाच ते सहा जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती
Ghatkopar
Image Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Aug 12, 2026 | 8:47 AM

मुंबईतील घाटकोपर येथील साकीनाका गौसिया चाळ परिसरात रात्रभर पडलेल्या पावसामुळे डोंगराचा काही भाग कोसळला. या घटनेत दोन ते तीन घरांवर दरड कोसळली असून पाच ते सहा जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. घटनास्थळी अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या पथकांनी तातडीने बचावकार्य सुरू केले आहे.

दोन ते तीन घरांवर कोसळली दरड

स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, डोंगराचा काही भाग अचानक कोसळला आणि त्यातील माती व दगड दोन-तीन घरांवर पडले. यामुळे काही व्यक्ती घरात अडकले असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. अधिकृत आकडेवारी अद्याप उपलब्ध झालेली नसली तरी प्राथमिक अंदाजानुसार पाच ते सहा जण अडकले असल्याची माहिती समोर आली आहे.  यादव विकी, वाजिद अली, आरिफ शेख, मन्नत, आबन शेख आणि सद्दाम शेख अशी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांची नावं आहेत.

अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या पथकांनी घटनास्थळी पोहोचून बचावकार्याला सुरुवात केली आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी जमली असून प्रशासनाने परिसर सुरक्षित ठेवण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत.

नेमकं काय घडलं?

घाटकोपर आणि साकीनाक्याच्या मध्ये असलेल्या अशोक नगर येथे मोठी दुर्गघटना घडली आहे. येथील गौसिया चाळीवर डोंगराचा काही भाग कोसळला असल्याचे माहिती समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, या घटनेत पात ते सहा जण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. पहाटे तीन ते चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दल, एनडीआरएफ आणि घाटकोपर पोलीस दाखल झाले आहेत. सध्या संबंधित विभागाकडून बचावकार्य सुरू आहे.

डीसीपी गणेश शिंदे यांनी घटनेची माहिती देत म्हटले की, “पावसामुळे घाटकोपर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अशोकनगर परिसरात भूस्खलन झाले आहे. आतापर्यंत दोन मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, बचावकार्य सुरू आहे. बचावकार्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांसह बीएमसी, एनडीआरएफ आणि इतर संस्थांच्या अधिकाऱ्यांसह सर्व आवश्यक पथके येथे तैनात करण्यात आली आहेत. ही घटना पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास घडली. सुमारे ४-५ लोक अडकले असण्याची शक्यता आहे.”

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us