कल्याणच्या बिर्ला कॉलेजचं राज्यपालांकडून कौतुक, बिर्ला समूहाने शिक्षण संस्थांमधून संस्कृती-नितीमूल्ये जोपासल्याचे गौरवोद्गार

| Updated on: Oct 15, 2021 | 12:17 AM

कल्याण-डोंबिवली, भिवंडीसह आजूबाजूच्या शहरात नामांकित असलेल्या महाविद्यालयांपैकी एक महाविद्यालय म्हणजे कल्याण पश्चिमेतील बिर्ला महाविद्यालय. याच महाविद्यालयाचं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कौतुक केलं आहे.

कल्याणच्या बिर्ला कॉलेजचं राज्यपालांकडून कौतुक, बिर्ला समूहाने शिक्षण संस्थांमधून संस्कृती-नितीमूल्ये जोपासल्याचे गौरवोद्गार
कल्याणच्या बिर्ला कॉलेजचं राज्यपालांकडून कौतुक
Follow us on

मुंबई : कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयाच्या स्थापनेचे सुवर्णमहोत्सवी वर्ष तसेच संस्थापक बसंत कुमार बिर्ला यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते गुरुवारी (14 ऑक्टोबर) राजभवन येथे महाविद्यालयाचे छायाचित्र असलेल्या विशेष पोस्टेज स्टॅम्पचे आणि आवरणाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी कोश्यारी यांनी बिर्ला परिवार आणि त्यांच्या शिक्षण संस्थांचं कौतुक केलं. “महात्मा गांधींशी घनिष्ठ संबंध असलेल्या बिर्ला परिवाराने उद्योगाला दातृत्व आणि सामाजिक दायित्वाची जोड दिली. आपल्या शिक्षण संस्थांमधून बिर्ला समूहाने भारतीय संस्कृती आणि नितीमूल्ये जोपासल्यामुळे समूहाचे नाव आदराने घेतले जाते”, असे गौरवोद्गार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काढले.

कार्यक्रमाला आदित्य बिर्ला केंद्राच्या ग्रामविकास आणि सामाजिक उपक्रम अध्यक्षा राजश्री बिर्ला (दूरस्थ  माध्यमातून), महाविद्यालयाच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष ओमप्रकाश चितलांगे, संचालक डॉ. नरेश चंद्र, महाराष्ट्र व गोव्याचे प्रधान पोस्ट मास्तर जनरल हरीश चंद्र अगरवाल आणि बिर्ला महाविद्यालयाचे प्राचार्य अविनाश पाटील उपस्थित होते.

‘अभिमत विद्यापीठ होण्याचा प्रयत्न करावा’

बिर्ला महाविद्यालयाचे स्वायत्तता प्राप्तीनंतर गुणवत्ता वृद्धिंगत करून नॅकचे उत्तम गुणांकन प्राप्त केल्याबद्दल राज्यपालांनी महाविद्यालयाचे अभिनंदन केले. महाविद्यालयाने यानंतर अभिमत विद्यापीठ होऊन देशात नावलौकिक प्राप्त करावा, असे आवाहन राज्यपालांनी केले.

“बिट्स पिलानी असो अथवा बिर्ला शाळा असो, बिर्ला यांनी केवळ गुणवत्तेला प्राधान्य दिले. देशातील सर्व कामे गुणवत्तेने झाली तर देशातील गरिबी व बेरोजगारी दूर होईल. नव्या शैक्षणिक धोरणाने मूल्य शिक्षणावर भर दिल्याचे सांगून शिक्षण नैतिकता व सदाचारावर आधारित असले पाहिजे”, असे राज्यपालांनी सांगितले.

कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयाविषयी थोडक्यात माहिती

कल्याण-डोंबिवली, भिवंडीसह आजूबाजूच्या शहरात नामांकित असलेल्या महाविद्यालयांपैकी एक महाविद्यालय म्हणजे कल्याण पश्चिमेतील बिर्ला महाविद्यालय. इयत्ता दहावी-बारावी नंतर उच्च शिक्षणासाठी कल्याण पश्चिमेतील बी. के. बिर्ला महाविद्यालयात प्रवेश मिळावा अशी शहरातील हजारो विद्यार्थ्यांची इच्छा असते. महाविद्यालयातील दर्जेदार शिक्षणामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचा फायदा होतो. याशिवाय महाविद्यालयातील प्रांगणात असलेली शिस्त ही देखील कौतुकास्पद आहे. या महाविद्यालयात विविध क्षेत्रांशी संबंधित शिक्षण दिलं जातं. त्यामुळे या महाविद्यालयाची देशभरात ख्याती आहे.

हेही वाचा :

मोठी बातमी ! अनंत करमुसे मारहाण प्रकरण, जितेंद्र आव्हाड यांना आधी अटक नंतर तत्काळ जामीन

VIDEO : असं काय घडलं की, राष्ट्रवादीचे आमदार ढसाढसा रडले? माफीनं तरी वाद मिटणार का?