VIDEO : असं काय घडलं की, राष्ट्रवादीचे आमदार ढसाढसा रडले? माफीनं तरी वाद मिटणार का?

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू नवघरे यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हिडीओत ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरुढ पुतळ्यावर पुष्पहार अर्पण करताना दिसत आहेत.

VIDEO : असं काय घडलं की, राष्ट्रवादीचे आमदार ढसाढसा रडले? माफीनं तरी वाद मिटणार का?
आमदार राजू नवघरे यांना अश्रू अनावर


हिंगोली : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू नवघरे यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हिडीओत ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरुढ पुतळ्यावर पुष्पहार अर्पण करताना दिसत आहेत. पण यावेळी ते शिवाजी महाराज ज्या घोड्यावर बसले आहेत त्याच घोड्यावर चढून पुष्पहार अर्पण करतानाचे दृश्य आहेत. त्यांच्या या कृतीवरुन सोशल मीडियावर प्रचंड टीका झाली. नवघरे यांच्या या कृतीतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणावरुन टीकेची झोड उठल्यानंतर आमदार राजू नवघरे यांना आपली चूक लक्षात आली. त्यानंतर त्यांनी जाहीर माफी मागत आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले.

आमदार राजू नवघरे नेमकं काय म्हणाले?

“महाराजांचा पुतळा उंच आहे. यावर मी चढू शकत नाही. कार्यकर्ते आणि इतर पक्षाच्या कार्यत्यांनी मला वर चढवलं. अनेक जणांनी वर चढून महाराजांना पुष्पहार चढवला. फक्त माझाच व्हिडीओ व्हायरल केला जातोय. यावेळी शिवसेनेचे माजी आमदार डॉ जयप्रकाश मुंदडा आणि इतर नेतेही वर चढले होते. मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा कार्यकर्ता आहे. पुतळा शहरात उभारावा यासाठी मी भरपूर प्रयत्न केले. महाराजांचे जंगी स्वागत व्हावे म्हणून पोलिसांची परवानगी नसतांना आम्ही नोटीसा स्वीकारून महाराजांच्या स्वागतासाठी बँड लावला. पण माझ्यासारख्या सामान्य माणसाला राजकीय षडयंत्रातून बदनाम केलं जातंय”, असं आमदार नवघरे म्हणाले.

आमदारांना अश्रू अनावर

“मी अठरा पगड जातीला मानणारा कार्यकर्ता आहे. मी छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा कार्यकर्ता आहे. मी येथे होतो तेव्हा खासदारसाहेब होते. माजी आमदार मुंदडा साहेब येथे होते. मला यांनी वर चढवलं. तुम्ही पहिल्यांदा हार घाला म्हणाले, मला यांनी वर चढवलं, शिवसेनेचे माजी आमदार डॉ. जयप्रकाश मुंदडाही वर चढले. पण मला एकट्याला बदनाम केलं जात आहे. माझी चूक झाली असेल तर मी जाहीर माफी मागतो. पण मला बदनाम करु नका. तुम्हाला वाटत असेल तर मी पुन्हा सार्वजनिक कार्यक्रमातही दाखल होणार नाही”, असं बोलत असताना आमदार राजू नवघरेंना रडू कोसळलं.

नेमकं प्रकरण काय?

वसमत शहरात शिवाजी महाराज यांचा पंचधातूने बनवण्यात आलेला 14 फूट उंचीचा भव्य पुतळा उभारला जाणार आहे. 9 ऑक्टोबर रोजी जयपूरवरुन हा पुतळा वसमतच्या दिशेनं रवाना झाला होता. आज दुपारी औंढा नागनाथ शहरात आगमन होताच नागरिकांनी मोठ्या उत्साहात पुतळ्याचं स्वागत केलं. त्यानंतर शिवरायांचा पुतळा वसमत शहरात दाखल झाला. त्यावेळी आमदार राजू नवघरे यांनी घोड्यावर चढून शिवरायांना पुष्पहार अर्पण केला. मात्र, नवघरे यांच्या या कृतीचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जातोय. संभाजी ब्रिगेडसह अनेक संघटना आणि शिवप्रेमींनी या प्रकाराबाबत संताप व्यक्त केलाय.

संबंधित बातमी : आमदार राजू नवघरे वादात, घोड्यावर चढून शिवरायांच्या पुतळ्याला हार घातला!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI