इराण-इस्रायल युद्धामुळे मुंबईकरांवर मोठं संकट, तुमच्या खिशाला लागणार कात्री, नेमकं काय घडलं?

आखाती युद्धाच्या झळा महाराष्ट्राला बसत असून मुंबईच्या क्रॉफर्ड मार्केटमध्ये सुकामेव्याची आवक ७५ टक्क्यांनी घटली आहे, तर नाशिकच्या द्राक्ष निर्यातीत ५० टक्क्यांची मोठी घट झाल्याने शेतकऱ्यांना फटका बसला आहे.

इराण-इस्रायल युद्धामुळे मुंबईकरांवर मोठं संकट, तुमच्या खिशाला लागणार कात्री, नेमकं काय घडलं?
mumbai war impact
| Updated on: Mar 11, 2026 | 12:02 PM

इराण इस्त्रायल आणि अमेरिका यांच्यातील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. या आखाती देशांमधील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीचे गंभीर सावट आता महाराष्ट्रातील बाजारपेठांवर दिसू लागले आहे. इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील तणावामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार विस्कळीत झाला आहे. याचा थेट परिणाम मुंबईतील ऐतिहासिक क्रॉफर्ड मार्केट आणि नाशिकमधील द्राक्ष निर्यातीवर बसला आहे. सध्या सुकामेवा, विदेशी वस्तू आणि शेतीमालाच्या किंमतीत मोठी वाढ झाल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसताना दिसत आहे.

क्रॉफर्ड मार्केटमध्ये शुकशुकाट; आवक ५० टनांवरून १० टनांवर

मुंबईचे मुख्य व्यापारी केंद्र असलेल्या क्रॉफर्ड मार्केटमध्ये आयात होणाऱ्या सुकामेव्याची आवक कमालीची घटली आहे. युद्धामुळे अरबी समुद्रातील मालवाहतूक आणि विमान सेवा विस्कळीत झाल्याने प्रामुख्याने इराण आणि आसपासच्या देशांतून येणारा माल रोखला गेला आहे. इराणी पिस्ता, खजूर, बेदाणे आणि पाईन नट्स यांसारख्या पदार्थांचा पुरवठा खालावला आहे. व्यापाऱ्यांच्या माहितीनुसार, दररोज ४० ते ५० टन होणारी आवक आता अवघ्या १० टनांवर आली आहे. पुरवठा कमी झाल्याने खजूर आणि सुकामेव्याचे दर ३० ते ४० टक्क्यांनी कडाडले आहेत. मालाचा साठा साचून राहिल्याने आणि पुढील आवक अनिश्चित असल्याने व्यापाऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत आहे.

नाशिकची द्राक्ष निर्यात ५० टक्क्यांनी घटली

नाशिक जिल्ह्यालाही या युद्धाचा मोठा फटका बसला आहे. नाशिकचे जिल्हा कृषी अधीक्षक रवींद्र माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी नाशिकमधून १ लाख ३१ हजार मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात झाली होती. मात्र, आखाती देशांतील अस्थिरतेमुळे यंदा हे प्रमाण निम्म्यावर म्हणजेच ६५ ते ७० हजार मेट्रिक टनांवर आले आहे. युरोप आणि आखाती देशांकडे जाणारी द्राक्षे बंदरांवर अडकून पडली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान होत आहे. द्राक्षांशिवाय कांदा, डाळिंब आणि इतर पालेभाज्यांची निर्यातही मंदावली आहे.

भायखळा भाजी मंडई आणि हॉटेल व्यवसायावर परिणाम

मुंबईतील भायखळा भाजी मंडईतही युद्धाचे पडसाद उमटले आहेत. इराण-अमेरिका युद्धामुळे इंधनाचे दर वाढण्याची भीती आणि गॅस पुरवठ्यात अडथळे निर्माण झाल्याने अनेक हॉटेल व्यावसायिकांनी आपली खरेदी मर्यादित केली आहे. हॉटेलला जाणारा भाजीपाला कमी झाल्याने किरकोळ विक्रेत्यांकडे मालाचा ढिग साचला आहे. मात्र ग्राहक नसल्याने विक्रेते चिंतेत आहेत. एकूणच, वाहतूक खर्च वाढल्याने आगामी काळात दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या किमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Follow Us