ज्ञानू मस्ट गो!… दोन ओळींचा मेसेज, अभिजीत दीपकेंची अखेर मोठी घोषणा; थेट जेलभरोच…

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात अभिजीत दीपके यांनी 'ज्ञानू मस्ट गो' आंदोलन छेडले आहे. निवडणूक घोटाळ्याचे सूत्रधार असल्याचा आरोप करत, मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही दीपके यांनी २ ऑक्टोबर रोजी शिवाजी पार्कात 'जेलभरो' आंदोलनाची घोषणा केली आहे. यामुळे ज्ञानेश कुमार यांच्या अडचणी वाढणार असून, केंद्र सरकारवरही दबाव वाढण्याची शक्यता आहे.

ज्ञानू मस्ट गो!... दोन ओळींचा मेसेज, अभिजीत दीपकेंची अखेर मोठी घोषणा; थेट जेलभरोच...
abhijit dipke
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 28, 2026 | 1:05 PM

देशातील निवडणूक घोटाळ्याचे कथित सूत्रधार मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात कॉकरोच जनता पार्टीने दंड थोपाटले आहेत. ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा नाही दिला तर 2 ऑक्टोबर रोजी आम्ही आंदोलन करणार आहोत, अशी घोषणाच अभिजीत दीपके यांनी केली होती. या आंदोलानाला मुंबई पोलिसांनी परवागनी नाकारली आहे. त्यामुळे दीपके अधिकच संतप्त झाले आहेत. त्यांनी एक्सवर एक पोस्ट करून 2 ऑक्टोबर रोजी थेट जेलभरो आंदोलनाची घोषणाच केली आहे. तसेच ज्ञानू, मस्ट गो… अशी दोन ओळीची प्रतिक्रियाही त्यांनी एक्सवरून व्यक्त केली आहे. त्यामुळे ज्ञानेश कुमार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अभिजीत दीपके यांनी एक्सवर ट्विट करून आंदोलनाची तारीख आणि वेळ जाहीर केली आहे. ज्ञानू, जावंच लागेल… येत्या 2 ऑक्टोबर रोजी दुपारी 4 वाजता मुंबईच्या शिवाजी पार्कात मोठं आंदोलन छेडण्यात येणार आहे. यावेळी आम्ही जेलभरो आंदोलन करणार आहोत, असं या एक्स पोस्टमध्ये दीपके यांनी म्हटलं आहे. तसेच सेव्ह डेमोक्रॅसी हा हॅशटॅगही त्यांनी वापरला आहे. अवघ्या दोन ओळीच्या ट्विटमध्ये दीपके यांनी आंदोलनाची घोषणा करून ज्ञानेश कुमारच नव्हे तर मुंबई पोलिसांनाही घाम फोडला आहे.

Loading...

 

परवानगी नाकारली

दीपके यांच्या सीजेपीने मुंबईत आंदोलन करण्यासाठी मुंबई पोलिसांकडे परवानगी मागितली होती. पण पोलिसांनी ही परवानगी नाकारली होती. त्यामुळे दीपके यांनी बॅकफूटवर न जाता आंदोलन करणारच असा इशारा काल दिला होता. त्यानंतर आज त्यांनी आंदोलनाची तारीख, वेळ, ठिकाण आणि स्वरुप जाहीर केलं आहे. दीपके यांच्या या निर्णयाने केंद्र सरकारच्याही अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्ञानेश कुमार हे 2 ऑक्टोबरच्या आधी राजीनामा देतात की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

ठाकरे बंधूंचा मोर्चा

दरम्यान, ठाकरे बंधुंनीही मुंबईत मोर्चाचं आयोजन केलं आहे. राज आणि उद्धव ठाकरे यांनी येत्या 4 ऑक्टोबर रोजी मुंबईत महामोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. या मोर्चात स्वत: शरद पवारही सहभागी होणार आहेत. मोर्चात इतर पक्षाच्या नेत्यांनीही सहभागी होण्याचं आवाहन राज आणि उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. हा मोर्चा कुठून कुठे निघेल आणि किती वाजता निघेल याची माहिती राज ठाकरे लवकरच देणार आहेत. त्यामुळे सीजेपी आणि ठाकरे बंधुंच्या आंदोलनाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us