महापालिकेचा 104 टक्के नालेसफाईचा दावा 12 तासांत फोल, मुंबई तुंबल्याने विरोधक बरसले

| Updated on: Jun 09, 2021 | 11:51 AM

मुंबई महापालिकेने कालच 104 टक्के नालेसफाई झाल्याचा दावा केला होता. त्यामुळे यंदा पावसाळ्यात मुंबईकरांची दाणादाण उडणार नसल्याचं वाटत असतानाच पहिल्याच पावसात मुंबईची दाणादाण उडाली आहे.

महापालिकेचा 104 टक्के नालेसफाईचा दावा 12 तासांत फोल, मुंबई तुंबल्याने विरोधक बरसले
Mumbai Rains
Follow us on

मुंबई: मुंबई महापालिकेने कालच 104 टक्के नालेसफाई झाल्याचा दावा केला होता. त्यामुळे यंदा पावसाळ्यात मुंबईकरांची दाणादाण उडणार नसल्याचं वाटत असतानाच पहिल्याच पावसात मुंबईची दाणादाण उडाली आहे. विशेष म्हणजे मुंबईची नालेसफाई 104 टक्के झाल्याचा पालिकेने दावा करून 12 तासही उलटले नाही तोच मुंबईकरांची तारांबळ उडाली आहे. त्यामुळे विरोधकांनी एकच संताप व्यक्त केला आहे. (Heavy rainfall lashes, Waterlogging In Mumbai)

मुंबईसह ठाण्यात 9 ते 12 जूनपर्यंत अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान खात्याने आधीच दिला होता. त्यामुळे मुंबईला अतिवृष्टीचा अधिक फटका बसू नये म्हणून महापालिकेने तयारी केली होती. मात्र, आज सकाळपासून पावसाने मुंबईत जोरदार हजेरी लावत मुंबईची दाणादाण उडवून दिली. मुंबईत अनेक सखल भागात पाणी साचले. त्यामुळे सायन, चेंबूर, अंधेरी, कुर्ला, गोरेगाव, वरळीसह मुंबईतील विविध भागात वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती. रस्त्यावर वाहनांच्या प्रचंड रांगाच रांगा लागल्याने अनेकांना कारमध्येच तिष्ठत बसावे लागले होते. वरून कोसळणारा धोधो पाऊस आणि वाहतूककोंडीत तिष्ठत बसावे लागत असल्याने चाकरमानी संतापले होते.

लोकल ठप्प, चाकरमानी वैतागले

सकाळपासून पाऊस पडत असल्याने कुर्ला आणि सीएसएमटी या रेल्वे स्थानकांदरम्यानच्या रेल्वे ट्रॅकवर पाणी साचले आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून 9 वाजून 50 मिनिटांनी अप मार्गावरील रेल्वेसेवा थांबवण्यात आली. ट्रॅकवरील पाणी ओसरल्यानंतर ही रेल्वे सेवा पुन्हा सुरु करण्यात येईल, असे मध्य रेल्वेच्या जनसंपर्क कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. मात्र, लोकल ठप्प झाल्याने चाकरमानी चांगलेच वैतागले आहेत.

विरोधक भडकले

काँग्रेसचे महापालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी महापालिकेची नालेसफाईची आकडेवारी खोटी असल्याचा दावा केला आहे. पालिकेने नालेसफाईची खोटी आकडेवारी दिली. पहिल्याच पावसात त्याची पोलखोल झाली, असा दावा रवी राजा यांनी केला आहे. तर, मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेची प्रत्येक पावसाळ्यात पोलखोल होत असल्याचं म्हटलं आहे. पालिका प्रशासन काय काम करते हे आजच्या पहिल्याच पावसातून दिसून आल्याची टीकाही देशपांडे यांनी केली.

पालिकेचा दावा काय?

महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी काल मंगळवारी मुंबईतल्या विविध एजन्सीच्या प्रतिनिधींची बैठक बोलावली होती. त्यानंतर पालिकेने प्रसिद्धी पत्रक काढून मुंबईत 104 टक्के नालेसफाई झाल्याचा दावा केला होता. मुंबईतील मोठ्या नाल्यांमधून पावसाळा पूर्व कामांच्या उद्दिष्टाच्या तुलनेत अधिक म्हणजे 104 टक्के गाळ काढण्यात आला आहे. एकूण 3 लाख 11 हजार 381 मॅट्रिक टन गाळ काढण्याचे उद्दिष्ट महानगरपालिकेने यंदा समोर ठेवले होते. त्या तुलनेत 3 लाख 24 हजार 284 मॅट्रिक टन इतका गाळ काढून वाहून नेण्यात आला आहे. निश्चित केलेल्या मुदतीत म्हणजे मे अखेरीपर्यंत ही कामगिरी साध्य करण्यात आली आहे, असं पालिकेने म्हटलं होतं.

चार दिवस बरसणार

हवामान विभागाकडून मुंबईसह कोकणातील सर्व जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. पुढील 4 दिवस हे मुंबईसाठी धोक्याचे असणार आहेत. या काळात 300 मिलिमीटरहून जास्त पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. (Heavy rainfall lashes, Waterlogging In Mumbai)

संबंधित बातम्या:

Mumbai Rains Live: मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये मान्सून दाखल, पुढील 2-3 दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात सक्रिय होणार

मोठी बातमी: मुंबईत मुसळधार पाऊस, ट्रॅकवर पाणी साचल्याने मध्य आणि हार्बर रेल्वे वाहतूक ठप्प

Mumbai Rains: भूमिगत टाक्यांचा प्रकल्प रखडल्याने यंदा सुद्धा हिंदमाता पाण्याखाली

(Heavy rainfall lashes, Waterlogging In Mumbai)