देशातील पहिल्या इलेक्ट्रीक डबल डेकर बसमध्ये लयच गडबड

लाल आणि काळ्या रंगसंगतीच्या या बस अशोक लेलॅंड आणि स्विच मोबिलीटी कंपनी यांच्याकडून भाड्यावर घेण्यात आल्या आहेत.

देशातील पहिल्या इलेक्ट्रीक डबल डेकर बसमध्ये लयच गडबड
DOUBLE
Image Credit source: socialmedia
| Updated on: Feb 22, 2023 | 1:46 PM

मुंबई : देशातील पहिली इलेक्ट्रीक एसी डबल डेकर मुंबईच्या रस्त्यावर कालपासून धावू लागली आहे. मुंबईतील वाढत्या तापमानामुळे ही वातानुकूलीत इलेक्ट्रीक डबल डेकर दिलासा देत आहे. या बसला विना कंडक्टर चालविण्याचा प्रयत्न काल पहिल्याच दिवशी उधळला गेला आहे. मुंबईच्या रस्त्यावर काल मंगळवारपासून इलेक्ट्रीक डबल डेकर बस धावू लागली आहे. प्रवाशांना ही बस आवडली असून तिची वातानुकूलित यंत्रणा बेस्टच्या इतर एसी बसच्या तुलनेत चांगली असल्याचे म्हटले जात आहे. तर काही प्रवाशांना तिचे आतील इंटेरीयर आवडलेले नाही.

लंडन धर्तीच्या या बसला मंगळवारपासून  ( मार्ग क्र. 115 ) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते एनसीपीए दरम्यान चालविले जात आहे. या बसला विना कंडक्टर चलो एप आणि स्मार्टकार्डद्वारे कॅशलेस तिकीटाद्वारे चालविण्याची घोषणा केली होती. परंतू सगळ्याच प्रवाशांकडे स्मार्डकार्ड नसल्याने प्रवाशांनी गोंधळ घातला. त्यामुळे या बसला काल दुसऱ्या फेरीलाच कंडक्टर नेमावा लागला.

लाल आणि काळ्या रंगसंगतीच्या या बस अशोक लेलॅंड आणि स्विच मोबिलीटी कंपनी यांच्याकडून भाड्यावर घेण्यात आल्या आहेत. सध्या बेस्ट डीझेलवर धावणाऱ्या पारंपारीक अशा केवळ पन्नास बसेस उरल्या आहेत. बेस्ट अशा नव्या आणखी 200 इलेक्ट्रीक डबल डेकर भाड्याने घेणार आहे.  पहिल्या दिवशी या इलेक्ट्रीक डबल डेकर बसच्या फेरीचा आनंद घेण्यासाठी अनेक जण दक्षिण मुंबईत आले होते.

दोन आसने काढावीत अशी मागणी

काही प्रवाशांना ही बस आवडली तिचा वातानुकूलित यंत्रणा बेस्टच्या इतर एसी बसच्या तुलनेत चांगली असल्याचे म्हटले आहे. तर काही प्रवाशांना तिचे आतील इंटेरीयर आणि रंग आवडला नाही.  या बसला पुढे आणि मागे असे दोन दरवाजे आहेत. वरून येणाऱ्या जिन्याच्या शेवटच्या पायरीला लागूनच दोन फूटावर  दोन आसने असल्याने आपात्कालिन परिस्थितीत बसमधून बाहेर पडताना अडचण येईल असे म्हटले जात आहे. बहुतांश प्रवाशांनी ही दोन आसने काढावीत अशी मागणी केली आहे.

लॅंडीग स्पेस नसल्याने अडचण 

वरच्या मजल्यावरुन उतरताना पायऱ्याजवळ आसन असल्याने वरून येणाऱ्या प्रवाशांना लॅंडीग स्पेस नसल्याने आरटीओने या बसला मान्यता कशी दिली असा सवाल बेस्ट पॅनलवरील एका माजी कर्मचाऱ्याने केला आहे. त्यामुळे पायरीला लागून असलेली ही दोन आसने काढावीत असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तर या बसची नोंदणी करणाऱ्या वाशी आरटीओच्या डेप्युटी आरटीओ हेमांगीनी पाटील यांनी ऑटोमोटीव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडीयाने बसच्या सर्व मेजरमेंट पाहून मान्यता दिल्याचे पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.