School bus fare : इंधन दरवाढीचा फटका; स्कूल बसच्या भाड्यात वीस टक्क्यांची वाढ, पालकांवरील खर्चाचा बोजा वाढणार

| Updated on: Jun 13, 2022 | 8:20 AM

स्कूल बसच्या भाड्यात 20 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. वाढत्या पेट्रोल, डिझेल दराच्या पार्श्वभूमीवर ही वाढ करण्यात आल्याची माहिती स्कूल बस ओनर्स असोसिएशनच्या वतीने देण्यात आली आहे.

School bus fare : इंधन दरवाढीचा फटका; स्कूल बसच्या भाड्यात वीस टक्क्यांची वाढ, पालकांवरील खर्चाचा बोजा वाढणार
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us on

मुंबई : देशात महागाई वाढतच आहे. या माहागाईचा (Inflation) सर्वाधिक फटका हा मध्यमवर्गीय लोकांना सहन करावा लागत आहे. पेट्रोल (Petrol), डिझेलपासून ते खाद्यतेलापर्यंत आणि अन्नधान्यापासून ते भाजीपाल्यापर्यंत सर्वच वस्तुंच्या दरात मोठी वाढ झाली आहे. येत्या बुधवारपासून शाळा सुरू होत आहेत. आपल्या पाल्याला शाळेत आवश्यक असणारा गणवेश, वह्या, पुस्तके तसेच इतर शालेय साहित्य खरेदीसाठी पालकांची लगबग सुरू झाली आहे. शालेय साहित्यांचे दर देखील वाढल्याने पालकांना खरेदीसाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागत आहेत. हे थोडे की काय म्हणून आता आणखी एक मोठा फटका पालकांना बसणार आहे. स्कूल बसचा प्रवास महाग झाला आहे. स्कूल बसचे भाडे (School bus fare) 20 टक्क्यांनी वाढवण्यात आले आहे. याबाबत स्कूल बस ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी माहिती दिली. त्यामुळे आता पालकांच्या खर्चात वाढ होणार आहे.

गेल्या दोन वर्षांपासून मागणी

याबाबत बोलताना अनिल गर्ग यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. पेट्रोल, डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. वाढत्या इंधन दराच्या पार्श्वभूमीवर आम्ही गेल्या दोन वर्षांपासून स्कूल बसच्या भाड्यात वाढ करण्याची मागणी करत आहोत. मात्र तरी देखील स्कूल बसच्या भाड्यात वाढ न करण्यात आल्याने याचा मोठा फटका हा स्कूल बस व्यवसायाला बसला आहे. आम्ही एप्रिल महिन्यात स्कूल बसच्या भाड्यात तीस टक्के भाडेवाढीचा निर्णय घेतला होता. मात्र पालकांच्या अडचणी समजून घेत, आम्ही स्कूल बसच्या भाड्यात वीस टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या स्कूल बस ओनर्स असोसिएशकडून एका विद्यार्थ्यासाठी वर्षाला 1 हाजर 800 रुपये इतके भाडे आकारण्यात येत असल्याचे देखील गर्ग यांनी म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

पालकांचा मोर्चा रिक्षांकडे

दरम्यान स्कूल बसच्या भाड्यात वाढ झाल्याने अनेक पालकांनी मुलाला शाळेत पोहोचवण्यासाठी आता रिक्षाच्या पर्यायाची निवड केली आहे. तर काही पालक व्हॅनमधून आपल्या पाल्याला शाळेत पाठवत आहेत. याबाबत बोलताना गर्ग म्हणाले की, अनेकदा खासगी वाहनांमधून अवैध पद्धतीने वाहतूक केली जाते. क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी भरले जातात. यामुळे विद्यार्थ्याच्या जीवाला धोका होऊ शकतो. स्कूल बसची क्षमता चाळीस सीटची असते, आम्ही एका स्कूलबसमध्ये तेवढ्याच विद्यार्थ्यांची वाहतूक करतो.