500 Crore Audio Clip: 500 कोटींच्या ऑडिओ प्रकरणाचा तपास SIT कडे, हा IPS अधिकार करणार तपास, अंतरवाली सराटीशी काय कनेक्शन?
Manoj Jarange 500 crore audio clip : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या आठवड्यात 500 कोटीच्या ऑडिओ क्लिपचा बॉम्ब टाकला. त्याची आता विशेष पथकाकडून चौकशी होणार आहे. या अधिकाऱ्याची फडणवीस सरकारने नियुक्ती केली आहे.

IAS Officer Shailesh Balkawade: मनोज जरांगे पाटील यांची गेल्या आठवड्यात 500 कोटींची ऑडिओ क्लिप गाजली. राज्यातील राजकारण ढवळून निघाले. शिंदे सेना आणि भाजपमध्ये वाकयुद्ध रंगले. या ऑडिओ क्लिपवरून रोज नवनवीन दावे प्रतिदावे सुरूच आहे. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना केली. हे पथक ऑडिओ क्लिप खरी की खोटी, एआय जनरेटेड याविषयीचा तपास करेल. सरकारने त्यासाठी आयपीएस अधिकारी नियुक्त केला आहे.
या अधिकाऱ्याकडे तपासाची सूत्र
राज्य सरकारने 500 कोटींच्या ऑडिओ क्लिप प्रकरणात एसआयटी स्थापन केली आहे. अप्पर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे यांच्या अध्यक्षतेखाली ही विशेष तपास समिती नेमण्यात आली आहे. ही त्रिसदस्यीय समिती या प्रकरणाचा छडा लावणार आहे. ही ऑडिओ क्लिप कोणी कुणाला पाठवली. तिची सत्यता आणि त्यातील आवाज यासंबंधीचा तपास करण्यात येणार आहे.
या समितीत अप्पर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे यांच्यासोबत पोलीस उपायुक्त विजयकांत सागर आणि बजरंग बनसोडे यांचाही समावेश आहे. ही त्रिसदस्यीय समिती या ऑडिओ क्लिपविषयी तपास करणार आहे. आता ही समिती कोणा कोणाची चौकशी करते आणि त्यातून काही ट्विस्ट समोर येतो का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या राज्यात मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या 500 कोटींच्या आरोपांवरून मोठे वादंग सुरू झाले आहेत.
अंतरवाली सराटीशी काय कनेक्शन?
IPS अधिकारी शैलेश बलकवडे यांनी गोंदिया, नागपूर ग्रामीण, कोल्हापूर येथे पोलीस अधिक्षक म्हणून काम पाहिलेले आहे. जालना जिल्ह्यात तीन वर्षांपूर्वी अंतरवाली सराटीत मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरू असताना लाठीहल्ला झाल्याचा आरोप करत आंदोलन पेटले. त्यावेळी तुषार दोषी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते. त्यांच्या जागी शैलेश बलकवडे यांची जिल्ह्याच्या पोलीस अधिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी यापूर्वी गडचिरोलीच्या नक्षलवादी भागात दोन वर्षे सेवा बजावलेली आहे.
शैलेश बलकवडे हे 2010 च्या बॅचचे अधिकारी आहेत. ते सध्या मुंबई पोलीस दलात अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक म्हणून नक्षलविरोधी मोहिमांमध्ये त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. त्यांनी यापूर्वी कोल्हापूर, जालना जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक म्हणून काम पाहिलेले आहे. जालन्यात मराठा आंदोलन पेटल्यानंतर त्यांची पोलीस अधिक्षक पदी नियुक्ती करण्यात आली होती. तर यापूर्वी त्यांनी नागपूर ग्रामीण, नागपूर शहर आणि अहिल्यानगर येथेही सेवा बजावली आहे.