Hrithik Roshan-Sussanne Khan: 14 वर्षांचा संसार मोडला, हृतिक रोशनची पूर्व पत्नी सुझान खान दुसऱ्यांदा बांधणार लग्नगाठ?
हृतिकसोबतचं नातं कायम खास राहील, असंही सुझानने सांगितलं. सुझान आणि अर्सलान यांच्या नात्याची चर्चा अनेकदा होते. त्यामुळे दोघं लग्न कधी करणार, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

अभिनेता हृतिक रोशन आणि सुझान खान ही एकेकाळची लोकप्रिय जोडी होती. दोघांनी 2000 मध्ये लग्न केलं होतं. मात्र, लग्नाच्या 14 वर्षांनंतर 2014 मध्ये त्यांनी घटस्फोट घेत आपापले मार्ग वेगळे केले. त्यांच्या विभक्त होण्याच्या निर्णयाने चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. मात्र, घटस्फोटानंतरही दोघांनी एकमेकांशी असलेलं मैत्रीचं नातं जपलं आहे. आता दोघंही आपल्या आयुष्यात पुढे गेले असून, सुझानने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिचं नातं, हृतिकची गर्लफ्रेंड सबा आझाद आणि मुलांच्या संगोपनाविषयी मोकळेपणाने भाष्य केलं आहे. हृतिकपासून विभक्त झाल्यानंतर सुझान खानच्या आयुष्यात अभिनेता अर्सलान गोनी याची एण्ट्री झाली. सध्या दोघंही रिलेशनशिपमध्ये आहेत. अर्सलानसोबतच्या नात्याबद्दल बोलताना सुझानने आनंद व्यक्त केला. तिच्या मते, अर्सलान तिच्या आयुष्यात योग्य वेळी आला. त्या काळात दोघांनाही प्रेमाची आणि एकमेकांच्या साथीची गरज होती.
माझ्या आयुष्यात अर्सलान आल्यामुळे मी स्वतःला खूप नशीबवान समजते. तो एक उत्तम व्यक्ती असून, त्याच्या साथीने माझ्या आयुष्यात प्रेम आणि आनंद आला आहे. आयुष्यात कितीही अडचणी आल्या, तरी एकमेकांची साथ सोडायची नाही, असा आमचा निर्धार आहे, असं सुझान म्हणाली.
View this post on Instagram
‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत सुझान पुढे म्हणाली, “आम्ही एकमेकांना नेहमी सांगतो की परिस्थिती काहीही असो, आम्ही आमचं आयुष्य आमच्या क्षमतेनुसार सर्वोत्तम जगू. तसा आमचा दृढनिश्चय आहे. आमच्या मार्गात कितीही आव्हानं आली तरी आम्ही एकमेकांच्या पाठीशी उभे राहतो आणि हीच सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहे. अर्सलानसोबतच्या माझ्या नात्याबद्दल मी खूप निश्चिंत आहे. माझी कारकीर्द उत्तम चालली आहे. मला खूप छान मुलं आहेत आणि माझं आयुष्य जसं चाललं आहे, त्यात मी पूर्णपणे समाधानी आहे.”
हृतिक रोशन सध्या अभिनेत्री आणि गायिका सबा आझाद हिला डेट करत आहे. हृतिक आणि सबाच्या नात्याबद्दल सुझानने सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. सबा ही खूप चांगली व्यक्ती असल्याचं सांगत, तिच्यासारखी जोडीदार मिळाल्यामुळे हृतिक खरोखर नशीबवान असल्याचं सुझान म्हणाली. सुझानच्या या वक्तव्यामुळे तिच्या आणि हृतिकच्या नात्यातील सहजता पुन्हा चर्चेत आली आहे. घटस्फोटानंतरही दोघांनी एकमेकांच्या वैयक्तिक आयुष्याचा आदर केला आहे. दोघंही आपल्या सध्याच्या नात्यांमध्ये आनंदी असल्याचं सुझानने स्पष्ट केलं. हृतिक आणि सुझान यांना हृहान आणि हृदान ही दोन मुलं आहेत. घटस्फोटानंतरही दोघं मिळून मुलांचा सांभाळ करतात. मुलांच्या आनंदाला आणि भवितव्याला प्राधान्य देत त्यांनी पालक म्हणून आपली जबाबदारी कायम जपली आहे.
