Sanjay Raut: बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो दिसतोय का कुठे? त्या होर्डिंगवरून संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंना घेरले

Sanjay Raut criticized Eknath Shinde Shivsena: पुण्यनगरीत काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या स्वागतासाठी बॅनर्स लावण्यात आले. त्यातील काही बॅनर नंतर उतरवण्यात आले. पुण्यातीलच एक बॅनर सोशल मीडियावर शेअर करत खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी बॅनरवरून शिंदे सेनेवर टीका केली आहे.

Sanjay Raut: बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो दिसतोय का कुठे? त्या होर्डिंगवरून संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंना घेरले
संजय राऊत, एकनाथ शिंदे
| Updated on: Aug 02, 2026 | 11:26 AM

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे काल पुणे दौऱ्यावर होते. त्यांच्या हस्ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. शाह हे पुण्यात आलेले असताना त्यांच्या स्वागतासाठी महायुतीकडून बॅनरबाजी करण्यात आली. शहरात ठिकठिकाणी राजकीय चाणक्य म्हणून अनेक ठिकाणी बॅनर लावण्यात आले होते. शिंदे सेनेने लावलेल्या एका बॅनर सोशल मीडियावर शेअर करत उद्धव सेनेचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी शिंदे सेनेवर जोरदार टीका केली आहे. तर आज घेतलेल्या पत्रकार परिषदेतही राऊतांनी या विषयावर भाष्य केले.

ठाकरे यांचा फोटो दिसतोय का कोठे?

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांनी पुण्यातील एक बॅनर शेअर करत शिंदे सेनेवर मोठी टीका केली. अमित शाह यांच्या स्वागतासाठी हे बॅनर लावण्यात आले होते. शिंदे सेनेकडून हे बॅनर लावण्यात आले होते. त्यावरून राऊतांनी शिंदेंवर निशाणा साधला आहे. त्यांनी या बॅनरवरून खरमरीत टीका केली आहे.

“हिंदूहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो दिसतोय का कोठे? सोडा, श्री आनंद दिघे सुद्धा गायब झाले! काल पुण्यात अमित शहा यांच्या स्वागताचे हे होर्डिंग्स आहेत! बहुधा मालकांना चालत नसावेत! हळू हळू ढोंग उघडे पडत आहे!” असे ट्वीट संजय राऊत यांनी केले आहे. त्यांनी या ट्विटमध्ये एकनाथ शिंदे आणि अमित शाह यांचा उल्लेख करत निशाणा साधला आहे. काल पुण्यात शाह यांचे काही होर्डिंग अचानक काढण्यात आले. त्यामागील कारण काही समोर आले नाही.

काँग्रेसचे मोठे आंदोलन

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या पुणे दौऱ्यावरून संजय राऊत यांनी तोंडसुख घेतले होते. तर काँग्रेस कार्यकर्ते काल रस्त्यावर उतरले. त्यांनी अमित शाह यांच्या विरोधात मोठे आंदोलन केले. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यात पोलिसांनी मोठा तगडा बंदोबस्त ठेवला होता. शहरात काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली. अमित शाह हे विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीहल्ल्यासंदर्भात काहीच बोलत नाहीत, त्यांनी माफी मागितली नाही असा आरोप काँग्रेसने केला. वंचित बहुजन आघाडीने सुद्धा आंदोलन केले. काल अमित शाह यांच्या हस्ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला. या दोघांनी भाषणात टिळकांच्या आठवणी जागवल्या.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us