
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिका निवडणुकी संदर्भात एक महत्वाचं वक्तव्य केलं आहे. मुंबई महापालिका निवडणूक महायुती म्हणून लढणार आहोत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुंबई महापालिकेत महायुती 227 जागांवर लढणार हे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलय. मुंबई महापालिका निवडणुकी संदर्भात वर्षा बंगल्यावर एक बैठक झाली. मुंबईतील सहा विभागांचा या बैठकीत आढावा घेण्यात येणार असल्याचं समजतय. याच बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई महापालिकेचा सर्व आढावा घेणार अशी माहिती आहे. आजच्या बैठकीत भाजप उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकतं. मागच्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजपमध्ये जागा वाटपावर बोलणी सुरु आहेत.
मुंबई महापालिका निवडणुकी संदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी एक वक्तव्य केलय. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला सुद्धा सोबत घेणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे. कारण मुंबईत पालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीला सोबत न घेण्यासाठी भाजपने नवाब मलिक यांचं कारण पुढे केलं होतं. नवाब मलिक यांना भाजपचा विरोध आहे. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप-शिवसेना सोबत निवडणूक लढतील. राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्रपणे लढेल असं म्हटलं जात होतं. पण आता देवेंद्र फडणवीस यांनी महायुती म्हणून मुंबई पालिकेची निवडणूक लढणार असं म्हटलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला असलेला भाजपचा विरोध मावळला का? शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे तीन पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवणार का? अशी चर्चा सुरु झालीय.
काही जागा ते लढतील, काही आपण लढू
“निवडणुकांमध्ये २२७ जागा आहेत. आपला मित्र पक्ष शिवसेना आहे. महायुती करणार आहोत. काही जागा ते लढतील, काही आपण लढू. अनेकांच्या इच्छा, अपेक्षा, आकांक्षा असू शकतात. अनेक प्रभागात अनेक चांगले कार्यकर्ते आहेत. पण शेवटी काही लोकांनाच आपण तिकीट देऊ शकणार आहोत. आज आपण संकल्प करण्याची आवश्यकता आहे. तिकीट मिळो अथवा न मिळतो, आपण अटलजींच स्वप्न साकार करण्यासाठी मैदानात उतरायचं आहे” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.