
फरार आरोपी गोट्या गितेचा 9 मिनिटांचा व्हिडिओ तुफान व्हायर झाला. गोट्या सध्या फरार आहे. पण त्याचे सोशल मीडिया खाते सक्रीय आहे. त्याने धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या अनुषंगाने आव्हाड यांच्यावर आरोप केले. इतकेच नाही तर आव्हाड यांना जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली. बीडमध्ये गेल्या काही दिवसांपासून समाजकारण आणि राजकारण पार ढवळून निघाले आहे. विविध हत्यासत्र, धमकीसत्र, खंडणीसत्राने हा जिल्हा बदनाम झाला आहे. त्यात न्याय आंदोलनात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हिरारीने भूमिका घेतली होती. त्यामुळे ते ही या टोळीच्या रडारवर आले आहेत.
या गँगमुळे समाज बदनाम
आमची आई भाजी विकत होती, आम्ही संघर्षातून वर आलो आहोत. हे काय आम्हाला वंजाऱ्यांचं सर्टिफिकेट देतील. या गँगने वंजाऱ्यांना बदनाम करून टाकलं. उभ्या समाजाला बदनाम केलं. सर्व समाजाला कुणाच्या तरी विरुद्ध उभं केलं. वंजारी हा कुणाचा विरोधकच नाही. भगवान बाबा सर्व समाजाला सोबत घेऊन जाणारे होते. या लोकांनी वंजारी समाजाला बदनाम करून टाकले आहे, असा घणाघात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला. फरार आरोपी गोट्या गितेने त्यांना धमकी दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यात गितेने अनेक आरोप केले आहेत. त्याला आव्हाडांनी आज पत्रकार परिषद घेत खणखणीत उत्तर दिले.
अशा धमक्यांना भीक घालत नाही
मी तर चांगल्या चांगल्याविरोधात बोलतो. हा कोण गोट्या, फोट्या? अशा धमक्यांना मी घाबरत नाही. या धमक्यांमुळे मी माझं बोलणं थांबवणार नाही. त्याला कोण घाबरतो. त्याने कोणतीही धमकी देऊद्यात, मी त्याला घाबरत नाही असे जितेंद्र आव्हाड म्हणाले. गोट्या गितेसाठी वाल्मिक कराड हा दैवत्त नाही तर विठ्ठल असू देत, आपण त्यावर बोलण्यात काय अर्थ.
सनातन धर्मामुळे वर्ण व्यवस्था
तथागत गौतम बुद्ध यांनी पहिला लढा कुणाविरुद्ध दिला तर तो सनातन धर्माविरुद्ध दिला. वर्णव्यवस्था कोणी आणली भारतात, तर ती सनातन धर्माने आणली. चार्वाक, बसवाचार्य यांना कोणी मारलं. यांना आत्महत्येसाठी कोणी प्रवृत्त केलं. ज्ञानेश्वर माऊलींना कोणी छळलं. तुकाराम महाराज यांना कोणी छळलं. गाथा कोणी बुडावल्या. हा जातीद्वेष या समाजात कोणी आणला. शिवाजी महाराजांना राज्यभिषेकापासून कोणी रोखलं. हे सनातन दहशतवादीच होते. संभाजी महाराजांची क्रूर हत्या दुश्मनांकरवी करण्याचा प्लॅन कुणी आखला. संभाजी महाराजांनी ज्या पाच जणांना हत्तीच्या पायी दिले, ते पाचही जण सनातन दहशतवादीच होते. संभाजी महाराजांना तेच फसवू पाहत होते. म्हणून महाराजांनी त्यांना हत्तीच्या पायी दिले. या अशा समाजव्यवस्थेविरोधात महात्मा फुले हे पहिल्यांदा उभे ठाकले. त्यांना कोणी छळलं. महात्मा फुले, त्यांच्या पत्नी सावित्रीबाई, शाहू महाराज यांना बदनाम करण्याचे, त्यांना मारण्याचे षडयंत्र कुणी केले, तर ते सनातन दहशतवाद्यांनी केलं, असा घाणाघात जितेंद्र आव्हाड यांनी घातला.