Jitendra Awhad : मुंबई राहणाऱ्या झोपडपट्टी वासियांसाठी खुशखबर! 517 झोपडपट्ट्यांना अभय मिळणार! 50 हजार कुटुंबांना फायदा

ज्या 517 प्रकल्पांना 5 वर्षांहून अधिक काळ होऊन गेला आहे आणि ज्यामध्ये कुठल्याही प्रकारचे काम झालेले नाही. अशा प्रकल्पांना रद्दबातल ठरविण्यात येत आहे. याची नवीन प्रक्रिया सुरु होईल, अशी माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिलीय.

Jitendra Awhad : मुंबई राहणाऱ्या झोपडपट्टी वासियांसाठी खुशखबर! 517 झोपडपट्ट्यांना अभय मिळणार! 50 हजार कुटुंबांना फायदा
मुंबईतील झोपडपट्टी वासियांना जिदेंद्र आव्हाडांची खुशखबर
Image Credit source: TV9
| Updated on: May 06, 2022 | 5:56 PM

मुंबई : मुंबईत राहणाऱ्या झोपडपट्टी वासियांसाठी (Slum dwellers) एक महत्वाची बातमी आहे. ‘ज्या 517 प्रकल्पांना 5 वर्षांहून अधिक काळ होऊन गेला आहे आणि ज्यामध्ये कुठल्याही प्रकारचे काम झालेले नाही. अशा प्रकल्पांना रद्दबातल ठरविण्यात येत आहे. याची नवीन प्रक्रिया सुरु होईल. त्याचबरोबर ह्या सगळ्या प्रकल्पांना अभय योजना देखील लागू होईल. अभय योजनेचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे झोपडपट्टी विकासाला (Slum development) प्रचंड गती येईल. ह्या योजनेचा मुंबईतील 50000 कुटुंबाना फायदा होईल मुख्यमंत्री महोदयांनी सदर अभय योजनेला मान्यता दिली’, अशी माहिती जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी दिली आहे.

पुनर्वसन रखडलेल्या 523 झोपडपट्ट्यांसाठी ॲमनेस्टी स्कीम

यापूर्वीही जितेंद्र आव्हाड यांनी झोपडपट्टी वासियांसाठी महत्वाचे निर्णय घेतले आहेत. मुंबईतील पुनर्वसन रखडलेल्या 523 झोपडपट्ट्यांसाठी ॲमनेस्टी स्कीम सरकारकडून तयार करण्यात आली असून मुख्यमंत्र्यांच्या अंतिम मंजूरीसाठी ही फाईल गेली आहे. येत्या दोन दिवसात या बाबत निर्णय अपेक्षित आहे, अशी माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मार्चमध्ये विधानसभेत दिली. कुर्ला पश्चिम येथील प्रिमियम कंपनीच्या जागेवरील रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचा तारांकित प्रश्न विधानसभेत उपस्थितीत करण्यात आला होता. या प्रश्नावर उपप्रश्न विचारताना भाजपा आमदार आशिष शेलार यांनी मुंबईतील अशा रखडलेल्या पुनर्वसन प्रकल्पांकडे सरकारचे लक्ष वेधले होते. त्यावर जितेंद्र आव्हाड यांनी ही घोषणा केली होती.

रेल्वे लगतच्या झोपड्यांचे पुनर्वसन

रेल्वेलगत असलेल्या झोपड्यांचे पुनर्वसन होण्याचे संकेतही आव्हाड यांनी फेब्रुवारीत दिले होते. शासन झोपडीत राहणाऱ्या गरिबांच्या बाजूने असून रेल्वे लगतच्या झोपड्यांचे पुनर्वसन करायचे असल्यास राज्य शासनाच्या धोरणानुसारच पुनर्वसन करा. तसा प्रस्ताव रेल्वेने केंद्राला पाठवावा असे, जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. आव्हाड यांनी मुंबईतील शिवगड येथील त्यांच्या निवासस्थानी काल रेल्वे अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. सुमारे दोन ते अडीच तास ही चर्चा झाली. यावेळी रेल्वेलगतच्या झोपड्यांचे पुनर्वसन कुठे करायचे? तसेच रेल्वे लगतचा परिसर मोकळा करण्यावर चर्चा झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी रेल्वे अधिकाऱ्यांनीही रेल्वे लगतच्या झोपड्यांचे पुनर्वसन करण्यास सकारात्मकता दर्शवली असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे रेल्वे लगतच्या झोपड्यांचे लवकरात लवकर पुनर्वसन होणार असल्याचे सांगितलं जात आहे.