जितेंद्र आव्हाड यांच्या पाठीमागे अडचणींचा डोंगर, आता थेट सुप्रीम कोर्टाचे निर्देश, काय घडणार?

| Updated on: Feb 27, 2023 | 5:51 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण अनंत करमुसे (Anant Karmuse case) मारहाण प्रकरणी सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.

जितेंद्र आव्हाड यांच्या पाठीमागे अडचणींचा डोंगर, आता थेट सुप्रीम कोर्टाचे निर्देश, काय घडणार?
जितेंद्र आव्हाड
Image Credit source: social media
Follow us on

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण अनंत करमुसे (Anant Karmuse case) मारहाण प्रकरणी सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) 3 महिन्यांत दोषारोपपत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत. जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात 5 एप्रिल 2020 रोजी सोशल मीडियावर आक्षेपार्ह विधान केले, असा आरोप करत आव्हाड यांच्या समर्थकांनी अनंत करमुसे यांना मारहाण केलेली, असा आरोप आहे. करमुसे हे घोडबंदच्या कावेसरमध्ये राहतात. तिथून करमुसे यांना जितेंद्र आव्हाड यांच्या निवासस्थानी नेण्यात आले. तिथे ही मारहाण झाली होती, असा आरोप आहे.

ठाणे पोलिसांनी या प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांना 14 ऑक्टोबर 2021 रोजी अटक केली होती. त्यानंतर त्यांची जामिनावर सुटका झाली. या प्रकरणात करमुसे यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतलेली. आपल्याला सुप्रीम कोर्टात न्याय मिळेल, असा त्यांचा दावा आहे. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणी आता राज्य पोलिसांना पुढील 3 महिन्यांत तपास करून कोर्टात दोषारोपपत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. “जितेंद्र आव्हाड हे डॉक्टर नाहीत. मात्र त्यांनी स्वतः डॉक्टर असल्यासारखे आपल्या गुंडांना जामिनासाठी कोरोना सर्टिफिकेट दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आम्हाला न्याय देतील”, अशी प्रतिक्रिया अनंत करमुसे यांनी दिलीय.

नेमकं प्रकरण काय?

जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी आपल्याला घरातून उचलून नेऊन अमानुषपणे मारहाण केल्याचा आरोप ठाण्यातील सिव्हील इंजिनिअर असलेल्या अनंत करमुसे या तरुणाने केला होता. फेसबुकवर आक्षेपार्ह कमेंट केल्याने या तरुणाला आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी आणि सुरक्षा रक्षकांनी उचलून नेऊन मारहाण केल्याचा आरोप या तरुणाने केला होता. यावेळी स्वत: जितेंद्र आव्हाडही त्याठिकाणी उपस्थित होते, असाही दावा त्या तरुणाने केला होता. तरुणाच्या आरोपानंतर या प्रकरणाचे मोठे राजकीय पडसाद उमटले होते. याच प्रकरणात आव्हाड यांच्याविरोधात गुन्हादेखील दाखल करण्यात आलेला आहे.

हे सुद्धा वाचा

अनंत करमुसे मारहाण प्रकरणात जितेंद्र आव्हाड यांना अटक आणि जामिनावर सुटका झाली होती. ही बातमी कुठेही समोर आली नाही. मात्र भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ट्वीटरद्वारे हा गौप्यस्फोट केला होता. ठाण्यातील वर्तक नगर पोलिसांनी जितेंद्र आव्हाड यांचा जबाब नोंदवण्यात आला. त्यानंतर त्यांना दुपारी 4.30 वाजता कोर्टात हजर करण्यात आलं. मूळ एफआयआरमध्ये त्यांचं नाव नव्हतं. त्यांच्यावर अपहरण आणि मारहाणीचे आरोप करण्यात आले होते. कोर्टात हजर करण्यात आल्यानंतर त्यांना दहा हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सोडून देण्यात आलं होतं.

जितेंद्र आव्हाड यांच्यामागे अडचणींचा डोंगर

जितेंद्र आव्हाड यांच्यामागे अडचणींचा डोंगर उभा असल्याचं सध्याचं चित्र आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीला आणि जावायाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची बातमी समोर आलेली. आव्हाडांच्या कार्यकर्त्यांनी याप्रकणी ठाणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्ताला मारहाण केली. या प्रकरणाआधी एक महिलेचा विनयभंग केल्याच्या आरोपांप्रकरणी ते प्रचंड अडचणीत आले होते. त्याआधी त्यांनी एका चित्रपटावर आक्षेप घेत संबंधित चित्रपटाचा शो रद्द केला होता. त्यावेळी एका प्रेक्षकाला मारहाण झाल्याचं समोर आलेलं. या प्रकरणावरुनही ते अडचणीत आलेले.