मुंबईच्या तुफानी पावसातील वॉरिअर, कांताबाईंचं प्रसंगावधान, सहा तास ‘मॅनहोल’जवळ थांबून वाहतुकीचं नियंत्रण

| Updated on: Aug 08, 2020 | 1:20 PM

मॅनहोलमध्ये पडून दुर्घटना होऊ नये, यासाठी फूटपाथवर राहणाऱ्या महिलेने भर पावसात रस्त्यावर उभं राहून मोलाचं काम केलं (Kantabai Mumbai rain warrior )

मुंबईच्या तुफानी पावसातील वॉरिअर, कांताबाईंचं प्रसंगावधान, सहा तास मॅनहोलजवळ थांबून वाहतुकीचं नियंत्रण
Follow us on

मुंबई : मुंबईच्या तुफान पावसात रस्त्यावर तुंबलेल्या पाण्यामुळे, मॅनहोलमध्ये पडून दुर्घटना होऊ नये, यासाठी फूटपाथवर राहणाऱ्या महिलेने भर पावसात रस्त्यावर उभं राहून मोलाचं काम केलं. कांताबाई असं मुंबईच्या पुरातील या वॉरिअर्सचं नाव आहे. (Kantabai Mumbai rain warrior)

मुंबईत बुधवारी जोरदार पाऊस झाला. तुफान वाऱ्यामुळे कधीही न तुंबणारी दक्षिण मुंबईही तुंबली. मुंबईच्या अनेक भागात पाणी-पाणी झालं होतं. रस्ते वाहतूक बंद झाली, पाण्याच्या निचरा होत नव्हता. माटुंगा परिसरातील रस्ते बुडाले होते. पाणी निचरा करणासाठी पालिकेचे कसोशिने प्रयत्न करत होते. जिथे हे कर्मचारी पोहोचले नव्हते, तेव्हा पाण्याचा निचरा करण्याचं काम एका रस्त्याच्या बाजूला राहणाऱ्या महिलेने केलं. तीच महिला म्हणजे कांताबाई. कांताबाईंचा व्हिडीओ सध्या मुंबईच्या पुरातील वॉरिअर्स म्हणून सोशल मीडियावर फिरत आहे.

कांता रत्नमूर्ती (Kanta Ratnamurty) या माटुंगा स्टेशनबाहेर तुलसी पाईप रोडच्या बाजूला फुटपाथवर राहतात. बुधवारी मुंबईत मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. मुंबईच्या बऱ्याच भागात 200 मिमी पेक्षा जास्त पाऊस पडला. अनेक सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी भरलं होतं. ज्या भागात नेहमी पाणी भरत नाही, अशा भागात सुद्धा पाणी तुंबलं. (Kantabai Mumbai rain warrior)

त्यादिवशी माटुंगा परिसरातसुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी भरलं होतं. कांताबाईंनी पालिका प्रशासनाची वाट बघितली पण कोण न आल्याने रस्त्यावरील मॅनहोल उघडा केला, त्या उघडया मॅनहॉलमध्ये लाकडी बांबू टाकून, कांता बाई स्वतः तेथे उभ्या राहिल्या. तब्बल 6 तास त्या पाण्याचा निचरा होईपर्यंत उभ्या होत्या.

समोरुन येणारी गाडी मॅनहोलमध्ये अडकू नये म्हणून त्या स्वत: गाड्यांना हाताने दिशा दाखवून सुरक्षित करत होत्या. कांताबाईंचा हा व्हिडीओ कौतुकाने फॉरवर्ड केला जात आहे. टीव्ही 9 मराठीशी संवाद साधताना, कांताबाईंनी बुधवारच्या पावसाचा अनुभव सांगितला.

“पाऊस मोठा आणि पाणी खूप तुंबलं होतं. पाणी वेगाने वाढत होतं. पाण्याचा निचरा होत होता. त्यामुळे मी मॅनहोल उघडला. मात्र त्यामध्ये कोणी पडू नये किंवा कोणताही अपघात होऊ नये, याची मी काळजी घेतली”, असं कांता यांनी सांगितलं.