Mumbai Lake Water Level | मुंबईच्या 7 ही तलावांमध्ये ‘या’ महिन्यापर्यंत पुरेल इतका पाणीसाठा

Mumbai Lake Water Level | सततच्या पावसामुळे मुंबईकरांची मोठी चिंता दूर होणार आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाला आहे. सध्या किती महिन्यांपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा तलावांमध्ये आहे, त्या बद्दल जाणून घ्या.

Mumbai Lake Water Level | मुंबईच्या 7 ही तलावांमध्ये या महिन्यापर्यंत पुरेल इतका पाणीसाठा
Vaitarana dams
| Updated on: Jul 29, 2023 | 9:31 AM

मुंबई : मुंबईत मागच्या काही दिवसांपासून कोसळधार सुरु होती. कालपासून मुंबईत पावसाने थोडी विश्रांती घेतली आहे. सततच्या कोसळणाऱ्या पावसामुळे कामावर जाणाऱ्या नोकरदारांचे हाल झाले. रस्ते, रेल्व वाहतूक सेवा कोलमडली होती. मुंबईकरांना चिखल तुडवत कार्यालय, घर गाठाव लागत होतं. पण त्याचवेळी या सततच्या पावसामुळे एक चांगली गोष्ट सुद्धा घडली आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये चांगला पाठीसाठा आहे.

महाराष्ट्राच्या ठाणे जिल्ह्यातील मोडक सागर तलाव गुरुवार रात्रीपासून भरुन वाहू लागला आहे. मोडक सागरमधून मुंबई शहर आणि उपनगराला पाणी पुरवठा होता. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी मोडक सागर एक आहे.

चौथा तलाव भरुन वाहू लागला

धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले. त्यातून 6000 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांपैकी भरुन वाहणारा हा चौथा तलाव आहे. तुळशी, विहार, तानसा हे तीन तलाव आधीच भरून वाहू लागले आहेत. मोडक सागर हा मुंबईला पाणी पुरवठा करणारा दुसरा मोठा तलाव आहे.

सातही धरणांची मिळून पाणी साठवण्याची क्षमता किाती?

भातसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तानसा, मोडक सागर, विहार आणि तुळशी तलावातून मुंबईला दरदिवशी 3,800 MLD पाणी मिळतं. मुंबईला पाणीपुरवठा करणारी ही धरणं मुंबई, ठाणे आणि नाशिक जिल्ह्यामध्ये आहेत. या सातही धरणांची मिळून 14,47,363 दशलक्ष लिटर पाणी साठवण्याची क्षमता आहे. सध्या या तलावांमध्ये 10 लाख दशलक्ष लिटरपेक्षा जास्त पाणीसाठा उपलब्ध आहे.


सध्या सातही तलावात किती टक्के पाणीसाठा?

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सातही तलावांमध्ये सध्या 71 % टक्के पाणीसाठा आहे, महापालिकेने शनिवारी सकाळी 6 वाजेपर्यंतची ही आकडेवारी दिली आहे. विहार आणि तुळशी तलावात 100 टक्के पाणीसाठा आहे. तानसामध्ये 99.58%, मोडक सागरमध्ये 100 टक्के, मध्य वैतरणामध्ये 85% आणि भातसामध्ये 63.71% पाणीसाठा आहे. नाशिक जिल्ह्यात असणाऱ्या अप्पर वैतरणामध्ये 47.47% पाणीसाठा आहे.

कधीपर्यंत पुरले इतका पाणीसाठा?

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये बऱ्यापैकी पाणीसाठा असल्याने पुढच्या आठवड्यात मुंबईकरांची पाणी कपातीमधून सुटका होऊ शकते. सध्या एप्रिलपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा सातही तलावांमध्ये आहे.