Flood | मुंबईतील दूध पुरवठ्यात जवळपास 50 टक्के घट, रत्नागिरीत दुधाचा टँकर 2 तासात रिकामा

| Updated on: Aug 09, 2019 | 10:17 AM

कोल्हापूर-सांगलीतील महापुराचा फटका आता मुंबई-पुण्यासारख्या शहरांना बसत आहे.दूध पट्ट्यातील जिल्हे पाण्यात असल्याने तिकडून होणारा दूधपुरवठा थांबला आहे. त्यामुळे  मुंबई, ठाणे, पुण्यात दूध पुरवठ्याचा तुटवडा जाणवत आहे.

Flood | मुंबईतील दूध पुरवठ्यात जवळपास 50 टक्के घट, रत्नागिरीत दुधाचा टँकर 2 तासात रिकामा
Follow us on

मुंबई : कोल्हापूर-सांगलीतील महापुराचा फटका आता मुंबई-पुण्यासारख्या शहरांना बसत आहे.दूध पट्ट्यातील जिल्हे पाण्यात असल्याने तिकडून होणारा दूधपुरवठा थांबला आहे. त्यामुळे  मुंबई, ठाणे, पुण्यात दूध पुरवठ्याचा तुटवडा जाणवत आहे.

मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरात गोकुळ, अमूल, प्रभात, कृष्णा, गोवर्धन यासारखे खासगी दूध मोठ्या प्रमाणावर येते. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील महापुरामुळे तिकडे दूधसंकलन झालंच नाही. शिवाय ज्या टँकरमधून दूध मुंबई-पुण्याकडे पाठवले जाते, ते टँकरही हायवेवरच थांबून आहेत. त्यामुळे दूध पुरवठाच झाला नाही.

मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग पुरामुळे बंद असल्याने दुधाचे टँकर नवी मुंबई किंवा मुंबईत पोहोचू शकलेले नाहीत. पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये दूध संकलन थांबविण्यात आल्याने मुंबईतील दूधपुरवठ्यात जवळपास 5० टक्के  घट झाली आहे.

रत्नागिरीतही दुधाचा तुटवडा

पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या पुरानं कोकणात दाणादाण उडवून दिली आहे. या पुराचा फटका रत्नागिरीला बसला आहे. सलग दुसऱ्या दिवशी जिल्ह्यात दूधटंचाई निर्माण झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पूर परिस्थितीमुळे वाहतूक व्यवस्था ठप्प झाली आहे. सलग दुसऱ्या दिवशी दुधाचे टँकर जिल्ह्यात पोहचू शकलेले नाहीत. त्यामुळे दूध मिळेनासे झालं आहे.

दररोज हजारो लिटर दूध हे पश्चिम महाराष्ट्रातून कोकणात येत असतं, मात्र काल सकाळी फक्त एक गाडी तब्बल १२ तासांचा प्रवास करून वारणानगरहून रत्नागिरीत पोहचली.  वारणाचे 3 हजार लीटर दूध घेऊन रत्नागिरी शहरामध्ये आलं. मात्र ह्या गाडीला रत्नागिरीत येण्यासाठी तब्बल 12 तासांचा कालावधी लागला.

काल सकाळी 9 च्या सुमारास ही गाडी रत्नागिरी शहरात आली. दूध आलंय हे समजताच दूध घेण्यासाठी ग्राहकांनी वितरकांच्या इथे मोठी गर्दी केली होती. त्यामुळे हे दूध दोन तासांच्या आतच संपलं.