वयाचे ठोकले शतक; पुन्हा मतदानासाठी कंचनबेन सज्ज; पहिल्या सार्वत्रिक निवडणूकीत बजावला होता अधिकार

| Updated on: Apr 25, 2024 | 5:27 PM

Lok Sabha Election 2024 : कंचनबेन बादशाह यांनी देशातील सर्वच सार्वत्रिक निवडणुकीत मतदान केले आहे. आज त्यांनी वयाची शंभरी गाठली आहे. पण लोकशाहीतील उत्सवातील त्यांचा उत्साह दांडगा आहे. त्या घरातून मतदान करणार नाहीत, तर मतदान केंद्रावर जाऊन मतदान करणार आहेत...

वयाचे ठोकले शतक; पुन्हा मतदानासाठी कंचनबेन सज्ज; पहिल्या सार्वत्रिक निवडणूकीत बजावला होता अधिकार
वय तर केवळ एक आकडा, आजीबाईचा उत्साह दांडगा
Follow us on

भारताच्या लोकशाहीचा पहिला उत्सव याचि देहि याचि डोळा पाहणाऱ्या कंचनबेन पुन्हा या उत्सवात हिरारीने सहभागी होण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. 112 वर्षीय मतदार कंचनबेन बादशाह यांनी देशातील पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदान केले आहे. त्या आता पुन्हा मतदान करतील. कंचनबेन यांचा जन्म 1912 मध्ये झाला. त्या आज 112 वर्षांच्या आहेत. पण त्यांनी निश्चिय केला आहे की, यंदा घरातून नाही तर मतदान केंद्रावर जाऊन मतदान करायचे. त्यामुळे देशातील तरुणांना मतदानासाठी उत्साह वाढेल, असे त्यांचे म्हणणे आहे.

1951-52 मध्ये केले होते मतदान

1951-52 मधील पहिल्या लोकसभा निवडणुकीसाठी त्यांनी पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावला होता. त्यांनी दोन महायुद्ध, भारत-पाकिस्तानची फाळणी त्यांनी पाहिली आहे. त्यांनी आणीबाणीचा काळ अनुभवला आहे. त्यानंतरच्या देशातील अनेक सुवर्णक्षणाच्या त्या साक्षीदार आहेत. त्यांनी हात जोडून सर्वांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

हे सुद्धा वाचा

वयाचे शतक, पण उत्साह कायम

कंचनबेन यांनी सर्वांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. कंचनबेन यांना सर्वजण ‘बा’ नावाने हाक मारतात. त्याचा अर्थ होतो आई. कंचनबेन नंदकिशोर बादशाह या शंभरहून अधिक वर्षापासून हे जग पाहत आहेत. देश, लोकशाहीविषयीचे त्यांचे कर्तव्य त्या विसरल्या नाहीत. त्या मतदान करणार आहेत. घरातून मतदान करणार नाहीत, तर त्यांनी मतदान केंद्रावर जाऊन मतदान करण्याचा संकल्प सोडला आहे.

20 मे रोजी करणार मतदान

मुंबईतील मालाबार हिल येथील रहिवाशी 112 वर्षीय कंचनबेन या 20 मे रोजी लोकसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावतील. निवडणूक आयोगाने 85 वर्षांपेक्षा अधिक आणि अपंग व्यक्तींसाठी घरातूनच मतदानाची सोय केलेली आहे. पण कंचनबेन या घरातून मतदान करु इच्छित नाहीत. त्यांना मतदान केंद्रावर जाऊन मतदान करायचे आहे.

अजून घरातील कामात सक्रिय

  • 1912 मध्ये कंचनबेन यांचा जन्म झाला. त्यांनी तीन मुलांचा एकटीने सांभाळ केला. आज कंचनबेन या 112 वर्षांच्या असल्या तरी त्या सक्रिय आहेत. त्यांचे हात थोडे थरथरतात हीच त्यांच्यासाठी थोडी चिंता आहे. मतदान करताना यामुळे अडथळा येऊ नये, अशी त्यांची इच्छा आहे.
  • कंचनबेन बादशाह या वयातही कधी कधी स्वतःसाठी चहा तयार करतात. स्वतः तूप काढतात. त्यांना वृत्तपत्र वाचण्याची आवड आहे. त्यांना कार चालवणे, डोसा आणि आईसक्रीम खायला अधिक आवडते. मतदान केंद्रावर अनेक जण आपल्यासोबत फोटो काढतात, त्यामुळे त्यांना आनंद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.