MLC Election 2022: आता पुन्हा दिल्लीतच निर्णय होणार? लक्ष्मण जगताप, मुक्ता टिळकांनी गुप्त मतदानाचा भंग केला?

| Updated on: Jun 20, 2022 | 4:52 PM

MLC Election 2022: भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक हे आज विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदानाला आले होते. दोन्ही आमदार गंभीर आजारी आहेत. तरीही व्हिलचेअरवरून या आमदारांनी विधान भवनात प्रवेश करून मतदानाचा हक्क बजावला.

MLC Election 2022: आता पुन्हा दिल्लीतच निर्णय होणार? लक्ष्मण जगताप, मुक्ता टिळकांनी गुप्त मतदानाचा भंग केला?
आता पुन्हा दिल्लीतच निर्णय होणार? लक्ष्मण जगताप, मुक्ता टिळकांनी गुप्त मतदानाचा भंग केला?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: राज्यसभा निवडणुकीप्रमाणेच विधान परिषदेच्या  (MLC Election 2022) निवडणुकीतही गुप्त मतदानाचा भंग झाला आहे. मागच्यावेळी भाजपने राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेच्या आमदारांनी गुप्त मतदानाचा भंग केल्याचा आरोप केला होता. तर आता आघाडीने भाजपच्या दोन आमदारांनी गुप्त मतदानाच्या नियमाचा भंग केल्याचा आरोप केला आहे. तशी तक्रारच भाजपने (bjp) निवडणूक अधिकाऱ्याकडे केली आहे. निवडणूक अधिकाऱ्याने योग्य तो निर्णय न दिल्यास काँग्रेसकडून (congress) थेट केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. तसं झाल्यास राज्यसभेप्रमाणेच विधान परिषद निवडणुकीची मतमोजणी लांबण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दिल्लीत निवडणूक आयोगाकडे हे प्रकरण गेल्यास मध्यरात्रीच मतमोजणीला सुरुवात होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. त्यामुळे आघाडीच्या हालचालींकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक हे आज विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदानाला आले होते. दोन्ही आमदार गंभीर आजारी आहेत. तरीही व्हिलचेअरवरून या आमदारांनी विधान भवनात प्रवेश करून मतदानाचा हक्क बजावला. या दोन्ही आमदारांनी मतदान केल्यानंतर मतपत्रिका मतपेटीत टाकण्यासाठी सहकाऱ्याकडे दिली. त्याला काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. हा निवडणूक नियमांचा भंग आहे, असं सांगत काँग्रेसने निवडणूक अधिकाऱ्याकडे तक्रार केली आहे. निवडणूक अधिकाऱ्याने त्यानुसार पडताळणी सुरू केली आहे. तसेच काँग्रेसने आता थेट दिल्लीत निवडणूक अधिकाऱ्याकडे तक्रार करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे आता हे प्रकरण दिल्ली दरबारी जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हे सुद्धा वाचा

नियम काय सांगतो?

निवडणूक नियमानुसार एखादा मतदार गंभीर आजारी असेल तर त्याला सहकाऱ्याकडे मतपत्रिका देता येते. मात्र त्यासाठी आधी मतदाराला निवडणूक आयोगाची परवानगी घ्यावी लागते. तरच त्याचं मत ग्राह्य धरलं जातं, नाही तर मत बाद होतं.

परवानगी घेतल्याचा दावा

भाजप नेते संजय कुटे यांनी यावेळी पत्रकार परिषद घेऊन सत्ताधाऱ्यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. निवडणूक आयोगाची परवानगी घेऊनच आमच्या दोन्ही उमेदवारांनी मतदान केल्याचा दावा कुटे यांनी केला आहे.

ही तर असंवेदनशीलता

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली. आजारी असतानाही मतदानासाठी आलेल्या आमदारांवर आक्षेप घेणं ही असंवेदनशीलता आहे, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.