बाप रे! देशातील 10 टक्के कोरोना रुग्ण एकट्या मुंबईत; काँग्रेस नेत्याची मोदी आणि उद्धव ठाकरेंना एकत्र येण्याची विनंती

| Updated on: Mar 29, 2021 | 9:54 AM

मुंबईत वेगाने लसीकरण मोहीम राबवली पाहिजे. प्रत्येक मुंबईकराला लस दिली पाहिजे. | Mumbai Maharashtra Coronavirus

बाप रे! देशातील 10 टक्के कोरोना रुग्ण एकट्या मुंबईत; काँग्रेस नेत्याची मोदी आणि उद्धव ठाकरेंना एकत्र येण्याची विनंती
PM Narendra Modi_ Uddhav Thackeray
Follow us on

मुंबई: कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रकोपासून मुंबईला वाचवण्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेने एकत्र यायला हवे, असे मत काँग्रेस नेते मिलिंद देवरा (Milind Deora) यांनी व्यक्त केले. सध्या देशभरात सापडणाऱ्या नव्या कोरोना रुग्णांपैकी (Coronavirus) 10 टक्के रुग्ण हे एकट्या मुंबईतील आहेत. देशाच्या एकूण सकल राष्ट्रीय उत्पादनात (GDP) मुंबईचा वाटा 6 टक्के इतका आहे. त्यामुळे मुंबईला कोरोनाच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज आहे, असे मिलिंद देवरा यांनी म्हटले.

मिलिंद देवरा यांनी ट्विट करुन यासंदर्भात भाष्य केले आहे. देशाचे आर्थिक हित जपण्याच्यादृष्टीने केंद्र सरकार, राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेने एकत्र आले पाहिजे. मुंबईत वेगाने लसीकरण मोहीम राबवली पाहिजे. प्रत्येक मुंबईकराला लस दिली पाहिजे, असे मिलिंद देवरा यांनी सांगितले.

राज्यात कोरोनाचा कहर, गेल्या 24 तासांत तब्बल 40 हजार 414 नवे रुग्ण

राज्यातील गेल्या 24 तासांतील कोरोनास्थिती जाणून घ्यायची झाल्यास कोरोनाचं विदारक चित्र आपल्यासमोर निर्माण होत आहे. कारण रविवारी दिवसभरात राज्यात तब्बल 40 हजार 414 नव्या कोरोनारुग्णांची भर पडली आहे. दिवसभरात 17 हजार 874 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. तर 108 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबादसह अन्य शहरांतही रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. राज्य सरकारने घेतलेल्या नियमानुसार रविवारपासून रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्याचबरोबर अनेक जिल्ह्यात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. इतकच नाही तर संपूर्ण राज्यात लॉकडाऊनचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत.

मुंबईतील कोरोना स्थिती

मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मुंबईत रविवारी दिवसभरात तब्बल 6 हजार 923 जणांची कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर 3 हजार 380 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत आज दिवसभरात 8 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यातील 7 जणांना दीर्घकालीन आजार होते. मृतांपैकी 6 पुरुष तर 2 महिलांचा समावेश आहे.

मुंबईतील बरे होणाऱ्या रुग्णांचा दर 86 टक्क्यांवर आलाय. तर रुग्ण दुपटीचा कालावधी थेटच 58 दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या चिंतेत भर पडलीय.

संबंधित बातम्या :

VIDEO | संसर्ग वाढतोय, चिंता वाढतेय; वृद्धांचं कोरोनापासून संरक्षण कसं कराल ?,पाहा सगळ्या टिप्स 1 मिनिटात

Maharashtra lockdown update : राज्यात लॉकडाऊनची दाट शक्यता, सरकारकडून कोणती खबरदारी?