Maharashtra Needs Vaccine : पुणे, सातारा, सांगली, पनवेलसह अनेक ठिकाणी लसीकरण केंद्रांचं शटर डाऊन!

| Updated on: Apr 08, 2021 | 2:41 PM

राज्यात सातारा, सांगली, कोल्हापूर, पनवेलसह अनेक ठिकाणी लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात आली आहे. तर पुणे, मुंबई, नागपूर आणि सोलापूर जिल्ह्यात दोन दिवस पुरेल इतकाच साठा शिल्लक राहिलाय.

Maharashtra Needs Vaccine : पुणे, सातारा, सांगली, पनवेलसह अनेक ठिकाणी लसीकरण केंद्रांचं शटर डाऊन!
लसीच्या तुटवड्यामुळे साताऱ्यासह राज्यातील अनेक ठिकाणी लसीकरण बंद
Follow us on

मुंबई : राज्यात कोरोनाचं थैमान सुरुच असताना दुसरीकडे मात्र लसीचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. राज्यात अनेक ठिकाणी लसींचा साठा संपल्यानं लसीकरण केंद्र बंद ठेवण्याची वेळ प्रशासनावर आलीय. राज्यात सातारा, सांगली, कोल्हापूर, पनवेलसह अनेक ठिकाणी लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात आली आहे. तर पुणे, मुंबई, नागपूर आणि सोलापूर जिल्ह्यात दोन दिवस पुरेल इतकाच साठा शिल्लक राहिलाय. पुण्यातही काल काही भागातील लसीकरण केंद्रांवरुन लस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना परतावं लागल्याचा प्रकार घडला. (Vaccination centers closed due to shortage of vaccines)

राज्यात अनेक भागात लसीकरण केंद्र बंद

राज्यात फक्त 2 ते 3 दिवस पुरेल एवढाच लसीचा साठा शिल्लक असल्याची माहिती काल आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. त्यानंतर सातारा, सांगली, कोल्हापुरातील लसीकरण केंद्रांवर लसीचा साठा संपल्यामुळे लसीकरण केंद्र बंद करावी लागली. त्यापाठोपाठ संध्याकाळच्या सुमारास पनवेलमधील लसीकरण केंद्र बंद करण्याची वेळ आली. पनवेल महापालिकेकडून त्याबाबत एक पत्रकच जारी करण्यात आलं.

पनवेल महापालिकेचं पत्रक

पनवेल महानगरपालिका क्षेत्रात सध्या कोविड -19 लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु आहे. मात्र लसींचा तुटवडा असल्याकारणाने पुढील लस उपलब्ध होईपर्यंत सर्व शासकीय आणि खासगी लसीकरण केंद्रामध्ये लसीकरण कार्यक्रम बंद राहील, याची नोंद घ्यावी, असं पनवेल महापालिकेकडून सांगण्यात आलं.

सुप्रिया सुळेंची डॉ. हर्षवर्धन यांना विनंती

“राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काल ट्वीट करुन पुण्यातील लसीकरण केंद्राची माहिती दिली. पुणे जिल्ह्यात काल 55 हजार 539 जणांना 391 केंद्रांवर लस दिली गेली. तर लसीकरण केंद्रांवरील लसीचा साठा संपल्यामुळे हजारो लोकांना लस न घेताच परतावं लागलं”, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय

“कोरोना लस उपलब्ध नसल्यामुळे 109 लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात आली होती. लसीचा साठा नसल्यामुळे लसीकरणाचा वेग हरवला जाऊ शकतो. जीव वाचवण्यासाठी, कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी आणि आपली अर्थव्यवस्था लवकरात लवकर परत आणण्यासाठी प्रत्येक गरजू व्यक्तीला लस देण्याचा आमचा निर्धार आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांना विनंती आहे की कोरोना लसीबाबत त्यांनी महाराष्ट्राची मदत करावी”, असं आवाहनही सुप्रिया सुळे यांनी डॉ. हर्षवर्धन यांना केलंय.

आठवड्याला 40 लाख लसी हव्या आहेत : राजेश टोपे

डॉ.हर्षवर्धन यांच्याशी बोललो. महाराष्ट्राला आठवड्याला 40 लाख वॅक्सिन लागतात. त्यामुळे ती दिली जावीत. सातारा, सांगली , पनवेलला लसीकरण बंद पडलं. लसीकरणाची केंद्र वाढवली. या गोष्टी हर्षवर्धन यांना कळवल्या. महाराष्ट्राला साडे सात लाख आणि इतर राज्यांना जास्त लसी का? असा सवाल आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलाय. केंद्र सरकार मदत करत आहे. पण जशी मदत करायला हवी तशी मदत होत नाही. महाराष्ट्र आणि गुजरातची तुलना केली असता. गुजरातची लोकसंख्या किती? महाराष्ट्राची लोकसंख्या किती? गुजरातला 1 कोटी लसी दिल्या आणि महाराष्ट्राला 1 कोटी 4 लाख लसी दिल्या, असंही टोपे म्हणाले.

संबंधित बातम्या :

कोरोना लसीचा तुटवडा संपवण्यासाठी रोहित पवारांचा केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना सल्ला, म्हणाले…

वास्तव नाकारुन चालणार नाही, लोकांचे जीव वाचवण्यासाठी कठोर निर्बंध गरजेचे, सहकार्य करा: शरद पवार

Vaccination centers closed due to shortage of vaccines