
गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह ठाणे आणि उपनगरात सातत्याने पाऊस कोसळत आहे. यामुळे उन्हाच्या काहिलीने त्रस्त झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज मुंबई, ठाणे, उपनगरासह तब्बल 11 जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस होऊ शकतो, असा इशारा दिला आहे. यामुळे ऐन मे महिन्यात नागरिकांची दाणादाण उडणार आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील उर्वरित भागात हवामानात मोठे बदल जाणवणार आहेत. काही ठिकाणी ढगाळ वातावरण तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर वगळता उर्वरित महाराष्ट्रात पुढील चार दिवस पावसाचे वातावरण कायम राहणार आहे. यामुळे वातावरणात सुखद गारवा निर्माण होईल, असे सांगितले जात आहे.
मुंबई आणि ठाणे जिल्ह्यासाठी आज आणि उद्या ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. या भागात ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. मुंबईसह ठाण्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडू शकतो, असा इशारा हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आज ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. उद्या या भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यानंतर मात्र पावसाचा जोर हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे.
त्यासोबतच धुळे, जळगाव आणि नंदुरबार या तीन जिल्ह्यांमध्ये आज हलका पाऊस होईल. त्यामुळे पुढील तीन दिवस ढगाळ हवामान राहील. नाशिक आणि घाट परिसरातही याच प्रकारची हवामान स्थिती राहील. तसेच राज्यातील अहिल्यानगर, पुणे, घाट परिसर, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, बुलढाणा, भंडारा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांत हवामान विभागाने मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. या जिल्ह्यांमध्ये ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने जोरदार वारे वाहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी सुरक्षिततेची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, बीड आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये गारपिटीची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. अंदमान निकोबार बेटांपासून पुढे सरकणाऱ्या वाऱ्यांमुळे राज्यातील पावसाचा जोर वाढला आहे. मान्सून आज अंदमान-निकोबार बेटावर धडक मारण्याची शक्यता आहे. त्यामुळे दक्षिण बंगालच्या उपसागरातील नैऋत्य मोसमी वारे हा पहिला पाऊस घेऊन येतील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. यंदा मान्सूनचं आगमन आठवडाभर आधीच होणार आहे.
मे महिन्यात सर्वत्र अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली असून आज अंदमानमध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. त्यानंतर मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात केरळमध्ये मान्सूनचे आगमन होऊ शकते, असा प्राथमिक अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे यंदा नागरिकांची उष्णतेच्या तडाख्यापासून लवकर सुटका होऊ शकते असा अंदाज वर्तवला जात आहे.